सोलापूर

जातीचा गौरव बहुजन समाजाची मृत्युघंटा; बहुजनांनी हे ओळखावे : जावेद पाशा कुरेशी

 

महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या प्रबोधन पर्वात बहुजन विचारांवर परखड भाष्य

सोलापूर (प्रतिनिधी) : बहुजन समाजाने जातीच्या अभिमानात अडकून न पडता महात्मा फुले यांनी मांडलेला व्यापक बहुजन विचार समजून घेण्याची गरज आहे. जातीचा गौरव वाटणे ही बहुजन समाजाच्या एकजुटीची आणि महात्मा फुले यांच्या बहुजन संकल्पनेची मृत्युघंटा आहे, हे बहुजनांनी ओळखावे, असे परखड प्रतिपादन नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक जावेद पाशा कुरेशी यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले जन्म द्विशताब्दी समिती, सोलापूरच्या वतीने आयोजित प्रबोधन पर्वाच्या पाचव्या पुष्पात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे होते.

कुरेशी म्हणाले, महात्मा जोतिबा फुले हे बहुजनवादाचा पाया, छत्रपती शाहू महाराज ही इमारत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनवादाचा कळस आहेत. महात्मा फुले यांनी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्थेवर प्रहार करून अठरापगड जातींच्या एकजुटीची बहुजन संकल्पना मांडली. मात्र, आज बहुजन समाज जातीच्या प्रेमात अडकत चालला आहे. ही बाब बहुजन विचारांच्या मूळ संकल्पनेला छेद देणारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध आणि बहुजन संतांनी सामाजिक क्रांती घडवली. पुढे पुष्यमित्र शुंग याने बौद्ध भिक्खूंची कत्तल करून बहुजनवाद संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महात्मा फुले यांनी पुन्हा बहुजन विचारांना नव्याने जन्म दिला. त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर थेट हल्ला चढवला. शिक्षण ब्राह्मणी वर्चस्वाच्या कचाट्यातून मुक्त करून बहुजन समाजासाठी खुले केले. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.

१८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय स्वरूपावर प्रश्न उपस्थित करताना फुले यांनी तेली, तांबोळी, साळी, माळी, महार, मांग अशा बहुजन समाजाच्या सहभागाशिवाय कोणतीही संघटना राष्ट्रीय होऊ शकत नाही, असा विचार मांडला. हंटर कमिशनसमोर साक्ष देताना सरकारी उत्पन्नाचा पैसा शाळांवर खर्च करण्याची भूमिका त्यांनी मांडली. हाताला लकवा झालेला असतानाही त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहून बहुजन समाजाला वैचारिक आणि सांस्कृतिक हत्यार दिले.

महात्मा फुले यांच्या विचारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा अनुयायी लाभला. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाला नागरिकत्वाचे समान अधिकार दिले. स्वातंत्र्यापूर्वी देशातील केवळ अकरा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता. मात्र, डॉ. आंबेडकरांनी तो अधिकार सर्व नागरिकांना मिळवून दिला. माणूसपण नाकारलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. बहुजन म्हणजे कोणताही एक धर्म किंवा एक जात नसून तो जात आणि धर्माच्या पलीकडे जाणारा व्यापक विचार आहे, असेही कुरेशी यांनी स्पष्ट केले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजाभाऊ सरवदे यांनी विचार मांडले. मंचावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता गायकवाड, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव एम. डी. कमळे, समितीचे अध्यक्ष प्राचार्य नरेश बदनोरे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे, सचिव मनीष गडदे, कोषाध्यक्ष अॅड. गोविंद पाटील, सहसचिव प्रा. एम. आर. कांबळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. मनोज मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अॅड. स्नेहल पाटील यांनी अखंड गायन केले. प्रा. सुभाष शास्त्री यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button