शैक्षणिक

कबड्डीच्या आखाड्यात रावगावचा दबदबा!

 

मोरवडवर मात करत १४ वर्षे गटाचे तालुकास्तरीय विजेतेपद; जिल्हास्तरीय फेरीत दिमाखात प्रवेश

करमाळा ( प्रतिनिधी ): मागील वर्षी अंतिम सामन्यात थोडक्यात हुकलेले विजेतेपद यंदा आपल्या नावे करत पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगावच्या १४ वर्षे वयोगटातील कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रावगावच्या शिलेदारांनी आपल्या भक्कम खेळाच्या जोरावर मोरवडच्या संघाला नमवत विजेतेपदाला गवसणी घातली. या दिमाखदार विजयासह रावगावच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेची पात्रता मिळवत पुढील आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

मागील वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रावगावच्या संघाला अत्यंत चुरशीच्या लढतीत थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्या अनुभवातून प्रेरणा घेत खेळाडूंनी यंदा अधिक जिद्दीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केली. नियमित सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर रावगावच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाची प्रभावी छाप पाडली.

स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात रावगावच्या खेळाडूंनी आक्रमणातील चपळाई, बचावातील भक्कमपणा आणि उत्कृष्ट संघसमन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. अंतिम सामन्यातही सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळ करत रावगावच्या संघाने सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले. आक्रमक खेळाडूंच्या प्रभावी चढायांना बचावफळीची भक्कम साथ मिळाल्याने रावगावने अखेर विजेतेपदावर मोहोर उमटवली.

या विजेत्या संघामध्ये सलमान शेख, सोहम धगाटे, सोहम शेळके, सार्थक शेळके, स्वराज सोलंकर, साजिद शेख, मोहम्मद शरीफ वल्ली शेख, साईनाथ जाधव, समर्थ सोलंकर, अनिरुद्ध शेळके, श्रीनाथ धगाटे, सार्थक साबळे आणि विशाल पाडुळे या खेळाडूंचा समावेश होता.

विजेत्या संघाला श्री. प्रताप बरडे, ॲड सुहास कानगुडे, श्री. रुपेश मोरे, श्री. सुरेश अण्णा बरडे आणि बुद्धभूषण कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव काकडे आणि सचिव भैय्यासाहेब काकडे, शाळेचे मुख्याध्यापक . विजय कोळेकर त्याचबरोबर रावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, आजी-माजी पदाधिकारी, समस्त पालक व ग्रामस्थ यांनी विजेत्या खेळाडूंसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

रावगावच्या या विजयी संघाकडून आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, या विजयामुळे शाळेसह संपूर्ण रावगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button