जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा; विकासकामे, आरोग्य व आर्थिक विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय

औषध साठ्यासाठी स्वतंत्र गोदाम, महिला वसतिगृहात कायमस्वरूपी रेक्टर नियुक्तीसह विविध विषयांवर चर्चा
सोलापूर ( प्रतिनिधी )जिल्हा परिषद सोलापूरची स्थायी समिती सभा मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत जिल्हा परिषदेच्या विकासात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा करून विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेत आरोग्य विभागाच्या औषध साठ्यासाठी स्वतंत्र गोदाम उभारण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच मौजे शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी महिला अधीक्षक (रेक्टर) नियुक्तीबाबतही चर्चा करण्यात आली.
दि. २५ जून २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांची नोंद घेण्यात आली. विविध विभागांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्चास मंजुरी देण्याबाबत विचार करण्यात आला.
याशिवाय जिल्हा ग्रामविकास निधीच्या मंजुरीसंदर्भात चर्चा करण्यात आली. जुलै २०२६ मध्ये झालेल्या विविध विषय समित्यांच्या सभांच्या कार्यवृत्ताची नोंद घेण्यात आली. साप्रवि-१ विभागातील अद्ययावत लेखा विषयक नोंदवह्यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, वित्त व लेख अधिकारी मिनाक्षी वाकडे, संबंधित अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.



