सामाजिक
वागदरी गावात एक प्रेरणादायी उपक्रम सुरू , अभ्यासासाठी मोबाईल आणि टिव्ही बंद

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात एक प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायंकाळी अभ्यासासाठी मोबाईल व टिव्ही बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यानी घेतला आहे. गाव करी ते राव ना करी याचा प्रत्यय आला आहे. वागदरी ग्रामस्थाचें सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या सर्वत्र मोबाईल आणि टि व्ही ने धुमाकूळ घातला. मोबाईलचा अतिरेकी वापराचा परिणाम हा समाजावर होत आहे. लहान मुले तसेच सर्वच वयातील लोकाना मोबाईलने भुरळ घातली आहे. मोबाईलचा थेट परिणाम हा लहान मुलांच्या अभ्यासावर तसेच वाचनावर होत आहे. मोबाईल आणि टि व्ही चे घातक परिणाम ओळखून वागदरी ग्रामस्थानी सायंकाळी ७ ते ९ : मोबाईल, टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन तास अभ्यासासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
मुलांचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामपंचायत आणि गावातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन हा संकल्प यशस्वी करणे आवश्यक आहे.
या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत प्रत्येक घरातील मोबाईल, टीव्ही आणि इतर मनोरंजनाची साधने बंद ठेवून मुलांना शांत वातावरणात अभ्यास करण्यास प्रोत्साहन द्यावे. पालकांनीही मुलांसोबत बसून त्यांच्या अभ्यासात सहभाग घ्यावा व त्यांना प्रेरणा द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वागदरी ग्रामस्थानी सायंकाळी दोन तास मोबाईल , टि व्ही व मनोरंजनाची साधने बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श उपक्रमाची सुरुवात केली आहे. लहान मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आता हा उपक्रम सर्वत्र राबविला जावा असे तालुक्यातील जनतेमधून बोलले जात आहे.






