राजकीय
अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असून मोठा जनाधार असलेल्या काँग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली आहे .अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान काँग्रेस पक्षश्रेष्ठ समोर असणार आहे. काँग्रेस पक्षाला उभे राहण्यासाठी समविचारी पक्षांसोबत तडजोड करावी लागणार असून याबाबत काँग्रेस पक्षाचे नेते कोणता निर्णय घेणार हे आगामी काळात पाहणे गरजेचे आहे.
अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात नुकत्याच जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले. त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने तालुक्यात चांगली कामगिरी करत दबदबा निर्माण केला आहे. पण काँग्रेस पक्षाचे मोठी वाताहत मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाली आहे. एकेकाळी अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेस पक्षाची मोठी दयनिय अवस्था झाली आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या वार्ता आल्यानंतर ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गांभीर्याने घेतले नाही. सध्या अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नसल्याने हा पक्ष पुढील काळात अक्कलकोट तालुक्यात बॅक फुटला गेलेला दिसेल. अक्कलकोट , मैंदर्गी , दुधनी या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मानहानिकारक पराभव झाला आहे. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत केवळ दोन नगरसेवक विजय झाले आहेत. मैंदर्गी आणि दुधनी नगर परिषद निवडणुकीत तर एक ही सदस्य निवडून आणता आले नाही. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीमध्ये एक ही सदस्य काँग्रेस पक्षाचा विजयी झाला नाही. अक्कलकोट तालुक्यातील विद्यमान काँग्रेस नेत्यांनी समाजातील सर्व घटकातील युवकांना नागरिकांना पक्षात सामावून घेणे गरजेचे आहे. तसेच समविचारी पक्षांशी युती करून आपली ताकद कायम राखण्याच्या आव्हान काँग्रेस पक्षासमोर असणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्ष नेतृत्व अभावी भरकटलेला असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांना सोबत घेणे काँग्रेस पक्षाच्या फायद्याचे ठरणार आहे. पण स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या पराभवाला काँग्रेस पक्षात सामोरे जावे लागले. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार हा मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षांकडे वळला आहे. या मतदारांना पुन्हा काँग्रेस पक्षाकडे वळविण्याची मोठी कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला दारूण पराभव लक्षात घेऊन वरिष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सर्व समाजातील नागरिकांना विविध पदांवर संधी द्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पराभवाचे आत्मचिंतन करून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पक्ष बांधणीचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.




