सांस्कृतिक

सुने सुने माळरान…!

 

चिंब पावसानं रान आबादानी झालेलं असताना आणि मनही पावसाळी असतानाच इथला मुक्काम हलवणं, हे त्यांच्या प्रकृतीला साजेलसं. या नभाने या भुईला दान दिल्यानंतर मातीतून चैतन्य गात असताना, जोंधळ्याला चांदणे लगडून जाणे स्वाभाविकच. बाहेर पाऊस जिवाच्या आकांताने कोसळतोय आणि इथे मनामनात नभ उतरू आलेत!

ना. धों. महानोर नावाचा माणूस आता आपल्यामध्ये असणार नाही, या कल्पनेनेच हिंदोळ आभाळभर झाला आहे. रानात रमलेला आणि शेताने लळा लावल्यानंतर त्या हिरव्या बोलीचा शब्दच होऊन गेलेला हा कवी. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘रानातल्या कविता’ १९६७मध्ये आला, तो काळ जगभर स्वप्नांचा पाठलाग करण्याचा होता. पु. शि. रेगे, बा. सी.मर्ढेकर अशा कवींनी मराठी साहित्यात वेगळा प्रवाह निर्माण केला. त्यानंतरची साठोत्तरी कविता आपली वाट शोधत होती. साधीसुधी माणसेही बोलू लागली होती. ‘सारस्वतांनो माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे’, असे म्हणत नारायण सुर्वेंसारखे कवी लिहू लागले होते. काहींवर मागच्या पिढीचा प्रभाव होता, तर काहींना युरोप-अमेरिका अथवा सोव्हिएत रशिया खुणावत होती. साठचे दशक हा मराठी साहित्यासाठीचा अभूतपूर्व काळ होता.

अशावेळी १९६७मध्ये महानोरांच्या ‘रानातल्या कविता आल्या नि या कवितेने सगळ्यांना थक्क करून टाकले. मातीत उगवलेली आणि आकाशाला गवसणी घालणारी ही कविता अनवट तर होतीच, पण अगदीच नवीकोरी होती. घन ओथंबून आल्यासारखी ही कविता आली आणि तिच्यामुळे मराठी कवितेचंच अंग झिम्माड झालं. ही हिरवीकंच कविता तिची प्रतिमासृष्टी घेऊन मराठी मुलुखात उतरली. असं उधाणवारं ती घेऊन आली की, ‘मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी’ अशी स्थिती व्हावी! रसरशीत निसर्गभान जागवत या कवीने निसर्ग आणि कविता यांच्यात असं अद्वैत निर्माण केलं की, या कवितेसोबत निसर्ग साद घालू लागला आणि निसर्गासोबत असताना त्यात माणूस दिसू लागला. या कवितेमुळं मराठी साहित्यानं कात टाकली आणि रातही टाकली!

‘रानातल्या कविता’ आणि ‘वही’ या कवितासंग्रहांनंतर महानोरांकडे सिनेमावाल्यांचं लक्ष गेलं. त्याचं कारण तसंच होतं. महानोरांच्या कवितेला अंगभूत लय. लोकगीतांशी, मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा तर महानोरांच्या कवितेत आहेच. शिवाय, नव्या अनुभवासोबत नवे रूप घेणारी चित्रमयताही ठायी ठायी आहे. गदिमा, पी. सावळाराम, शांता शेळके असे दिग्गज कवी चित्रपटांसाठी गाणी लिहित होते, तेव्हा ‘जैत रे जैत’साठीची गाणी महानोरांनी लिहावीत, असे संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना वाटले. आणि, महानोरांसाठी नवे जग खुले झाले. गो. नी. दांडेकरांची कादंबरी. सतीश आळेकरांची संहिता. जब्बार पटेलांसारखा दिग्दर्शक. हृदयनाथ मंगेशकर संगीतकार. निळू फुले, डॉ. मोहन आगाशे आणि साक्षात स्मिता पाटील यांच्या भूमिका असा हा चित्रपट. त्याला महानोरांची गाणी मिळाली आणि ‘जैत रे जैत’ अजरामर झाला.

भवतालाशी नातं सांगणारा हा कवी फक्त शब्दांचा फुलोरा फुलवणारा नव्हता. ‘सरलं दळण, ओवी अडली जात्यात’ असं दुःख कवितेतून मांडणा-या महानोरांना व्यापक सामाजिक भान होतं. शेतकरी, श्रमिक, कामगार, स्त्रिया यांच्या प्रश्नांचं आकलन होतं. त्यातूनच यशवंतराव चव्हाण, शरद पवारांशी त्यांचे सूर जुळले. महानोर विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले आणि त्यांनी अनेक दुर्लक्षित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी शेतीविषयक लिहिले. पर्यावरणाविषयी लिहिले. समीक्षा केली, संपादन केले. ‘गांधारी’सारखी कादंबरी लिहिली. पण, कवी आणि गीतकार हे त्यांचे रूप महाराष्ट्राने हृदयात साठवून ठेवले.

भरभरून जगणारा, मुसळधार कोसळणारा आणि मातीशी इमान असणारा असा भन्नाट माणूस होता हा. त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसंच रांगडं होतं. शेतीत ते असे रमले की खूपदा आमंत्रणं येऊनही त्यांनी शहरात ‘सेटल’ व्हायचं नाकारलं. मुळात ‘सेटल’ होणं हा काही महानोरांचा स्वभाव नव्हता. ते सदैव वाहणारे, फुलणारे आणि फुलवणारे. नवे पेरत राहाणारे. महानोर आले म्हणजे मैफल सुरू होणार, याची खात्रीच असायची. हातातल्या वहीवर ठेका धरत ते गाऊ लागायचे, तेव्हा अवघे श्रोते जागीच ताल धरायचे. कारण, त्यांच्या कवितेला चव होती. तिला स्पर्श करता यायचा. ती लख्ख दिसायची. जाणवायची. ऐकू यायची. अशा कवितेवर कोण प्रेम करणार नाही? नामदेव धोंडू महानोर नावाचा कवी अंगात भिनत गेला, त्याची ही कारणपरंपरा.

‘या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस की मोहाच्या झाडालाही मोह व्हावा’, अशी शब्दकळा नि प्रतिमासृष्टी ज्याची असेल, त्याच्या प्रेमात कोण नाही पडणार? बाजिंदी मनमानी करू शकणारा हा असा कवी होता की, प्रेमावरच त्याचं विलक्षण प्रेम होतं.

अजिंठ्याशेजारी पळसखेड हे त्यांचं गाव. शेजारच्या अजिंठ्यानं त्यांना खुणावलं. रॉबर्ट गिल आणि पारोच्या प्रेमाच्या प्रेमात ते आकंठ बुडाले. या प्रेमानं त्यांना दीर्घकविता लिहायला भाग पाडलं. एक दिग्दर्शक त्या कवितेच्या एवढा प्रेमात पडला की, त्यानं ‘अजिंठा’ नावाचा भव्य चित्रपट केला या कवितेवर. नितीन चंद्रकांत देसाई हाच तो स्वप्नवेडा दिग्दर्शक. परवा नितीन देसाई गेल्याची बातमी आली. आता महानोरही आपल्यासोबत असणार नाहीत…!

पण, महानोर जातील कुठे? फाटकी झोपडी हे ज्याचे काळीज आहे आणि या रानात ज्याचे प्राण गुंतलेले आहेत, ते काळीज आणि प्राण हिरावून नेण्याची हिंमत कोणामध्ये आहे? शब्दगंधेच्या बाहूत महानोर विसावले आहेत. नभ उतरू आले आहेत. पंखावरती हे नभ पांघरून हा कवी चांदण्यात न्हाण्यासाठी निघाला आहे… पाऊस कसला कोसळतो आहे!

– संजय आवटे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button