सामाजिक

आधुनिक तंत्रज्ञानासह तरुणांनी देशसेवेस सज्ज व्हावे- भारतीय सेनाधिकारी कर्नल कुलदीप करपे यांचे आवाहन

 

शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा उत्साहात साजरा

करमाळा ( आयुब शेख )प
साडे (ता. करमाळा) येथे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यास भारतीय सेनेचे अधिकारी कर्नल . केदार भिडे व कर्नल  कुलदीप करपे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान द. सो. पं. समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भूषवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय प्रा. गणेश करे-पाटील यांनी करुन दिला .
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून एन.सी.सी. कॅडेट्ससह श्रद्धांजली वाहिली.
कर्नल कुलदीप करपे यांनी आपल्या स्फूर्तिदायी भाषणात तरुणांना देशसेवेसाठी सज्ज होण्याचे आवाहन करताना आगामी काळात देशाच्या सुरक्षेपुढे उभ्या राहणाऱ्या आधुनिक आव्हानांचा उल्लेख केला. तंत्रज्ञानाधारित युद्धपद्धती, सायबर सुरक्षा, दहशतवाद व सीमासुरक्षेतील बदलती परिस्थिती यांचा सामना करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध व देशभक्त तरुणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, नैतिक मूल्ये व राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे आवाहन करत त्यांनी तरुणांनी सैन्य व सुरक्षादलांमध्ये करिअर करण्याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कर्नल केदार भिडे , गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसिलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, डॉ. अॅड बाबुराव हिरडे,, श्री. अवचर साहेब, प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ. प्रचिती पुंडे यांनी शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीस पोडियम भेट स्वरूपात प्रदान केले. या पोडियमचा उपयोग भविष्यात विविध कार्यक्रमांमधून सक्षम व प्रभावी वक्ते घडविण्यासाठी होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमशील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
या समारंभ प्रसंगी सामाजिक दायित्वासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शहीद स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये पोलीस निरीक्षक रणजित माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, ग्रामीण भागातील नागरिक सेवेसाठी गुलाबराव देवकते, प्रसिद्ध पक्षी अभ्यासक प्रा. कल्याणराव साळुंके, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, आदर्श सैनिक किरणजी ढेरे व आदर्श कला शिक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता.
तर उपक्रमशील शाळा पुरस्कार पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्र. १ यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन साडे ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या स्मृतीदिन कार्यक्रमास कर्नल केदार भिडे, कर्नल कुलदीप करपे, प्रोलक्स वेलनेस प्रोडक्शन प्रा. लि.च्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. अॅड. बाबुराव हिरडे, सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, जिल्हा इंग्रजी लँग्वेज असो.चे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, जीवन शिक्षणचे अध्यक्ष जयेश पवार, योध्दा अॅकॅडमीचे नवनाथ नाईकनवरे, वीर पिता अरविंद निलंगे व वीर माता अनुजा निलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे, सातारा, धाराशिव येथून विशेष निमंत्रित तसेच करमाळा तालुक्यातील आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गाडेकर यांनी केले, तर अक्रूर शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button