महाराष्ट्र

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असावी – मोहन भागवत 

 

​मुंबई – मुंबई मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे नुकतेच एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते ते आयमन (IIMUN) या संस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनाचे. या परिषदेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या मंचावरून त्यांनी जेन-झी आणि जेन-अल्फा या आधुनिक पिढीतील तरुणांशी मनमोकळा संवाद साधला. तरुणांच्या मनातील अनेक प्रश्न आणि त्यांच्या अपेक्षा यावर त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली.

​आजची तरुण पिढी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. आजचा तरुण केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आवाज उठवत नाही, तर अस्तित्वात असलेली व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी तो प्रश्न विचारत असतो. त्यामुळे तरुणांनी आपल्या हक्कांसाठी मत मांडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तरुणांना थेट देशविरोधी ठरवून दूर लोटणे चुकीचे आहे. हे तरुण आपलेच आहेत, ही जाणीव ठेवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. लोकशाहीमध्ये आंदोलने हा संवादाचाच एक महत्त्वाचा मार्ग असतो आणि हा संवाद थांबला तर समाजात मोठा संघर्ष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

​याच परिषदेत समलिंगी विवाहासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालकांनी मोठे विधान केले. समलिंगी विवाहांना मान्यता देणारा कायदा देशात असायला हवा, मात्र असा कायदा करण्यापूर्वी समाजाची मानसिकता बदलून त्यांना या बदलासाठी तयार करणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेवर बोलताना, देशात तब्बल दहा लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याची बाब त्यांनी मान्य केली. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के वाटा शिक्षणावर खर्च करण्याच्या मागणीशी आपण सहमत असल्याचे ते म्हणाले. तसेच, सोशल मीडियावरील खोट्या माहितीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता तरुणांनी शहानिशा करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

​यावेळी अमृता फडणवीस यांनीही आपले विचार मांडले. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या घरात नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रचंड क्षमता या नव्या पिढीत दडलेली आहे. या तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती सत्यात उतरवण्यासाठी सरकार तसेच विविध संस्थांनी त्यांना मदत केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

​या संवादानंतर विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. गुजरात आणि दिल्ली मधून आलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले. काहींच्या मते सरसंघचालकांची उत्तरे राजकीय स्वरूपाची होती. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान तरुणांवर लाठीमार झाला, तेव्हा असा संवाद का झाला नाही, असा सवाल एकाने विचारला. अनेक विद्यार्थ्यांना या चर्चेतून संवेदनशील प्रश्नांवर अधिक थेट उत्तरांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button