सोलापूर
तांत्रिक निकषाकडे न बघता अक्कलकोट, दक्षिण सोलापूर विशेष बाब म्हणून ‘दुष्काळ’ जाहीर करा ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
: केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी सलग किमान २१ दिवसांचा पावसाचा खंड हा महत्त्वाचा निकष आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांत सलग २० दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर २०व्या दिवशी केवळ २.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा सुमारे २० दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे सध्याच्या निर्धारित तांत्रिक निकषांनुसार दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या निकषात बसतात की नाही याचा विचार न करता विशेष बाब म्हणून दुष्काळ जाहीर करावेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.
सलग पावसाचा खंड, अत्यल्प पर्जन्यमान, खालावलेली भूजल पातळी आणि कोरडे पडलेले तलाव व जलसाठे यामुळे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक निकषांचा आधार न घेता दोन्ही तालुके विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (ता. २३) निवेदन दिले.
.मात्र, केवळ २.५ मिलिमीटर पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढलेली नाही. उलट दीर्घकाळचा पावसाचा खंड, अत्यल्प पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी तसेच तालुक्यातील तलाव व जलसाठे कोरडे पडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे कागदावरील निकषांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे, असे कल्याणशेट्टी यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.दोन्ही तालुक्यांतील भौगोलिक व पर्जन्यमानाची स्थिती, उपलब्ध जलसाठा, भूजल पातळी आणि निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती यांचा सर्वंकष विचार करून विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.



