सांस्कृतिक

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सोलापूर: ( प्रतिनिधी ) दुर्लभ सुंद्री वाद्य कला अकादमी (सोलापूर), केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सोलापुरात ‘संगीत प्रतिभा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. किल्ला बागेसमोरील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह (अंफी थिएटर) येथे सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा संगीत महोत्सव सर्वांसाठी मोफत आणि खुला असणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष पं. भिमण्णा जाधव यांनी दिली.
या महोत्सवाची सुरुवात सुंद्रीसम्राट पं. सिद्राम जाधव यांची पणती आणि पं. चिदानंद जाधव यांची नात बालकलाकार कु. कलाश्री भिमण्णा जाधव हिच्या सुंद्री वादनाने होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या कलाश्रीला अजय यंगल तबल्याची साथ करतील. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रगल्भ गायिका सौ. रमा कुलकर्णी यांचे गायन होईल. त्यांना नितीन दिवाकर तबल्यावर आणि राजकुमार सावळगी संवादिनीवर साथ देतील.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सुंद्री आणि व्हायोलिनची जुगलबंदी. यात भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त बालकलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव (सुंद्री) आणि ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडन येथून प्राविण्य मिळवलेली पुण्याची युवा वादक वेधा विद्याधर पोळ (व्हायोलिन) आपली कला सादर करतील. यांना वेदांत जोशी तबलासाथ करतील.
तसेच, ग्वाल्हेर व किराणा घराण्याच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका विदुषी रोझी दत्ता पंडित (कोलकाता) यांचे उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना जोथम कराड (तबला) आणि ओंकार पाठक (हार्मोनियम) साथ करतील. नृत्याविष्कारात सोलापूरच्या कु. एकता कांबळे यांचे भरतनाट्यम, तर पं. मयूर वैद्य यांच्या शिष्या अनन्या खोपकर, भूमी नागडा, संयुक्ता रापाटे व हर्षाली म्हात्रे (मुंबई) यांचे कथ्थक नृत्य रंगेल. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील करणार आहेत. या शास्त्रीय संगीत व नृत्याच्या पर्वणीचा सोलापूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button