क्राईम

परंड्यात खळबळजनक: ४३ ऊसतोड कामगारांना डांबून ठेवून अमानुष छळ; वेठबिगारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

परंडा ( फारूक शेख .)
काम देण्याच्या बहाण्याने तब्बल ४३ ऊसतोड कामगारांना परंडा तालुक्यातील कौडगाव येथे आणून, त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये व घरात कुलूप लावून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामगारांकडून दररोज १६ ते १७ तास सक्तीने काम करून घेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदु इंगाप्पा यतनाळकर (वय ३३ वर्ष, रा. गांधीनगर, जिल्हा विजापूर, कर्नाटक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी शिवाजी सोमनाथ देवकर आणि समाधान अशोक पाडुळे (दोघे रा. कौडगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी फिर्यादी व इतर ४२ कामगारांना कौडगाव येथे आणले होते.
दिनांक १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ दरम्यान, आरोपींनी या सर्व कामगारांना पत्र्याच्या शेडमध्ये आणि घरामध्ये दरवाजाला कुलूप लावून डांबून ठेवले होते. दररोज पहाटे ४:३० ते रात्री २३:०० वाजेपर्यंत (१६ ते १७ तास) त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेतले जात होते. या काळात कामगारांना कसलाही मोबदला न देता, त्यांना वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली जात होती.
या नरकयातनेतून मुक्तता झाल्यानंतर फिर्यादीने ३१ ऑक्टोबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १४३(३), १२७(४), ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) सह वेठबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम १९७६ चे कलम १६, १७, १८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईची माहिती मिळताच दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट, पोलीस उपनिरीक्षक बाराते, कामगार अधिकारी आसाराम गावंडे व पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट दिली. धाराशिवच्या पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, परंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशाने पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मुळे करत आहेत. या गंभीर गुन्ह्यामुळे परंडा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे .उसतोड कामगारांना
कामगार अधिकारी गांवंडे  याच्याकडून दोन दिवस जेवन देण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button