सांस्कृतिक

संगीतकार वसंत पवार !

‘बुगडी माझी सांडली गं…’च्या सुरांचा जादूगार संगीतकार वसंत पवार …!
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा इतिहास चाळला, तर काही नावं आपल्या मनात कायमची घर करून राहतात. त्यापैकी एक तेजस्वी नाव म्हणजे संगीतकार वसंत पवार. त्यांच्या चालीत असा जादुई स्पर्श होता की, साधे शब्दही लोकांच्या ओठांवर कायमचे रेंगाळू लागायचे. आजही “सांगत्ये ऐका” म्हटलं की कानात घुमतं ते “बुगडी माझी सांडली गं…” हे अजरामर गीत. ही केवळ एक लावणी नव्हती, तर मराठी संगीतविश्वात कोरलेला एक सुवर्ण अध्याय होता.

वसंत पवार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला केवळ गाणी दिली नाहीत, तर संगीताचा एक स्वतंत्र, समृद्ध आणि अस्सल मराठमोळा वारसा दिला. अंगाईगीतांपासून अभंगांपर्यंत, भावगीतांपासून पोवाड्यांपर्यंत, सवाल-जवाब, झगडे, गण-गौळण, कलगी-तुरा, लावणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली. त्यांच्या प्रत्येक चालीत नावीन्य, लोकसंगीताचा गंध आणि शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया जाणवत असे.
मराठी संगीतविश्वात “वसंत” या नावाला एक वेगळंच स्थान आहे. वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार या तीन दिग्गज संगीतकारांनी आपल्या सुरांनी मराठी रसिकांच्या अनेक पिढ्यांना समृद्ध केलं. त्यापैकी वसंत पवार यांनी अवघ्या ३८ वर्षांच्या आयुष्यात जे योगदान दिलं, ते आजही अचंबित करणारं आहे.
वसंत शंकर पवार यांचं मूळ घराणं मध्य प्रदेशातील धार येथील. पुढे त्यांचे वडील शंकर पवार कोल्हापूरला स्थायिक झाले आणि तिथेच वसंत पवारांचा जन्म झाला. वडील स्वतः उत्कृष्ट संगीतकार आणि अनेक वाद्यांवर प्रभुत्व असलेले कलाकार होते. मुलानेही मोठा सतारवादक व्हावं, या ध्यासातून त्यांनी धारवाडचे सुप्रसिद्ध सतारवादक रहिमतखाँ यांच्याकडून वसंत पवारांना तालीम दिली. लहान वयातच त्यांच्या हातात सतार अशी खुलली की, त्यांच्या असामान्य प्रतिभेची चाहूल सर्वांना लागली.
पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळीच वाट राखून ठेवली होती. एका स्टुडिओत झालेल्या अपमानाने त्यांच्या मनात संगीतकार होण्याची जिद्द पेटली. त्यांनी सतारवादनापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता संगीतदिग्दर्शनाची वाट निवडली आणि मुंबई गाठली. तिथे अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य वाद्यांचा अभ्यास करून त्यांनी स्वतःला अधिक समृद्ध केलं.
‘रणजित स्टुडिओ’मध्ये उमेदवारी करताना त्यांनी हिंदी चित्रपट तानसेनमधील गाण्यांसाठी सतार वाजवली. त्यांच्या वादनाने त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार खेमचंद प्रकाश यांनाही प्रभावित केलं.
१९४४ मध्ये वसंत पवार पुण्यात आले. प्रभात, डेक्कन, शालिमार, नवयुग अशा अनेक चित्रसंस्थांमध्ये त्यांनी वादक म्हणून काम केलं. पुढे सुधीर फडके यांच्यासोबत काम करताना ते त्यांचे विश्वासू सहायक झाले. १९४८ मध्ये त्यांना जयभीम या हिंदी चित्रपटासाठी स्वतंत्र संगीतदिग्दर्शनाची संधी मिळाली.
मात्र त्यांच्या कारकिर्दीला खरी दिशा मिळाली ती ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटानंतर. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मराठी चित्रपटातील झोकदार, पेशवाई थाटाची, रंगेल आणि ठसकेबाज लावणीला त्यांनी नवा आत्मा दिला.
वसंत पवार यांच्या संगीताची चर्चा झाली आणि मल्हारी मार्तंडमधील “फड सांभाळ तुऱ्याला गं आला”, “तुझ्या उसाला लागलं कोल्हा”, “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा” या लावण्या आठवल्या नाहीत, असं होऊच शकत नाही. सुलोचना चव्हाण यांच्या दमदार आवाजाला त्यांनी दिलेल्या चाली आजही लावणीच्या इतिहासातील सर्वोच्च मानल्या जातात.

त्यांच्या सुरांनी आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण यांसारख्या अनेक गायक-गायिकांच्या कारकिर्दीला नवी उंची दिली. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्यासारख्या प्रतिभावंतांनाही त्यांनी मोठं व्यासपीठ मिळवून दिलं.
वसंत पवार हे केवळ संगीतकार नव्हते. ते उत्तम सतारवादक, पार्श्वगायक, जादूगार आणि विलक्षण स्मरणशक्तीचे धनी होते. उर्दू शेरो-शायरीपासून मराठी लोकसाहित्यापर्यंत त्यांचा अफाट व्यासंग होता. जुन्या लावण्या, अभंग, पोवाडे, कविता आणि शेर त्यांना तोंडपाठ असत. त्यांच्या मैफली रंगल्या की श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होत.
वसंत पवार यांनी ५० मराठी, ८ हिंदी चित्रपट आणि चार नाटकांना संगीत दिलं. सांगत्ये ऐका आणि मानिनी या चित्रपटांसाठी त्यांना फाळके गौरव चिन्ह पुरस्कार मिळाला. तर रंगल्या रात्री अशा आणि सवाल माझा ऐका या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
इतकी विलक्षण प्रतिभा लाभलेल्या या कलाकाराला आयुष्य मात्र फारसं लाभलं नाही. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या या सुरेल व्यक्तिमत्त्वाचा अवघ्या ३८व्या वर्षी, ६ ऑगस्ट १९६५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी संगीतविश्वाने एक अमूल्य हिरा गमावला.
काही कलाकार शरीराने जातात, पण त्यांची कला काळाच्या पलीकडे जगत राहते. वसंत पवार हे त्याच थोर कलाकारांपैकी एक. त्यांच्या सुरांत आजही महाराष्ट्राचा मातीचा सुगंध आहे, लावणीचा ठसका आहे, भक्तीची शांतता आहे आणि लोकसंगीताची आत्मीयता आहे.
त्यांनी दिलेल्या चाली काळ बदलला तरी जुन्या होत नाहीत. म्हणूनच मराठी संगीताचा इतिहास लिहिला जाईल, तोपर्यंत वसंत पवार हे नाव सुरांच्या सुवर्णाक्षरांनी कायमच कोरलेलं राहील.
श्रीकांत अ. जोशी 
माजी आमदार फेसबुक वॉलवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button