राजकीय
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पारंपारिक लढतीचीच शक्यता !

प्रादेशिक पक्षांची जोरदार तयारी
अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड )सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपा महायुती विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी अशी पारंपारिक लढत होणार असून भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेस पक्षाचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ही पारंपारिक लढतीची शक्यता अधिक असल्याचे दिसत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रादेशिक पक्षांनी उमेदवार उभे करण्यासाठी जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदार संघात भाजपा महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी यांची मोर्चे बांधणी सुरू आहे .भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची संख्या वाढली असली तरी भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेस पक्षाचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातच सामना रंगण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाकडून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर , शिवसेना ठाकरे गटाकडून आनंद बुक्कानुरे , बहुजन नेते बाळासाहेब मोरे , आरपीआयचे अध्यक्ष अविनाश मडीखांबे , वंचित बहुजन आघाडी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदिनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षाकडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोबतच माजी आमदार सिद्रमप्पा पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांचेही नाव चर्चेत आहे .अक्कलकोट तालुक्यातील सर्वच इच्छुक नेत्यांनी तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी तयारी सुरू केली असून त्यांचे मुंबईचे दौरे वाढले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडी कडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव आघाडीवर असून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाचे तिकीट हे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रादेशिक पक्षानी मोर्चे बांधणी सुरू केली आहे .वंचित बहुजन आघाडी कडून सक्षम उमेदवार देणार अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे हे तिकीट मागणीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर रासपाचे नेते सुनील बंडगर यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असे सांगितले आहे. बहुजन नेते बाळासाहेब मोरे यांनी नुकतेच मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तिकिटाची मागणी केली आहे. आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनीही पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढविणार असे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली असून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदर नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता असून इच्छुक हे रिंगणात उतरणार की माघार घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मात्र पारंपारिक नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे.



