क्राईम

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट रचणारे दोन गुन्हेगार गजाआड; सोलापूर पोलिसांकडून इंदापूर व कोल्हापूर टोलनाक्यावर थरारक कारवाई

सोलापूर- ( प्रतिनिधी )अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार . सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून चिथावणी देणाऱ्या दोन अट्टल आरोपींना सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. अभिषेक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि श्रीशैल बाबूराव हुळ्ळे (वय ३२, रा. मणिधारी हेरीटेज, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतील हायवे टोलनाक्यांवरून बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक म्हणून काम करतात. दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास ते सोलापूर येथील महावीर चौकातील प्युमा शोरूमबाहेर आमदारांच्या पत्नी व मुलाची गाडीत वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी श्रीशैल हुळ्ळे व प्रभाकर फुलारी यांनी चालकाजवळ जाऊन, “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढचे मी बघून घेतो,” असे म्हणत आमदारांचा घातपात करण्यासाठी चालकाला पैशांचे आमिष दाखवून चिथावणी दिली.
या घटनेनंतर चालकाने दिलेल्या कायदेशीर फिर्यादीवरून दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५५, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी फरार झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्रनाथ भंडारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रभाकर फुलारी यास पुणे-सोलापूर हायवेवरील इंदापूर टोलनाक्यावरून ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी श्रीशैल हुळ्ळे यास कोल्हापूर-पुणे हायवेवरील किनी टोलनाक्यावरून (जि. कोल्हापूर) शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत, पोलीस अंमलदार मुलाणी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, प्रमोद पकाले, बागलकोटे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, विशाल बोराडे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर, आनंद निंबाळकर व अनमोल लड्डे यांच्या पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button