महाराष्ट्र

भारत माझा देश आहे प्रतिज्ञा

सातवीचे पुस्तक नवीन आहे म्हणून मी ते चाळायला घेतलं पहिल्या पानावर नेहमीप्रमाणे प्रतिज्ञा ….
आणि मला त्या पुस्तकातून प्रतिज्ञा बाहेर जाताना दिसायला लागली प्रतिज्ञेतल्या पानावरचा एकेक शब्द नाहीसा व्हायला लागला… सगळे अक्षर पुसट झाली…मी विचारले अग चाललीस कुठे? माझया प्रश्नावर प्रतिज्ञा म्हणाली नुसतं कागदावर राहण्याचा कंटाळा आला ग मला…. उगाच ते तोंड हलवून म्हणणं … तो विचार ना मनात माझ्या डोक्यात…. मग उपयोग काय माझा…? मी म्हणाले,” असं का म्हणतेस आम्ही फार निष्ठापूर्वक म्हणून घेतले मुलांकडून” “हो पण मुलांनी कुठे म्हटलं …त्याने ते फक्त पाठ केलं रोज म्हणून अगदी मारुती स्तोत्र रामरक्षा सारखं …अर्थ काहीच ठाऊक नाही पण पाठ मात्र चोख!”

मी म्हणाले,” असं काय म्हणतेस ग? त्यावर ती म्हणाली,” बैस येथे मी तुला समजून सांगते हे पहा पहिली ओळ आहे ..भारत माझा देश आहे… ही जाणीव किती जणांना असते? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला वाटतं आपण भारत देशाचे आहोत त्याच्या अलीकडे एक आठवडाभर ही सुरुवात असते. मेरे देश की धरती वगैरे सारखी गाणी लागतात. शहीद ,भगतसिंग, देशभक्त ,क्रांती, बॉर्डर असले सिनेमे टीव्ही वरती चालू राहतात ….आठवडाभरानंतर सगळं संपत…

सारे भारतीय माझे बांधव आहेत अग घरातले भाऊ-बहीण घरातली सदस्य एका चौकोनी खोकड्यात बघत असतात. पलीकडच्या घरात कोण राहतो याची माहिती तुम्हाला नाही .त्याच्या सुखदुःखाशी तुमचं देणंघेणं नाही तुमच्या उंबर्या पलीकडचं जग तुम्हाला माहित नाही…. त्यांच्याशी संवाद नाही. पलीकडे उत्तर हिंदुस्तानी आला तर तुम्ही म्हणता तो आपला नाही …सारे भारतीय बांधव कुठले तुमचे…? प्रांतरचनेवर तुमचे भांडण…. बर आता ही ओळ बघ… माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे! यातल अर्ध वाक्य बरोबर आहे परंपरा समृद्ध आहेतच पण त्या अधिक समृद्ध करण्याचं काम तुम्ही केलेलं नाही. काही परंपरा तर ओंगळवाण्या केल्यात त्या परंपरांचे आधुनिकीकरण करताना त्याचे इव्हेंट केलेत. ओवाळून करायचे वाढदिवस मेणबत्ती विझवून आणि केक कापून करताय तुम्ही ….हे म्हणजे आधुनिकीकरण नाही ….गणपती उत्सवात मिरवणुकीत हिडीस प्रकाराने नाचता नृत्य करता…. परंपरावादी माणूस तुम्हाला आऊटडेटेड वाटतो… आणि मुख्य म्हणजे परंपरा पाळा ना. आपल्या देवळात जाण्यासाठी काही नियम असतील तर ते पाळले पाहिजेत तिथे एखाद्या बाईने तोकडी पॅन्ट आणि वर एखादा तोकडा शर्ट घालून जाणे योग्य नाही त्याच्यावर तुम्ही आंदोलन करता बायकांनी तर पुरुषी होण्याची स्पर्धाच चालवली आहे बायकांनी पुढे जरूर यावं …सगळं शिकावं…. सगळ्या गोष्टीआत्मसात कराव्यात, प्राविण्य मिळवावं पण बाईपण सोडू नये…. परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती !….ममता सामंजस्य ऋजूता वात्सल्य आणि अफाट सहनशक्ती कारण ती सृजनाची शक्ती आहे पण तुम्हाला तसं वाटत नाही पुरुषांशी बरोबरी करण्यात आणि त्यांच्यापुढे जाण्यात धन्यता… त्यामुळे खरंच कोणी सुखी नाही…ना पुरुष ना स्त्री ना कुटुंब आणि खरं सांगू का कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे तो तोच संकुचित होत चालला गाव गाड्या पासून वाड्या आल्या.. वाड्यापासून वस्त्या झाल्या ..गल्ली बोळ …छोट घर मोठ कुटुंब… मोठ्या कुटुंबाचे रूपांतर विभक्त कुटुंबात झाले आणि आता बहुतेक एकल कुटुंब होतील…!
” त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन “असं म्हणणारे तुम्ही त्या परंपरा मोडीत तरी काढताय किंवा त्याच आधुनिकीकरण करण्याच्या नादात विद्रुप पद्धतीने त्या बदलत आहात या परंपरांचे पाईक होण्यासाठी तुम्हाला पाईक या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. निष्ठेने एखादी गोष्ट पुढे नेणारा त्यावर श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट चालू ठेवणारा वारकरी सांप्रदायातली वारी परंपरा ,
ती प्रथा पुढे नेत आहेत 700 वर्षाहून अधिक काळ झाला पण त्यात सुद्धा इव्हेंट आलाच. वारी कव्हर करणारे चॅनल , वारीच्या रस्त्यावर जाहिरातीचे बोर्ड लावणारे जाहिरात दार आले वारीत हौसे नवशे गवशे सगळे आले पण मूळ गरीब बिचार्या वारकऱ्यांनी आपली परंपरा सोडली नाही .
आता पुढची ओळ बघ “मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन” जरा पोरं मोठी झाली की पालकांचा चुका करण्यात सॉरी चुका दाखवण्यात ते पटाईत झालेत तुम्हाला हे जमत नाही तुम्हाला हे येतच नाही ते तुमच्या वेळेच आता जुना झालं वगैरे वगैरे…. आई वडिलांना वाकून नमस्कार करणारी पिढी संपली, आता गुडघ्याला नमस्कार करतात. गुरुजनांचा तर विचारच नको त्यांना थोबाडीत मारेपर्यंत मजल गेली आहे मुलांची आणि ही दृश्य तुमच्या चित्रपटातही दाखवले जातात मुलांना बळ मिळतं त्यांना वाटतं आपणही असं करावं कारण त्याला कोणती शिक्षा होताना दाखवत नाहीत त्याचा बाप आमदार असतो खासदार असतो पैसा फेकला की पेपर मिळतो ऍडमिशन मिळते डिग्री मिळते त्याला ठाऊक झाले कारण हे असले महापाप करणारे प्रजाजन आपल्या देशात आहेत आणि तरुण मुलांची डोके भडकवणारे परदेशात बसलेत. देशाचा सर्वोच्च मानबिंदू आपले पंतप्रधान त्यांना सुद्धा जगातल्या वाईटात वाईट असलेल्या शब्दाने शिव्या देण्याचे काम करणारी पिढी…. त्यांना ही प्रतिज्ञा शाळेत शिकवली नसेल का? ते कोणत सौजन्य दाखवत होते? ते कोणाच्या वयाचा मान नाही कोणाच्या पदाच मान नाही नाही… जेंडर डिफरन्स तर तुम्हाला मान्य नाही ठीक आहे पण तो तुम्ही अमान्य करून उपयोग नाहीये निसर्गाने तो फरक बनवलेला आहे पोर शेवटी बाईलाच होणार आहे आणि आई पण तुमच्याकडेच येणार आहे…! सौजन्याने वागणे यात पहिल्यांदा सौजन्य म्हणजे काय शिकवावे लागेल अशी अवस्था आली आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे कोणती निष्ठा कोणावर दाखवत आहे या देशात राहून दुसऱ्या देशावर निष्ठा आहे तुमची प्रतिज्ञा.. या देशांमध्ये खूप आराजक आहे ..राजकारण फार आहे …पैसे फार मिळत नाहीत… जगण्यासाठी संघर्ष आहे… हे लक्षात घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करायचा या उदात्त हेतूने अन्य राष्ट्रात पलायन करणारी पिढी या राष्ट्राच्या मातीला विसरत चाललीये आई बापाला विसरलेली आहे ते दुःखी जीव पैशाचा समृद्ध लाटेवर अगतिकतेने जगताना पाहिल की वाईट वाटतं. बासरी वाजून उंदीर पळून लावणाऱ्या जादूगारासारखी आपली पोर इतर देशात पळवून नेलीत आणि त्यांचे आईबाप त्यांच्या प्रेमाला पारखे झाले…. माता पिता गुरुजन वडीलधारी मंडळी हे सर्व शब्द आता डिक्शनरीत राहतील.

माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे हे प्रतिज्ञाचे शेवटचे वाक्य बघ …!देशभक्त हे शब्द हद्दपार झाले पूर्वी पत्रं यायची लोकांना तर मागे दे.भ. असे ती सर्वात मोठी डिग्री होती दे. भ. म्हणजे देशभक्त अमुक तमुक आता अशी डिग्री माग असणारा कोणी दिसतो का तुला ?…डिगऱ्या सगळ्या पुढे आणि माणसं राहिली माग ..!आतंकवादी, चुकीचे काम करणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या घरात असरा देणारी माणसं ,चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारी माणसं ,देशाचा कर बुडवणारी माणसं, फुकट्या सवलती उपटणारी माणसं ,
कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे राजकारणी, लोकांची जीवाची पर्वा न करता बिल्डिंग बांधणारे कंत्राटदार ,निसर्गाचा ऱ्हास करून बांधकाम उभे करणारे ठेकेदार, नद्याचा नाला करून नद्याच गायब करणारे जादूगार यांनी ही प्रतिज्ञा म्हणली नसेल का ग ?हे सगळं विसरायला लावणारे वरवरचे शिक्षण काय उपयोगाचं..? शिक्षण आणि शिस्त रक्तात भिनली पाहिजे… असेल खूप काही चांगले घडत असेल मी नाही म्हणत नाही ….पण अलीकडे देशात घडणारे अनेक प्रसंग पाहून उद्विग्नता आली आहे हे मात्र खरे…!

प्रतिज्ञे झालं तुझं सांगून… प्रतिज्ञा आता माझा ऐक एवढी निराश होऊ नकोस देशासाठी गोल्ड मेडल मिळाल्यानंतर डोळ्यात घळाघळा पाणी आणणाऱ्या भारतीय महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जिंकण्याचा जल्लोष मातीवर डोकं टेकवून रडण्यात करणारी हीच मुलं आहेत नवनवीन शोध लावणारी काळ्या आईत राबवून क***** बे भरवशाची शेती करणारी तरुण पोरं आहेतच की …रस्त्यावर चहाची गाडी लावून चहा विकून आपला उदरनिर्वाह करणारी …अशी स्वतःच्या उद्योगाची निर्मिती करणारी तरुण पोरं आहेतच ना …अनाथ आश्रम स्वतःहून चालवणारे समाजसेवक आहेत …वृद्धाश्रम श्रद्धेने चालवणारे समाजसेवक आहेत…. गरिबांच्या पोरांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळावा म्हणून मोफत शिकवणी घेणारे मास्तर अजून आहेत …..अन्नदान करणारे आहेत, देहदान करणारे आहेत, रक्तदानकरणारेआहेत ,…..दुर्जनांच्या रांगेत जसे आहेत तसेच सज्जनांच्या रांगेतही खूप जण उभे आहेत रस्त्यावरच्या लेकराला उचलून आणून आपलं लेकरू म्हणून सांभाळणारी पाळणाघर आहेत ती चालवणार्या आया आहेत…! काळ्या , शेंबड्या पोराचा मुका घेणारी आई जोपर्यंत या देशात आहे ना तोपर्यंत इथली कुटुंब संपणार नाहीत…. माया संपणार नाही …आणि संस्कार ही संपणार नाहीत..! क्लास वाले कितीही उदंड होत देत ज्ञानदान करणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या मातृभाषेतल्या शाळा टिकणार आहेत ….तर तू अशी तुझं पान सोडून जाऊ नकोस शपथ आहे तुला… तीही एका शिक्षकाची…! तू सोडून गेलीस ना तर ही पिढी घडवणाऱ्या आम्हा सगळ्यांचा विश्वास संपेल !…जा परत जा पुस्तकाच्या पहिल्या पानावर विराजमान हो..तू ही रक्तात भिनशील … लक्षात ठेव…!

मी डोळे पुसले आणि प्रतिज्ञा पुन्हा पानावर होती मी तिचे मोठ्यांदा वाचन करू लागले भारत माझा देश आहे……!

शीला पतकी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर8805850279

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button