महाराष्ट्र

आरएसएसने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे थांबवावे – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) सडकून टीका करत अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवावा, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) अकाउंटवर केलेल्या पोस्टमधून आरएसएसवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर आरएसएसने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे बंद केले नाही, तर यावेळी समाज ना विचार करेल, ना काही पाहील, ना आंदोलनाची परवानगी घेईल; थेट आरएसएसच्या दरवाजासमोर पूर्ण ताकदीने धडक देईल.
या आधी वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील संघ मुख्यलयावर (रेशीम बाग) मोर्चा काढला होता. या आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी आरएसएसवर टीका केली. मागच्यावेळी नागपुरात आंदोलन केले होते, तेव्हा आरएसएसच्या लोकांना कार्यालय सोडून जावे लागले होते. यावेळी मात्र कार्यालयच बंद करून टाकू. तसेही ही संघटना नोंदणीकृत नाहीये, असेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर आरएसएसशी संबंधित लोकांचा त्यांनी उल्लेख केला आहे. “तुमचे बाजारातील जे दुकानदार आहेत, त्यांना समाजातील लोक ओळखतात. त्यांच्या दारापर्यंतही समाजातील लोक जातील,” असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या पोस्टमध्ये आरएसएसच्या भूमिकेवर थेट टीका करण्यात आली असून, अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. आंदोलनाबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button