क्राईम
“तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, तुला पैसे देतो” आमदार कल्याणशेट्टींच्या ड्रायव्हरला आमिष, दोघांवर गुन्हा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदारांच्या पत्नी व मुलाला घेऊन महावीर चौकातील प्युमा शोरूम येथे खरेदीसाठी आले होते. आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये गेल्यानंतर चालक सुरवसे हे बाहेर थांबले होते.
त्याच वेळी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेल्या एका इसमाने जवळ येऊन, “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदारला गोळी घालून मार, मी पुढचे बघून घेतो” असे म्हणाला. तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने “साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे” असे सांगून चिथावणी दिली.
त्यानंतर घटनास्थळी चॉकलेटी शर्ट घातलेला एक इसम आला आणि त्याने त्या दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितले. घाबरलेल्या चालकाने ही माहिती सायंकाळी आमदारांचे पी.ए. आणि भावाला दिली. दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, चालकाला चिथावणी देणारे इसम श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी असल्याचे निष्पन्न झाले.
आमदार कल्याणशेट्टी यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५) व ५५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सदाशिव सावंत करत आहेत.




