सोलापूर

सुभाष देशमुखांना मान देत विजय देशमुखांचा कार्यक्रम ; राऊत, परिचारिक, शिंदे, पवारांची उपस्थिती

 

सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात सध्या भारतीय जनता पार्टी मधील अंतर्गत राजकारण चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही देशमुखाना निमंत्रण देऊनही ते पालकमंत्र्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी पूजेला दिसले नाहीत. पण पालकमंत्री समर्थक सर्वच राजकीय नेते उपस्थित होते. दुसरीकडे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे ज्या आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्याठिकाणी त्यांनी माजी मंत्री तथा सहकारी आमदार सुभाष देशमुख यांना मान देत कार्यक्रम घेतला. त्यांनी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, शिवसेना गटनेते अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांना आवर्जून बोलावले.
विशेष म्हणजे रविवारी पालकमंत्री सोलापुरात होते पण ते या कार्यक्रमाला दिसले नाहीत यावरून त्यांना निमंत्रण होते का नाही याबाबत साशंकता आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या आजोबा गणपतीच्या ठिकाणी ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला. नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

या महिन्याभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच एकमेका विरोधात कूरघोड्या पाहायला मिळत आहेत. यावरून बाजार समिती प्रमाणेच आमदार सुभाष देशमुख हे या डीसीसीच्या निवडणुकीत पुन्हा आपले स्वतंत्र पॅनल करणार का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

यावेळी विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती उत्सवाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेविषयी माहिती दिली. आजोबा गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाला दीर्घ परंपरा असून, सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनात या उत्सवाला विशेष स्थान आहे. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच कला, संगीत, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांनी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे

आमदार सुभाष देशमुख यांनी आजोबा गणपतीच्या पूजेचा मान दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. सोलापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी तरुणांनी विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button