Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय सिनेमाचे बादशाह दिलीपकुमार

Admin by Admin
July 7, 2026
in मनोरंजन
0
भारतीय सिनेमाचे बादशाह दिलीपकुमार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बॉलीवूड इंडस्ट्रीला फार मोठा इतिहास आहे. या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांनी त्यांच्या काळात अनेक हिट चित्रपट केले होते. भारतीय सिनेमाचे बादशाह दिलीपकुमार यांचा आज दि. ७ जुलै स्मृतिदिवस.
दिलीप कुमार आज आपल्यात नसले तरी आजही सिनेरसिक त्यांचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. सर्वश्रेष्ठ अभिनयाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९५२ मध्ये मिळविणारे दिलीप कुमार तथा मोहम्मद युसूफ खान यांचा जन्म अखंड भारतातील पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला. इतकंच काय सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांनाच मिळालेयत
आयेशा बेगम आणि लाला गुलाम सरवार खान यांच्या पोटी ११ डिसेंबर १९२२ ला दिलीपकुमार यांचा जन्म झाला. ते १२ भावंडांपैकी एक अपत्य असणाऱ्या मोहम्मद युसुफ खान यांचे वडील फळविक्रेते आणि सावकार होते, त्यामुळं घरात सधनता होती. पेशावर आणि नाशिकच्या देवळालीमध्ये त्यांच्या मालकीच्या फळबागा होत्या. देवळालीच्याच बार्नेस स्कूलमध्ये दिलीपकुमारांचे प्राथमिक शिक्षण झाले. अभिनेते राजकपूर हे दिलीपकुमारांचे बालमित्र होते. कुमारवयातच वडीलांसोबत भांडण झाल्याने, एका पारसी कॅफेवाल्याच्या मदतीनं त्यांनी देवळालीतून थेट पुणे गाठले. कौटुंबिक पार्श्वभूमी न सांगता लेखनकौशल्य आणि इंग्रजीवरचं प्रभुत्वाच्या जोरावर त्यांनी नोकरी मिळवली. पुढं आर्मी क्लबमध्ये त्यांनी सँडविच स्टॉल सुरु केला. स्टॉलचा करार संपल्यावर त्यांनी पुणं सोडून मुंबई गाठली. त्यावेळी त्यांच्याकडे ५ हजार रुपये होते.
१९४३ ला मुंबईत आल्यावर डॉ. मसानी यांच्याशी दिलीपकुमारांची गाठ पडली. डॉ.मसानी यांनी मालाडच्या बाँबे टॉकीजमध्ये मला मदत कर म्हणून नेले. तिथं दिलीपकुमारांची बाँबे टॉकीजच्या मालकीण आणि अभिनेत्री देविकाराणी यांच्याशी गाठ पडली. देविकाराणी त्यांच्या लूकमुळे प्रभावित झाल्या आणि त्यांना महिना १२५० रुपये पगारावर नोकरीवर ठेवले. अभिनेते अशोककुमार यांच्याशी दिलीपकुमारांची भेट झाली. अशोककुमार अभिनय नैसर्गिक करावा अशा मताचे होते. त्यांचा दिलीपकुमार यांच्यावर खूप प्रभाव पडला.दिलीपकुमारांचं उर्दूवर खूप चांगलं प्रभुत्व होतं. त्यामुळं बाँबे टॉकीजमध्ये त्यांना सुरुवातीला पटकथा लिहण्याचं काम मिळत गेलं. देविकाराणींनी त्यांना युसूफ ऐवजी दिलीपकुमार हे नाव लाव अशी विनंती केली आणि १९४४ ला म्हणजे वर्षभरातच ज्वारभाटा चित्रपटात अभिनेत्याची भूमिका मिळाल्याने चित्रपटसृष्टीतल्या रुपेरी पडद्यावर दिलीप कुमार या सुपरस्टारचा प्रवेश झाला. मात्र ज्वारभाटा फ्लॉप झाला. पण त्याचे काम आणि लूक बघून त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर आलेले काही सुरुवातीचे सिनेमे फ्लॉपच ठरले. पण दिलीपकुमारांनी हार मानली नाही. तीन वर्षे अशीच गेली. १९४७ ला नूरजहाँ अभिनेत्री असलेला जुगनू चित्रपट मात्र हिट ठरला. पुढच्याच वर्षी शहीद आणि मेला हे दोन चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. १९५० ते ६० च्या दशकात जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत असे किती तरी गाजलेले चित्रपट दिलीपकुमारांनी दिले. १९५२ च्या दाग चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
नया दौर, मधुमती, यहुदी, पैगाम असे कित्येक यशस्वी चित्रपट दिलीपकुमारांनी दिली. ट्रॅजेडी किंग असा बहुमानही त्यांना याच दशकात मिळाला. पण हा बहुमान धोकादायक ठरु लागला. अनेक शोकमग्न भूमिका केल्यामुळे दिलीपकुमार स्वतःच डिप्रेशनची शिकार झाले. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हलकेफुलके चित्रपट करायला सुरुवात केली. १९५५ ते १९५९ दरम्यान ते झपाटल्यासारखं चित्रपटात काम करत राहिले. अभिनय फुलत गेला. डायलॉगवर लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडत गेल्या. गाणी अभिनयासकट लोकांच्या मनात बसत गेली..या दशकात सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या टॉप ३० चित्रपटांमध्ये ९ चित्रपट तर दिलीपकुमारांचेच होते. दिलीपकुमार त्यावेळी एका चित्रपटासाठी 1 लाख रुपये मानधन घ्यायचे. वैजयंतीमाला, मधुमाला, नर्गिस, मीनाकुमारी, निम्मी, कामिनी कौशल अशा त्यावेळच्या आघाडीच्या आणि सुपरहिट अभिनेत्रींबरोबर दिलीपकुमारांची पडद्यासह सहज चपखल जोडी जमत गेली .
१९६० साली आलेला मुगल-ए-आझम या चित्रपटाने तर इतिहास रचला. सर्वाधिक महागडा चित्रपट तर होताच पण तो इतका यशस्वी ठरला की ११ वर्षे सर्वाधिक पैसा कमावणारा चित्रपट राहिला. २००४ ला या चित्रपटाची रंगीत आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. त्यालाही सिनेरसिकांची अलोट गर्दी लोटली, म्हणजे दिलीपकुमार चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यावरही त्यांची जादू कायम होती. २०२१ च्या मूल्यमापनानुसार चित्रपटाचा गल्ला १ हजार कोटींचा होता. राजपुत्र सलीम आणि त्याच्या तोंडचे संवाद अजूनही सिनेरसिकांच्या तोंडी आहेत. १९७१ ला आलेल्या राजेश खन्नांच्या हाथी मेरे साथी आणि १९७५ च्या शोले या चित्रपटाने मुगल-ए-आझमचे विक्रम मोडले.
दिलीपकुमार यांना १९६१ मध्ये चित्रपट निर्माता होण्याची हुक्की आली होती. त्यांनी वैजयंतीमालाला घेऊन गंगा जमुना चित्रपटाची निर्मिती केली. पण निर्मितीचं वेड याच चित्रपटाबरोबर संपलं. याच दरम्यान ब्रिटीश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी लॉरेन्स ऑफ अरेबिया या इंग्रजी चित्रपटाची दिलीपकुमार यांना ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ टेलरसोबतही ताजमहाल चित्रपटासाठी त्यांना ऑफर होती. पण हा चित्रपटच रद्द झाला. एकूणच परदेशी दिग्दर्शकांनाही दिलीपकुमारांच्या अभिनयानं मोहित केलं होतं.. दिलीप कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘शहीद’, ‘अंदाज’, ‘बाबुल’, ‘दीदार’, ‘दाग’, ‘आन’, ‘नया दौर’, ‘मधुमती’, ‘पैगम’ यासह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘कोहिनूर’, ‘मुगल-ए-आझम’, ‘गंगा जमुना’, ‘राम और श्याम’, ‘गोपी’ हे गाजलेले चित्रपट दिली. मात्र १९७० नंतर त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. बैराग चित्रपटात वडील आणि दोन भाऊ असा ट्रिपल रोल दिलीपकुमारांनी केला. पण प्रेक्षकांना तो प्रयोग आवडला नाही. राजेश खन्ना आणि संजीवकुमार यांची याच काळात चलती सुरु झाली होती. दिलीपकुमार यांच्यासाठी लिहिलेल्या अनेक भूमिका या दोघांनी खेचून घेतल्या. त्यामुळं १९७६ ते १९८१ अशी पाच वर्षे दिलीपकुमारांनी चित्रपट संन्यास घेतला.
१९८१ साली दिलीपकुमारांनी धडाक्यात पुनरागमन केलं. शशी कपूर,मनोजकुमार,हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका असलेल्या क्रांती चित्रपटात दिलीपकुमारांची मध्यवर्ती भूमिका होती. देशप्रेमावर आधारीत असलेल्या या चित्रपटानं इतिहास रचला. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकाची दिलीपकुमारांची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. सुभाष घईं यांचा चित्रपट १९८२साली विधाता, १९८३ साली अमिताभबरोबरच्या जुगलबंदीचा शक्ती चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले. शक्तीतल्या भूमिकेसाठी दिलीपकुमारांना सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला. हा त्यांचा शेवटचा म्हणजे आठवा फिल्मफेअर पुरस्कार होता. १९८४ चा अनिल कपूरबरोबरचा मशाल फ्लॉप ठरला पण भूमिकेचं कौतुक झालं. १९८६ ला दिलीपकुमार-सुभाष घई पुन्हा एकत्र आले आणि कर्मा चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं. अष्टपैलू अभिनेत्री नूतनबरोबरचा त्यांचा हा पहिला चित्रपट होता.
१९९१ ला राजकुमार यांच्यासोबतचा सौदागर हा चित्रपट दिलीपकुमारांची जादू अजूनही संपली नाही हेच दाखवून गेला. दिग्दर्शक पुन्हा सुभाष घई. पण दिलीपकुमार यांचा हाच शेवटचा यशस्वी चित्रपट ठरला. १९९३ ला त्यांना चित्रपटसृष्टीला दिलेल्या सर्वोत्तम योगदानाबद्दल फिल्मफेअरचा लाइफटाइम अचिवमेंट पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पाच दशकांच्या यशस्वी कारकिर्दीचा हा गौरव होता. दिलीपकुमार केवळा अभिनेते नव्हते तर तर भाषाप्रभू होते. इंग्रजी, उर्दू, हिंदी, पंजाबी, मराठी, बंगाली, गुजराती,पर्शियन, अवधी, भोजपुरी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. २००० – २००६ दरम्यान काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्त केले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतले महान कलाकार असणाऱ्या दिलीप कुमार यांची सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे अभिनेता म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. १९८० ते मुंबईचे शेरीफ होते. १९९१ ला त्यांना पद्मभूषण मिळाला. २०१५ ला पद्मविभूषणने गौरव झाला. १९९४ साली दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पाकिस्ताननं निशाण-ए-इम्तियाज या पुरस्कारानं त्यांचा गौरव केला. या पुरस्काराला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला. दिलीपकुमार यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण केलं. पुढे अटलबिहारी वाजपेयींशी सल्लामसलत करुनच दिलीपकुमारांनी हा पुरस्कार स्वीकारला. उदयतारा नायर यांना दिलीपकुमारांनी आपल्या आयुष्याची वाटचाल कथन केली. त्याचंच पुढं द सबस्टन्स अँड द शॅडो या नावानं दिलीपकुमारांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं.
ट्रॅजेडीकिंग म्हटल्या जाणाऱ्या दिलीपकुमारांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रोमँटिक होते. अभिनेत्री मधुबालावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. मात्र नया दौर चित्रपटानंतर दोघांत बेबनाव आला. कोर्टात खटलाही चालला. वैजयंतीमाला दिलीपकुमारांच्या सर्वाधिक चित्रपटात अभिनेत्री होत्या.पडद्यावरची केमिस्ट्री बघून दोघेही वास्तवातसुद्धा एकमेकांसाठी बनले आहेत असे वाटायचे. मधुमाला व कामिनी कौशलनंतर वैजयंतीमाला याचंच नाव दिलीपकुमारांसोबत जोडलं गेलं. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यापेक्षा वयाने २२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सायराबानू यांच्याशी १९६६ साली त्यांनी निकाह केला. १९८१ साली त्यांनी हैदराबादच्या असमा जहाँगीर यांच्यासोबत दुसरा निकाह केला. पण दोन वर्षातच त्यांचा तलाक झाला. सायराबानू यांनी मात्र दिलीपकुमारांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. दोघांनाही मूल नव्हते. पण आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहिले. प्रदीर्घ आजारावर उपचार सुरु असतांना दि. ७ जुलै २०२१ ला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आपल्या जगभरातील चाहत्यांना शोकसागरात बुडवत या भारतीय चित्रपटाच्या बादशहाने इहलोकाचा निरोप घेतला.
– योगेश शुक्ल यांच्या फेसबुक वॉलवरून

Previous Post

SIR प्रक्रियेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे करडी नजर; कोणतीही चूक वा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही : खासदार प्रणिती शिंदे

Next Post

तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश

Admin

Admin

Next Post
तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश

तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697