सांस्कृतिक

स्वर सम्राट किशोर कुमार

स्वरांचा सम्राट
सूर स्वरांची देणगी लाभलेला बहुरंगी आवाजाचा गायक ज्यांच्या स्वरांनी लक्षावधी रसिकांची हृदय जिंकून घेणारा स्वर सम्राट तसेच “कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना” या ओळींना केवळ गाणे न मानता आपल्या आयुष्याचे तत्त्वज्ञान बनवणाऱ्या किशोर कुमार यांचा आज ९७ वा जन्मदिन.
किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली होते .अशोक कुमार, अनुप कुमार यांचे ते बंधू. शालेय जीवनापासूनच किशोरदा अत्यंत खोडकर आणि जिद्दी होते. ते गणिताच्या
उत्तर पत्रिकेत कविता लिहायचे. चित्र, विचित्र, रंगीबेरंगी कपडे घालून कॉलेजला जायचे. मित्रांना हसवणे, नकला करणे, शिक्षकांच्या खोड्या काढणं हा त्यांचा स्वभाव. प्राचार्यांच्या तक्रारीमुळे वडिलांनी त्यांना मुंबईला अशोक कुमार यांच्याकडे पाठवलं. अशोक कुमार यांना वाटायचे की आभास कुमारांनी अभिनय करावा पण त्यांना गाण्याची ओढ होती. तरीही मोठ्या भावाच्या आग्रहाखातर त्यांनी “शिकारी” या चित्रपटांमध्ये सैनिकाची भूमिका साकारली. अशोक कुमार यांनी त्यांचे नाव आभास कुमार बदलून किशोर कुमार ठेवले. किशोरदानी गाण्याचा रियाज सुरू ठेवला. के . एल.सहगल यांच्या हुबेहूब आवाजात ते गायचे. अशोक कुमार यांनी त्यांना हार्मोनियम घेऊन दिले आणि ते संगीत क्षेत्राकडे वळले. संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या “जिद्दी” चित्रपटात गाण्याची पहिली संधी मिळाली.
संगीतकार एस. डी. बर्मन यांनी त्यांना सहगल यांची नक्कल करण्या ऐवजी स्वतःच्या आवाजात गायला सांगितलं. मग किशोर कुमार यांनी आपल्या आवाजात विविध प्रयोग केले.
“हाफ तिकीट” या चित्रपटात किशोर कुमार आणि लता दीदी यांचं “आके सीधी लगी दिल पर जैसे कटरिया, ओ सावरिया” हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाल. त्यांनी डिस्को, सॅड, रोमँटिक गीत भजनही गायलं. नमक हलाल मधील “पग घुंगरू बांध मीरा नाची थी” हे गाण्यात तर त्यांनी डिस्को आणि रागदारी यांचा मिलाफ केला. मराठी चित्रपट ‘ गंमत जंमत’ मधील “अश्विनी ये ना”प्रचंड गाजलं. “तुझी माझी जोडी जमली” हे गीत त्यांनी गायलं. “याराना” चित्रपटातलं सारा जमाना या गाण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाच्या चढ-उतार खूप भन्नाट आहे. स्वररत्न लता मंगेशकर यांच्याबरोबर किशोर कुमार यांनी गायलेले गाता रहे मेरा दिल, जय जय शिवशंकर, आपकी कसम, आपकी आखो मे कुछ, निले निले अंबर पर, तुम आ गये हो नूर आ गया, तेरे बिना जिंदगी, कोरा कागज था, देखा एक ख्वाब अशी अनेक गीते गायली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे गायिका आशा भोसले यांच्याबरोबरचे हाल कैसा है जनाब का, एक मे और एक तू, इम्तिहान हो गई , एक अजनबी हसीना से, हमे तुमसे प्यार कितना, मेरे नैना सावन भादो, एक चतुर नार अशा अनेक गीतांनी भारतीय संगीतात विक्रम केले.
किशोर कुमार यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली. मराठी गाण्यांचा ही त्यात समावेश आहे. हरहुन्नरी किशोर कुमार यांनी अभिनय, पार्श्वगायन, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका वठवल्या. त्यांना आठ फिल्म फेअर मिळाले. १३ ऑक्टोबर या दिवशी अशोक कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त घरी पार्टी सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण जाता जाता ते अब्जावधी रसिकांच्या जीवनात आनंदाचा संगीतरुपी आनंदाचा श्वास कायम भरून गेले.
सुरांनी रसिकांचे हृदय जिंकणाऱ्या या स्वरांच्या सम्राटाला विनम्र वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button