सामाजिक

शिक्षणसम्राट स्व . पतंगराव कदम

 गल्लीतल्या १०x१० च्या खोलीत उघडलेलं विद्यापीठ ते थेट विदेशात झेप… शून्यातून ‘शिक्षणसम्राट’ बनलेल्या रांगड्या पतंगरावांची ‘हार्ड’ स्टोरी!
​दोन आणे वाचवण्यासाठी ताकारी ते कुंडल पाई जाणारा आणि शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर एसटीचे दोन-तीन थांबे बदलून जाणारा एक रांगडा गडी जेव्हा मंत्री झाल्यानंतर स्वतःच्या गावात हेलिकॉप्टरने येऊ लागला, तेव्हा रानात राबणाऱ्या प्रत्येक माणसाची छाती अभिमानाने फुलून यायची. आकाशात घिरट्या घालणारं ते हेलिकॉप्टर म्हणजे त्यांच्यासाठी जणू विकासाचं प्रतीक होतं. पण ९ मार्च २०१८ रोजी दुपारी अडीच वाजता सोनसळच्या आकाशात ते हेलिकॉप्टर आलं आणि संपूर्ण गावाने हंबरडा फोडला. कारण यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरून लोकांशी हस्तांदोलन करणारे पतंगराव नव्हते, तर होतं त्यांचं पार्थिव. ज्या माणसाने दुष्काळाच्या मातीत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, लाखो कुटुंबांना आधार दिला, तो आधारवड कायमचा कोसळला होता. तो फक्त एका नेत्याचा अंत्यसंस्कार नव्हता, तर एका युगाचा शेवट होता. आज ‘विषय हार्ड’च्या या विशेष अग्रलेखात आपण उलगडणार आहोत, सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातून आलेल्या आणि प्रोटोकॉलला फाट्यावर मारून स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या पतंगराव कदम यांच्या आयुष्याची ही वादळी कथा.
​सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातलं सोनसळ हे कायम दुष्काळाच्या छायेत असणारं गाव. याच गावात ८ जानेवारी १९४४ रोजी बयाबाई आणि शेतकरी असणारे श्रीपतराव कदम यांच्या पोटी पतंगरावांचा जन्म झाला. कदम दांपत्याला एकूण आठ मुलं आणि दोन मुली. घरची परिस्थिती अत्यंत बिकट, पण आई बयाबाईंनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून मुलांना शिकवण्याचा चंग बांधला. सोनसळमध्ये चौथीपर्यंत एक शिक्षकी शाळा होती. तिथून पुढच्या शिक्षणासाठी या लेकाला रोज चार ते पाच किलोमीटर पाई चालत शिरसगाव गाठावं लागायचं. सोनसळ गावातून मॅट्रिक पास झालेले ते पहिलेच विद्यार्थी ठरले. पण शिक्षणाची भूक एवढी मोठी की त्यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण कुंडलच्या क्रांतीसिंह नाना पाटील बोर्डिंग स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यावेळी शेनोलीहून रेल्वेने जाताना किर्लोस्करवाडीचं तिकीट चार आणे आणि ताकारीचं दोन आणे असायचं. केवळ दोन आणे वाचवण्यासाठी हा पठ्ठ्या ताकारीला उतरायचा आणि तिथून कुंडलला पाई जायचा. साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेतून पदवी पूर्ण केल्यावर १९६१ मध्ये ते पुण्याला एमए करण्यासाठी आले. पुण्याला येतानाही आधी शेनोलीला चालत, तिथून एसटीने कराड आणि मग दुसऱ्या एसटीने पुणे असा त्यांचा प्रवास असायचा. पुण्यात राहायची सोय नसल्याने विद्यापीठात मित्राच्या खोलीवर राहायचे आणि रेक्टर आले की थेट पलंगाखाली लपून झोपायचे. अंगावर गरिबीचे चटके आणि डोळ्यांत मोठी स्वप्न घेऊन या तरुणाने शिक्षण पूर्ण केलं.
​आपल्या गावातला पहिला पदवीधर झाल्यावर त्यांनी रयतमध्येच अर्धवेळ शिक्षक म्हणून काम सुरू केलं, पण त्यांना काहीतरी भव्य करायचं होतं. ‘दाही दिशांना चर्चा होईल अशी शिक्षण संस्था काढायची’ हे त्यांचं स्वप्न होतं. आणि मग १९६४ मध्ये, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत एका १०x१० च्या खोलीत ‘भारती विद्यापीठा’ची स्थापना केली. त्यावेळी सदाशिव पेठेतल्या पंडितांनी कुचेष्टा करत, “बोळातलं विद्यापीठ बोळातच विसर्जित होणार,” असा टोमणा मारला. पण पतंगराव ढळले नाहीत. संस्थेच्या शिपायापासून ते क्लार्कपर्यंतची सगळी कामं ते स्वतः करायचे. पुढच्या दोन वर्षांत कोथरूडमध्ये त्यांनी शंकरराव मोरे हायस्कूल ही ३६ मुलांची पहिली शाळा सुरू केली. काम वाढत होतं, छपाईचा खर्च परवडत नव्हता म्हणून स्वतःची प्रेस काढण्याचं त्यांनी ठरवलं. राष्ट्रीयकृत बँकेकडे २५ हजारांच्या कर्जासाठी गेले असता, बँकेने संस्थेची मालमत्ता गहाण ठेवायला आणि श्रीमंत जामीनदार आणायला सांगितले. पण ‘शिक्षणाची मंदिरे गहाण ठेवणार नाही’ या जिद्दीवर ठाम राहत त्यांनी कर्ज नाकारलं. तेव्हा त्यांचे मार्गदर्शक यशवंतराव मोहिते यांनी सल्ला दिला की “स्वतःची बँक काढा”. पतंगरावांच्या कार्यकर्त्यांनी एका महिन्यात दीड लाखांचं भागभांडवल उभं केलं आणि भोंडे बिल्डिंगमध्ये ‘भारती सहकारी बँक’ स्थापन झाली. त्याच बँकेतून कर्ज घेऊन १९७० च्या अक्षय्य तृतीयेला ‘भारती प्रिंटिंग प्रेस’ सुरू झाली. आज त्या ‘बोळातल्या’ विद्यापीठाचे राज्य, देश आणि विदेशात मिळून तब्बल १८० शाळा-कॉलेजेस आहेत. १९९६ मध्ये जेव्हा विद्यापीठाला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा (अभिमत विद्यापीठ) दर्जा हवा होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव लातूरला प्रचारात व्यस्त होते. पतंगरावांनी थेट लातूरचं सर्किट हाऊस गाठलं आणि प्रचाराच्या धामधुमीत पंतप्रधानांकडून फाईलवर सही घेऊनच ते माघारी परतले. भान ठेवून योजना आखायच्या आणि बेभान होऊन अंमलात आणायच्या, हे त्यांचं सूत्र होतं.
​त्यांच्या या तडफदार कामाची नोंद तत्कालीन परिवहन मंत्री यशवंतराव मोहिते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी घेतली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पतंगराव एसटी महामंडळाचे संचालक झाले. १९६८ ते १९७३ या पाच वर्षांत त्यांनी “गाव तिथे एसटी” पोहोचवली आणि दुष्काळी पट्ट्यातल्या हजारो तरुणांना ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक म्हणून नोकऱ्या दिल्या. सकाळी भेटायला आलेला पोरगा संध्याकाळी नोकरीचं पत्र घेऊनच जायचा. पुढे पुणे विद्यापीठाचे चार वेळा, तर मुंबई आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य झाले. १९८० साल उजाडलं, विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पतंगरावांनी भिलवडी-वांगी मतदारसंघातून तिकीट मागितलं, पण काँग्रेसने संपतराव चव्हाणांना तिकीट दिलं. ज्या चव्हाणांनी ७८ च्या निवडणुकीत दिग्गज जी.डी. बापू लाड यांचा पराभव केला होता, त्यांच्याच विरोधात बंडखोरी करत पतंगराव अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. खुद्द बापू लाड यांनी त्यांना पाठिंबा दिला. विजय निश्चित वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात सैनिकांच्या टपाली (पोस्टल) मतदानामुळे पतंगरावांचा अवघ्या ८६ मतांनी पराभव झाला. पण हा पराभव त्यांना थांबवू शकला नाही. १९८५ मध्ये पुन्हा काँग्रेसने तिकीट नाकारलं, पुन्हा पतंगराव अपक्ष लढले आणि यावेळी तब्बल ३०,१६५ मतांनी विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर १९९० ला काँग्रेसने त्यांना स्वतःहून तिकीट दिलं.
​मंत्री झाल्यावर तर पतंगरावांनी कामाचा असा धडाका लावला की मंत्रालयातले अधिकारीही अवाक् व्हायचे. शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात शासकीय आयटीआय उभे करण्यासाठी ते मंत्रालयात क्लार्कपासून सचिवांपर्यंत फायली घेऊन स्वतः फिरायचे. अर्थखात्याने निधी अडवला, तेव्हा रात्री ११ वाजता अर्थमंत्री रामराव आदिक यांचं घर गाठून त्यांना प्रस्ताव समजावून सांगितला आणि मध्यरात्री १२ वाजता सही घेऊन अडीचशे कोटींचा निधी मंजूर करून घेतला. वन आणि पुनर्वसन मंत्री असताना तर त्यांचा कारभार अधिकच रोखठोक होता. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेले निर्णय संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जीआरच्या रूपात निघालेच पाहिजेत, असा त्यांचा सक्त आदेश असायचा. त्यांच्या काळात १२ अभयारण्यं, ३ व्याघ्रप्रकल्प वाढले, ७ हजार वनमजुरांना कायम केलं गेलं आणि कुंडलला फॉरेस्टची अकॅडमी आली. दुष्काळात १० लाख जनावरं छावणीत सांभाळताना एकाच वेळी ५,२०० टँकरने पाणीपुरवठा आणि दीड हजार साखळी बंधाऱ्यांचं उद्घाटन असा विक्रम त्यांनी रचला. कडेगावला स्वतंत्र तालुका बनवून सिंचन योजना, साखर कारखाने आणि सुतगिरण्यांच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळ हटवला. स्वतःचं घरच कार्यालय बनवून अधिकाऱ्यांना पहाटेच हजर राहायला लावणारे पतंगराव जाहीरपणे सांगायचे, “इथे लोकांची कामं महत्त्वाची आहेत, प्रोटोकॉल उपयोगाचा नाही!” मार्च २०१४ मध्ये सिल्लोडला गारपीट झाली, तेव्हा आचारसंहितेचं कारण देणाऱ्या अधिकाऱ्यांना बांधावरूनच सुनावत, “मला नियम सांगू नका, आजच्या आज जीआर काढा, सह्या मी नंतर करेन,” असं सांगून थेट ४२ कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती.
​राजकारणात पाच वेळा मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार आलं तेव्हा विलासराव देशमुखांसाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. २००३, २००४, २००८ ते २०१० प्रत्येक वेळी त्यांचं नाव चर्चेत आलं, पण दिल्लीचा आशीर्वाद किंवा दबावगट कमी पडल्याने त्यांना पद मिळालं नाही. तरीही जाहीर कार्यक्रमांत “आता माझाच नंबर आहे” असं बेधडकपणे बोलण्याची हिंमत फक्त त्यांच्यातच होती. पण पद असो वा नसो, त्यांचा माणुसकीचा झरा कधी आटला नाही. मंगला बनसोडे, नामदेव ढसाळ, काळू-बाळू, सिंधुताई सपकाळ अशा दिग्गजांसाठी ते एक अज्ञात आधारवड होते. दरवर्षी करोडो रुपयांची फी माफ करणारे पतंगराव कधीच त्याचा गाजावाजा करत नसत. पुण्यात बीएमसीसी कॉलेजसमोरील त्यांच्या बंगल्याबाहेर रात्री २ वाजता पिशवीत वाळलेल्या भाकरी घेऊन रस्त्यावर बसलेल्या एका गरीब आजीला आणि तिच्या नातवाला पाहून स्वतः खाली येऊन त्यांना घरात नेणारा, आणि दोघांनाही राहण्या-खाण्यासह फुकट शिक्षण आणि नोकरी देणारा हा देवमाणूस होता. सांगलीतल्या रखवालदाराच्या आजारी वडिलांसाठी थेट हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांना फोन करून मोफत उपचाराची सोय करणारा हा नेता होता. ज्या यशवंतराव मोहित्यांनी त्यांना बळ दिलं, त्यांच्या निधनानंतर विद्यापीठाच्या अध्यक्षपदावर त्यांच्याएवढा मोठा माणूस नाही, असं सांगून ते पद त्यांनी अखेरपर्यंत रिक्त ठेवून कृतज्ञता जपली.
​वैयक्तिक आयुष्यात त्यांनी मोठे धक्के पचवले. २००४ मध्ये ज्येष्ठ पुत्र अभिजीत यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. पुढे धाकटे चिरंजीव विश्वजीत कदम युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. उद्योगपती अविनाश भोसले यांच्या कन्या स्वप्नाली यांच्याशी विश्वजीत यांचा विवाह अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पुण्यातून विश्वजीत यांचा पराभव झाला असला, तरी त्याच लाटेत विधानसभेला पतंगराव मात्र पलूस-कडेगावमधून दणदणीत निवडून आले होते. अखेर २०१८ मध्ये मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आणि नंतर २०१९ व २०२४ मध्ये विश्वजीत कदम विजयी झाले आणि आज पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते एकमेव आमदार म्हणून त्यांचा वारसा चालवत आहेत.
​प्रचंड गरिबीतून आणि दुष्काळाच्या मातीतून उठून उभा राहिलेला हा माणूस शिक्षणाचा आणि राजकारणाचा एक महान ‘सम्राट’ झाला, पण त्याचे पाय कायम मातीतच राहिले. प्रोटोकॉलपेक्षा माणसाला जपणारा आणि रयतेच्या प्रश्नांवर थेट भिडणारा असा ‘रांगडा गडी’ पुन्हा होणे नाही!
​ ‘विषय हार्ड’  फेसबुक पेजवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button