थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील

”बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही” हे तत्व समजून घेऊन, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झटणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 22 सप्टेंबर ही जयंती. सन १९२४ मध्ये त्यांनी “शाहू बोर्डिंग हाऊस” ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती.
मुळचे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री या आडवळणाच्या गावचे रहिवासी असणारया एका जैनधर्मीय कुटुंबातल्या पायगोंडा आणि गंगुबाई या दांपत्याच्यापोटी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेबर १८८७ रोजी एका मुलाचा जन्म झाला, त्यावेळेस त्यांना वाटले सुद्धा नसेल की आपला हा मुलगा ऐतिहासिक असं समाजकार्य करून आपलं नाव अजरामर करेल. त्या मुलाचे नाव भाऊराव ! आपल्या अलौकिक व ऐतिहासिक अशा समाजकार्यामुळे हा मुलगा पुढे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून जनमाणसाच्या हृदयात विराजमान झाला…
कर्मवीरांचे पूर्णनाव भाऊराव पायगौंडा पाटील. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी दक्षिण कन्नड मधून महाराष्ट्रात आले. व ऐतवडे बुद्रुक जि.सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे मुळचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले.
कर्मवीर अण्णांचे लग्न त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोजचे. तर माहेरचे आडनाव पाटील होते, जे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांनी आपण होऊन सौ. लक्ष्मीबाई यांना १२० तोळे सोन्याचे दागिने केले होते. हे दागिने पुढे लोकशिक्षण आणि वसतिगृहे यावर खर्ची पडले हे वेगळे सांगायला नको. आपले शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर अण्णा कोरेगावला आले कारण त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई या कोरेगावात होत्या. याच काळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. कार्यक्रमानिमित्त घरी पाहुणेमंडळी आली होती. जेवणाचा बेत होता.पाहुणे मंडळी जेवायला बसली. कर्मवीरांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई वाढत होत्या. गप्पा सुरू होत्या. एका पाहुण्याने विचारले, ‘आपले चिरंजीव भाऊराव काय काम करतात? भाऊरावांचे वडिल म्हणाले. “ काही काम करत नाही तो एकच काम करतो. दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्यांचं !” बायकोच्या देखत झालेला अपमान भाऊरांवाच्या जिव्हारी लागला. त्यांच्या पत्नीच्रेही डोळे भरून आले. त्या भाऊरावांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले. मनाचा निश्चय केला . काहीतरी करून दाखवलेच पाहिजे असा मनाचा निर्धार करून तडक कोरेगाव ते सातारा अंतर पायी चालत आले. खिशात पैसा नाही. पूर्वी मुंबईच्या माणिकचंद पानाचंद या जवाहि-याकडे मिळालेले काम आपण सोडून आलो हा मूर्खपणा केला असे त्यांना वाटु लागले.त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली. शिकवण्या घेण्याची. त्यांनी संकल्प सोडला. भाऊरावांच्या अंगी एक गुण होता.एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा. मग कितीही कष्ट पडोत. शिकवणी वर्ग सुरू केले. हळूहळू मुले वाढू लागली, बोलता बोलता मासिक उत्पन्न ९०-९५ रूपयांपर्यंत गेले. पुढे उभयता दोघेही सातारयाला आले.
अगदी संस्कृतच्या देखील शिकवण्या त्यांनी घेतल्या आणि त्यात त्यांच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले, अण्णांकडे जिद्द व चिकाटी असल्यामुळे हे शक्य झाले. त्याकाळी मुलांना शिक्षणासाठी दूरगावी जावे लागे. मुलांची रहण्याची सोय व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा, मदृवाण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर इ. मंडळीनी १९१० साली ‘ दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वसतीगृह पेठ नेर्ले या गावी सुरू करण्यात आले. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हेच रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे होय.
महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी “महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज” सुरू केले. सन १९४० मध्ये “महाराजा सयाजीराव हायस्कूल” व सन १९४७ मध्ये “छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज” त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला आदर्श मानून आपले जीवन व्यतीत करणारया भाऊरावांवर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारांचाही खूप प्रभाव होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे कामही कर्मवीरांनी पुढे चालू ठेवले होते. ४ ऑक्टोंबर, १९१९ रोजी (विजयादशमी) काले, जि. सातारा येथे सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेत कर्मवीरांनी ‘ रयत शिक्षण संस्था ’ स्थापण्याची घोषणा केली. त्यासाठी वसतिगृह सुरू केले. १९०८ साली कर्मवीर अण्णा ‘मिस क्लार्क होस्टेलच्या ’ नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अस्पृश्यांसाठी हे वसतिगृह राजर्षी शाहू महाराजानी सुरू केले होते. तेथे सर्व जातीधर्मातील लोक उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर वसतिगृहात आले. वसतिगृह प्रमुखांनी त्यांना आंघोळ करून वसतिगृहात येण्याची ताकीद दिली..अर्थात ते कर्मवीरांनी ते जुमानले नाही. “ मी सकाळी आंघोळ केली आहे. व पुन्हा आंघोळ करणार नाही दलितही माणसे आहेत, घरात कुत्री, मांजरे आलेली चालतात. आणि माणसांचा विटाळ कसा होतो ? आंघोळ केल्यावर विटाळ कसा काय जातो ? ” अशा बे शिस्त वर्तनाबद्दल कर्मवीरांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. आपली मते ते ठामपणे मांडत आणि त्यावर ते निश्चयपुर्वक अंमल करत असत. याचे मुळ त्यांच्या बालपणात आहे. अगदी किशोरवयातच त्यांचा स्वभाव बंडखोर असा होता. कर्मवीरांच्या बालपणी कुंभोज भागात ‘ सत्याप्पाचे बंड ’ हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणा-या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला, रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला. तो कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या ऊसाच्या फडात लपून बसे. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवी. पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे. बंडखोरी, सत्यनिष्ठा, अन्यायाविरूध्द चीड हे सदगुण सत्याप्पाकडून भाऊरावांना मिळाले.त्यामुळेच अन्याय झाल्यास त्यांना संताप येत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल- कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहात होते. त्याकाळात ते शाहू महाराजांच्या कार्याने आणि विचारांनी भारावून गेले होते.
भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम भाऊरावांमध्ये होता.
रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मागासवर्गीयांना विनाशुल्क शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, सर्व जाती-धर्मांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून सामाजिक सुधारणांसाठी जुन्या कालबाह्य प्रथा, रूढी- परंपरा, चालीरीती बंद करणे. एकत्र काम करण्यावर भर देऊन विद्यार्थ्यांना चांगले वळण लावताना संस्कार देणे. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्व पटवताना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे करत असताना शैक्षणिक शाखांचे विशाल विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे मोठे कार्य कर्मवीरांनी एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे पार पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक पटलावर त्यांचा जो अद्भुत ठसा उमटला तो आजही अबाधित आहे.
या सर्व कार्यात त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची अगदी मोलाची साथ लाभली. त्या अगदी खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी राहिल्या, त्यांची सुखदुःखे त्यांनी आपली मानली. त्यांचा स्वभावदेखील कर्मवीरांसारखाच होता याची प्रचीती देणारी एक घटना सांगावीशी वाटते. एकदा निवासी वसतीगृहातील एक मुलगा आजारी पडला होता. कर्मवीर बाहेरगावी होते. सौ. वहिनी त्या मुलाची देखभाल करीत होत्या. अशा वेळी सौ.वहिनीच्या घरून तार आली, “ आई फार आजारी आहे ; लवकर निघून यावे,” सौ. वहिनींनी उलट तार केली. “ वसतीगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे. भाऊराव बाहेरगावी गेले आहेत. ते आले की मी येईन.” कर्मवीर आल्यानंतर सौ. वहिनी आईस भेटावयास गेल्या. आपल्या कार्यालाच आपलं कुटुंब मानण्याचा त्यांचा हा दुर्मिळ वत्सलभाव त्यांच्या कर्तुत्वास बहर आणण्यास खूप उपयुक्त ठरला.
सामाजिक कार्य करताना त्यांच्या मनावर महात्मा फुलेंचा जबरदस्त प्रभाव होता. भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ३८ वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच ५७८ शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, १०८ हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू केली. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना “कर्मवीर’ ही पदवी दिली. कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे. रयत शिक्षण संस्था ही तिच्या बोधचिन्हांसारखीच आपली पाळेमुळे खोलवर असणारया एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षासम सकळ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आपली विशाल छत्रछाया देऊन आजही नम्रतेने उभी आहे सन १९५९ मध्ये कर्मवीर भाऊरावांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्याचवर्षी भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नवीन पिढीला त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि कर्तुत्वाची माहिती असणे दिशादर्शक ठरू शकते.




