अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मोदी हटाव, देश बचाव; एपस्टीन फाइल्स, व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन
मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित ‘एकतर्फी’ व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पार पडले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच मातंग मुक्ती सेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
महाआंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कथितरित्या एपस्टीन फाइल्समध्ये झाल्याचा दावा करत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली. अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनाला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस-इस्राईल संबंध, परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे करार यावर टीका केली. “भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा देशाच्या हिताविरोधात आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच एपस्टीन प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आखाती देशांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशांत कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.
देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या देशासमोर नाचतो त्याचा प्रश्न इथला मीडियाचा मालक विचारत नाही. त्यांना आमचा सवाल आहे, लोकांचा रोष शिगेला पोहोचताना दिसतोय. त्याला तुम्ही दाखवणार आहेत की नाही? असा सवाल उपस्थित केला.
देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
या आंदोलनादरम्यान सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईसह उपनगरांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रुपवते, दिशा पिंकी शेख, सुजात आंबेडकर, चेतन अहिरे, स्नेहल सोहनी, सागर गवई, राजेंद्र पाटोडे, नीलेश विश्वकर्मा, अशोक साबळे, कॉ. मिलिंद रानडे, आतिक दफेदार, अविनाश भोसीकर, सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



