नाशिक येथे काँग्रेस पक्षाचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

नाशिक – अयोध्या येथील श्रीराम मंदिर देणगीतील अपहार प्रकरणी नाशिक येथील पवित्र काळाराम मंदिरात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात मोठ्या संख्येने रामभक्त, नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष . हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे मांडले की, काळाराम मंदिर ही केवळ श्रद्धेची भूमी नसून सामाजिक न्याय, समानता आणि सत्याग्रहाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मंदिरप्रवेशासाठी करावा लागलेला संघर्ष आणि महात्मा गांधींनी दाखवलेला सत्याग्रहाचा मार्ग याची आठवण आजच्या आंदोलनाने पुन्हा करून दिली.
प्रभू श्रीराम हे मर्यादा, न्याय, सत्य आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहेत. मात्र राम मंदिरासाठी देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीचा संपूर्ण आणि पारदर्शक हिशोब देशासमोर ठेवला जावा, ही आमची लोकशाहीवादी आणि न्याय्य मागणी आहे. श्रद्धेच्या नावाने जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा लेखाजोखा जनतेला मिळालाच पाहिजे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सत्य हीच खऱ्या अर्थाने रामराज्याची तत्त्वे आहेत. त्यामुळे रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी रामभक्तांच्या विश्वासाचा सन्मान करत सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत.
महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाच्या प्रेरणेने हा सत्याचा आग्रह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशभर पोहोचवण्याचा आमचा निर्धार कायम राहील.
राम आमच्या मनात आहेत, राम आमच्या संविधानात आहेत. म्हणूनच रामाच्या नावावर झालेल्या प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेसमोर संपूर्ण हिशोब असलाच पाहिजे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.
या सत्याग्रह प्रसंगी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष . मोहन जोशी, . राजाराम पानगव्हाने, नाशिक ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष . भारत टाकेकर, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, शहराध्यक्ष . बबलू खैरे, डॉ. दिनेश बच्छाव, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिक उपस्थित होते.



