क्राईम

गणपती बाप्पाच्या पूजेतून उठून पन्नास लाखांची लाच घेणारा तहसीलदार जाळ्यात अडकला

 

​धारवाड – कर्नाटक राज्यातील धारवाड येथे एका भ्रष्ट अधिकाऱ्याचा बुरखा फाटला असून, संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ पदे सांभाळणारी मंडळी पैशांच्या लालसेपोटी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अत्यंत संतापजनक नमुना समोर आला आहे. एका बाजूला सार्वजनिक गणेशोत्सव आणि भव्य सत्यनारायण पूजा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमात आघाडीवर असल्याचा आव आणणारा एक तहसीलदार, प्रत्यक्षात मात्र तब्बल ५० लाख रुपये एवढी मोठी लाचेची रक्कम खिशात घालताना रंगेहाथ पकडला गेला आहे. सच्चिदानंद कुचनूर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, लोकायुक्त पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे त्याचा पर्दाफाश झाला आहे.

​माहितीनुसार, धारवाड शहरापासून जवळच असलेल्या यरिकोप्पा या गावात एका विकासकाची तब्बल ३३ एकर जमीन आहे. पुणे-बंगळुरू महामार्गालगत असल्याने आणि आसपास नामांकित शैक्षणिक संस्था व उच्च न्यायालय असल्याने या परिसरातील जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या या भागात प्रति एकर सुमारे दीड कोटी रुपयांचा बाजारभाव सुरू आहे. संबंधित जमीन मालकाला आपल्या मालकीच्या एकूण जागेपैकी १३ एकर जागा शेतीसाठी अयोग्य असल्याची म्हणजेच अकृषिक असल्याची अधिकृत नोंद महसूल दरबारी करायची होती, जेणेकरून तिथे एक निवासी प्रकल्प विकसित करता येईल. याच कामाच्या मंजुरीसाठी तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर याने अत्यंत निर्लज्जपणे थेट १ कोटी रुपये रोख रक्कम आणि चक्क १ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून देण्याची बेकायदेशीर मागणी केली होती.

​बुधवारी रात्री धारवाड येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात या अधिकाऱ्याने गणेशोत्सव आणि महापूजेचे भव्य आयोजन केले होते. या सोहळ्यात सुमारे ५ हजार नागरिकांसाठी महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू होती. स्वयंपाकी आणि इतर कामगारांना पैसे वाटण्यात हा अधिकारी व्यस्त होता. मात्र, भ्रष्टाचाराची कीड इतकी खोलवर रुजली होती की, लाचेची रक्कम घेण्यासाठी या महाशयांनी रात्री ८.३० वाजता सर्व पूजेचे काम व तयारी अर्धवट सोडली. तक्रारदाराला एवढी मोठी रक्कम स्वतःजवळ बाळगण्याची भीती वाटत होती, तरीही अधिकाऱ्याने त्याला कर्नाटक आर्ट्स कॉलेज जवळ बोलावून घेतले.

​त्यानंतर रात्री ९.३० वाजता सच्चिदानंद कुचनूर स्वतःच्या मोटारीतून लाचेचे पैसे गोळा करण्यासाठी ठरलेल्या जागी हजर झाला. मात्र, तिथे आधीच सापळा रचून बसलेल्या लोकायुक्त पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक सिद्धलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने त्याला ५० लाख रुपये रोख रक्कम स्वीकारताना रंगेहाथ बेड्या ठोकल्या. अटकेची कारवाई होताच या अधिकाऱ्याचा माज पूर्णपणे उतरला. त्याने अक्षरशः रडून पोलिसांकडे गयावया करण्यास सुरुवात केली आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी थेट पोलिसांनाच पैशांची व आयुष्यभर ऋणी राहण्याची ऑफर दिली. मात्र, प्रामाणिक अधिकाऱ्यांनी त्याला कसलीही दाद न देता न्यायालयात हजर केले, जिथून त्याची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. एका बाजूला देवाचे कार्य करत असल्याचा ढोंगी दिखावा करायचा आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेची लूट करून स्वतःची घरे भरायची, हा या अधिकाऱ्याचा दुटप्पी चेहरा या निमित्ताने संपूर्ण जनतेसमोर उघडकीस आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button