सोलापूर

भीमा नदीकाठावरील कृषी पंपांना पूर्ववत ८ तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा; खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठावरील अनेक गावांमधील कृषी पंपांना दिल्या जाणाऱ्या थ्री-फेज वीजपुरवठ्यात करण्यात आलेल्या कपातीमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना निवेदन देऊन नदीकाठावरील कृषी पंपांसाठी पूर्ववत ८ तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सध्या भीमा नदीकाठावरील शेतकऱ्यांना केवळ २ तास थ्री-फेज वीजपुरवठा दिला जात असल्याने शेती सिंचनावर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने खरीप पिके तसेच नवीन लागवडीसाठी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.

शेती हा या भागातील नागरिकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असून, अपुरा वीजपुरवठा कायम राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पूर्वनियोजन म्हणून नियमित आणि पुरेशा कालावधीचा थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
यामुळे, नदीकाठावरील वीजपुरवठा २ तासांवर आणण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करून सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठावरील कृषी पंपांसाठी पूर्वीप्रमाणे ८ तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button