१३ तासांच्या ठिय्यानंतर आंदोलन स्थगित , पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ऊसदराची निर्णायक बैठक

सोलापूर –
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,४०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन तब्बल १३ तासांनंतर स्थगित करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी निर्णायक बैठक घेण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. ऊसदराचा अंतिम तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याची लेखी हमी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
मात्र, बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने देण्यात आला.
सोमवारी, ऊसदराच्या प्रश्नावर प्रशासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आणि शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये तीन वेळा चर्चा झाली. मात्र, केवळ बैठक घेण्याचे आश्वासन नको, तर ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे लेखी आदेश द्यावेत, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.
अखेर मध्यरात्री दोन वाजता जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलीस आयुक्त एम. राज कुमार आंदोलनस्थळी आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाने बंद ठेवण्याबाबतचे लेखी आदेश शेतकरी प्रतिनिधींकडे सुपुर्द केले. तर १७ पासून १९ नोव्हेंबरपर्यंत ऊसदराचा अंतिम तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद राहतील, असे आदेश स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिल्यानंतरही एखादा साखर कारखाना सुरू राहिल्यास शेतकरी गप्प बसणार नाहीत. संबंधित कारखान्यावर जाऊन तो बंद पाडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.
ऊसदराचा अंतिम तोडगा काढण्यासाठी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहावे, यासाठी प्रशासनाकडून कायदेशीर पत्रे पाठविण्यात आली आहेत. राजू शेट्टीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,४०० रुपये मिळावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. या मागणीवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर बैठकीच्या ठिकाणाहूनच पुढील तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रासपचे नेते महादेव जानकर, विजय रणदिवे, राजेंद्र गडूवर, स्वस्तिक पाटील, सचिन पाटील, दीपक भोसले, तानाजी बागल, अजित बोरकर, घनश्याम चौधरी, प्रकाश बालवडकर, अमर कदम, समाधान फाटे, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.



