सामाजिक
अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे लेखी निवेदन माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली असता अत्यंत गंभीर परिस्थिती निदर्शनास आली आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता त्यांच्या व्यथा, अडचणी व आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आले. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाणीटंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे.अशा परिस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आधार मिळणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केली. या निवेदनामध्ये तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने शासनस्तरावर पाहणी करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासन नियमानुसार नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना पीक विमा व इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, जनावरांसाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात व चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी, पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना कर्ज वसुलीबाबत आवश्यक दिलासा देऊन शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून विशेष मदत पॅकेज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.
तालुक्यातील शेतकरी अत्यंत अडचणीच्या काळातून जात आहे. शासनाने या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा द्यावा,आपल्या स्तरावर आपण तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय व आधार द्यावा अशी विनंती माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी नंदनवन येथे भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.




