सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का: भाजपा, शिवसेना आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मुंबई येथील टिळक भवन मध्ये आज एक लक्षवेधी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षांना काँग्रेस पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अनेक विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात नव्याने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस कुटुंबात उत्साहात स्वागत केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या महत्त्वपूर्ण प्रसंगी काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे आणि प्रा. प्रकाश सोनावणे आदी प्रमुख नेते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांच्या आश्वासक नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चालला आहे. देशातील धर्मांध शक्तींना खऱ्या अर्थाने लढा देण्याचे सामर्थ्य आज केवळ काँग्रेस कडेच आहे, या भावनेतूनच विविध विचारधारेचे लोक पक्षाशी जोडले जात आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, काँग्रेस चा विचार हा देशातील बहुजन, संविधान, महापुरुष आणि साधू-संतांचा तसेच विश्वशांती व विश्वबंधुत्वाचा विचार आहे. याउलट सत्ताधाऱ्यांचा विचार हा ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ असा संधीसाधू असल्याचा घणाघात त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एका हातात विचार तर दुसऱ्या हातात कृती घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनीही सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. सत्ताधारी भाजपा चे ‘खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे’ असल्याचे ते म्हणाले. देशात जाणीवपूर्वक धर्मांधतेचे विष पसरवून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सद्यस्थितीत देशात आर्थिक विषमता आणि गरिबांची संख्या वाढत चालली असून, सरकार केवळ मूठभर लोकांसाठी काम करत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असे सचिन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. काँग्रेस पक्ष सदैव जनतेच्या भावनांशी एकरूप असून, जे लोक पक्ष सोडून गेले ते केवळ सत्तेच्या लालसेपोटी गेले, आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



