दिव्यांग बांधवांचे मासिक पेन्शन ५ ते ६ हजार रुपये करा ,मा आ. चंद्रकांत दानवे यांची दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी
भोकरदन : ( शिवनाथ मोरे ) वाढत्या महागाईच्या काळात दिव्यांग बांधवांना मिळणारे मासिक पेन्शन अत्यंत अपुरे पडत असून त्यांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी मासिक पेन्शनमध्ये वाढ करून ते किमान ५ हजार ते ६ हजार रुपये करण्यात यावे, अशी ठाम मागणी भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथील विधान भवनातून १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनात दानवे यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या महागाईत औषधोपचार, प्रवास, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजा भागविताना दिव्यांग व्यक्तींना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मिळणारे अल्प आर्थिक सहाय्य त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास अपुरे ठरत आहे. त्यामुळे पेन्शन वाढ ही केवळ आर्थिक मदत नसून दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी गरज असल्याचे दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
केवळ पेन्शन वाढीपुरती मागणी मर्यादित न ठेवता दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी शासनाकडे विविध उपाययोजनांची मागणी केली आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीचा प्रभावी वापर करावा, पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत द्यावा, स्वयंरोजगारासाठी विशेष योजना व सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
याशिवाय शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको तर हक्क आणि सन्मान हवा, या भूमिकेतून दिव्यांग बांधवांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मासिक पेन्शन ५ ते ६ हजार रुपये करण्यासह इतर मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आ. दानवे यांनी केली आहे.
या मागणीमुळे भोकरदन-जाफ्राबादसह राज्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून शासन यावर काय निर्णय घेते, याकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.



