सामाजिक

अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची पारंपरिक भव्यदिव्य रथोत्सवाने सांगता

अक्कलकोट( प्रतिनिधी)-  ‘श्रीशैल मात मल्लय्या घे’ असा कन्नड मातृभाषेतील जयघोष करीत अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची सांगता बुधवारी सायंकाळी पारंपरिक भव्यदिव्य रथोत्सवाने उत्साहात करण्यात आली.
 श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी,अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, सर्व विश्वस्त मंडळ, आजी- माजी नगरसेवक व नगरसेविका, व्यापारी उपस्थित होते.
यात्रा महोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या व विद्युत रोषणाईच्या सजावटीने सजविण्यात आला होता. सायंकाळपासूनच रथोत्सवासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी सुर्यास्ताचा ठरलेल्या मुहूर्तावर श्री बसवलिंग महास्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते रथोत्सव पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयजयकाराच्या वातावरणात रथ ओढण्यासाठी प्रारंभ झाला.
प्रारंभी अप्पासाहेब पाटील, विजयकुमार लिंबितोटे, सुनील नंदिकोले, स्वामीनाथ आडवीतोटे, नागराज रोडगे  या पाच नंदीध्वज मानक-यांच्या घरापासून सवाद्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मार्गावर विविध ठिकाणी सप्तरंगाच्या रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी फुलांच्या पायघड्या अर्पण करत तसेच पुष्पवृष्टी करत काट्याचे स्वागत केले. संपूर्ण शहर व परिसर “हर हर महादेव” व “मल्लिकार्जुन महाराज की जय” अशा घोषणांनी दुमदुमून गेला.
सायंकाळी रथोत्सवादरम्यान फटाक्यांचा आतषबाजीने वातावरण अधिकच भारावून गेले. भाविकांनी रथोत्सवावर  चिरमुरे, खारीक, फळफळावळ, प्रसाद वगैरेची वर्षाव केला. मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने हा मंगलमय सोहळा पार पडला. नगर प्रदक्षिणा पूर्ण करून रथ पुन्हा श्री बसवेश्वर मंदिरा समोर दाखल झाल्यानंतर यात्रा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्टचे यात्रा समिती व भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी चोख बंदोबस्त लावले होते. पौरोहित्य बसवराज शास्त्री यांनी केले. तर सूत्रसंचालन विद्याधर गुरव, तात्या समाणे व अभिजित लोके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button