क्राईम
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या कारवाईचे कौतुक

आळगी येथे ऊसाच्या शेतातून १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक
अक्कलकोट (प्रतिनिधी ): सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी दक्षिण पोलीस ठाण्यास भेट देऊन आळगी येथे उसाच्या शेतातून एक कोटी पाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आलेला होता त्याची पाहणी केली.यावेळी पत्रकारांशी बोलताना ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या गांजाविरोधी कारवाईचे कौतुक केले. तसेच सोलापूर जिल्ह्यात ही अमली पदार्थ व नशा विरोधी पदार्थांच्या विरोधामध्ये धडक कारवाई करण्यात येत आहे. याबाबतची विस्तृत अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
तालुक्यातील आळगी येथे शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी छापा टाकून गांजाची एकूण २४० झाडे जप्त केली. या गांजाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी न्यायालयीन कोठडीत, तर अन्य दोघे पोलीस कोठडीत आहेत.
आळगी येथील शेतकऱ्याने ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत गांजाची २४० झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट) याला २९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सिद्धराम मलप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ३५) आणि श्रीकांत मलप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ३०, दोघे रा. शेगाव, ता. अक्कलकोट) यांचा शोध घेऊन पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी त्यांनाही अटक केली. हे दोघे सध्या पोलीस कोठडीत असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील तरुणांना नशा व अमली पदार्थाचे सेवन न करण्याचा आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे , सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस हवालदार मोसलगी, चिंचोलकर, पाटील, बिराजदार तसेच पोलीस अंमलदार अन्सारी, धुमाळ, कोळी, डोंगरीतोट, चौधरी, सूर्यवंशी, शिंदे, पवार, माने, कोले, हडपद आणि धनगर आदी उपस्थित होते.



