क्राईम

आळगी येथे ऊसाच्या शेतात तब्बल १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त

२४० गांजाची झाडे जप्त; अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथे ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २११ किलो १०० ग्रॅम वजनाची २४० गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते.
२८ सप्टेंबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आळगी येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित शेतात कारवाई केली.
पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी सुमारे १२ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. पंचनाम्याअंतर्गत केलेल्या कारवाईत एकूण २४० झाडे मिळून आली. त्यापैकी २१० झाडे जिवंत तर ३० झाडे वाळलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या झाडांचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम भरले.
या प्रकरणी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी ऊर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोहेकॉ मोसलगी, पोहेकॉ चिंचोलकर, पोकॉ कोळी, पोकॉ धुमाळ, पोकॉ डोंगरीतोट, मपोकॉ हडपद, चामपोकॉ धनगर, पोकॉ/कोळी, पोकॉ सुर्यवंशी, पोहेकॉ पाटील, पोहेकॉ बिराजदार, पोकॉ अन्सारी, पोकॉ शिंदे, पोकॉ पवार, पोकॉ डोंगरीतोट, पोकॉ माने, पोना कोले यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button