सामाजिक
भारत माझा देश आहे

सत्यमेव जयतेच्या रस्त्यावरून
अनवाणी पायांनी
पाटीवर दप्तर टाकून
आरक्षण शाळेत जातं
त्यावेळी,
या देशातली पाखरं
राष्ट्रगीत अभिमानाने गाऊ लागतात….
आरक्षण शाळेत जातं
समतेच्या बाकड्यावर बसतं
नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत
संघर्षाच्या पायऱ्या चढत अभ्यास करतं…
शेवटची घंटा वंदे मातरम् गाते
शाळा सुटते
डिग्रीची फाईल नटते
आणि जिंदगीची भाकरी शोधण्यासाठी
भाकरीच्या बाजारात वणवण फिरते
तेव्हा कळतं
इथं डिग्रीला वशिल्याच्या तव्यावर भाजावं लागतं
तेव्हा कुठं पुढचं गणित सुटतं
अशावेळी
चौकातल्या बॅनरवर
परिवर्तन लिहिलेला शब्द पाहून
आतडी पिळवटून निघतात
तरीही मनात मात्र प्रतिज्ञा गुणगुणली जातेच
भारत माझा देश आहे.
नितीन चंदनशिवे



