क्राईम
अक्कलकोटात किरकोळ भांडणाच्या रागातून तरुणाचा खुन करून मृतदेह टाकला विहिरीत , अक्कलकोट उत्तर पोलिसांनी १८ तासात लावला खुनाचा छडा !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरात किरकोळ भांडणाच्या रागातून तरुणाचा खुन करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तपास करून १८ तासात खुनाचा छडा लावला. या खुनातील तीन आरोपीना पोलीसानी अटक केली असून यातील एक आरोपी ही तरुणी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खूनामुळे अक्कलकोट शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गौरीशंकर भरमशेट्टी यांचे किणी रोड, अक्कलकोट ग्रामीण शिवारातील शेतातील विहिरीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन दोन पंचासमक्ष पंचनामा करून सदर अनोळखी इसमाचे प्रेत विहिरीतून बाहेर काढून पोलीस ठाणेस अकस्मात मयताची नोंद केली. सदर मयताचे उजव्या हातावर इंग्रजीमध्ये Sagar डाव्या हातावर मराठीत आई तसेच वाहनाच्या गिअरचे गोंदण मिळून आले. पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे सदर मयताची ओळख पटवली असता सदरचे मयताचे नांव सागर श्रीशैल व्हनचेंजे, ( वय २७ वर्षे, रा. दहिटणेवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) असे असल्याचे निष्पन्न झाले. मयताचे कपाळावर व डोकीस जखम दिसून आले. सदरचा प्रकार खुनाचा असल्याचा संशय आले. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून राजेंद्र.टाकणे. उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण विभाग व अक्कलकोट शहर बीट चे पोलीस अंमलदार यांचे कडून खबरीकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून दोन संशयीतांना ताब्यात घेवून त्यांचे कडे चौकशी करून खुनाचा उलगडा केला आहे.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वा. कारंजा चौक, अक्कलकोट येथे मयत सागर व्हनचेंजे याचा यातील आरोपी नामे श्रुती यार्रोळे, नागनाथ बनसोडे व बाळू शिंदे यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वा. सुमारास कारंजा चौक येथे झालेल्या वादानंतर श्रुती यार्रोळे, नागनाथ बनसोडे व बाळू शिंदे यांनी मयत सागर श्रीशैल व्हनचेंजे याचा खून करण्यासाठी त्याला जुना किणी रोड परिसरातील शेतामध्ये नेवून मयत सागर व्हनचेंजे याला या तिघांनी मिळून भरपूर दारू पाजली. जेव्हा सागर व्हनचेंजे यास दारुची नशा चढली. तेव्हा त्या परिस्थितीचा फायदा घेवून आरोपी नागनाथ बनसोडे याने त्याचे हात धरले, आरोपी बाळू शिंदे याने त्याचे पाय धरले व आरोपी श्रुती यार्रोळे हिने मोठा दगड सागर व्हनचेंजे याचे डोक्यात मारून त्याचा खून केला. व तिघांनी संगनमताने मृतदेह अमर गौरीशंकर भरमशेट्टी यांच्या शेतातील विहिरीत टाकून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला. गुन्हा घडले घटनास्थल ठिकाणचे विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे वरील आरोपींकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी किरकोळ वादावरून मयत सागर व्हनचेंजे याचा तिघांनी मिळून खून केल्याचे कबूल केले आहे. त्याप्रमाणे पोहेकॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेस गु.र.नं. ४३९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३( २),२३८, ३( ५ ) प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी .अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, श्री.कबाडे . अतिरिक्त पोलीस अधिकक्षक . सोलापूर ग्रामीण व राजेंद्र टाकणे उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार, सहा. पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोहेकॉ मल्लीनाथ कलशेट्टी, पोहेकॉ असिफ शेख, पोहेकॉ गणेश अंगुले, मपोहेकॉ ज्योती मोरे, पोकॉ श्रीकांत जवळगे, पोकॉ केदारनाथ सुतार, पोकॉ महादेव शिंदे, मपोकॉ विजयलक्ष्मी शिवुर यांचे पथकाने यशस्वीरित्या तपास केला आहे.अक्कलकोट उत्तर पोलिसांनी १८ तासात खुनाचा छडा लावल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.




