देश - विदेश

‘ऑगस्ट क्रांती दिवस’

आज ९ ऑगस्ट आजचा दिवस भारताच्या इतिहासात “भारत छोडो आंदोलन” म्हणजेच ऑगस्ट क्रांतिदिन म्हणून नोंदवला गेला. गांधींजींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ म्हणून ओळखला जातो. आज या आंदोलनाला ८२ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे ब्रिटिश राजवट हादरली. याचा तत्कालीन ब्रिटिश सरकारवर मोठा परिणाम झाला. त्यांनी गांधीजींसह सर्व बड्या नेत्यांना तुरुंगात टाकले, पण त्यानंतरही संपूर्ण ब्रिटिश सरकारला ही चळवळ संपवायला एक वर्षाहून अधिक काळ लागला. ब्रिटिशांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतुर होता. त्याच वेळी ‘करो या मरो’ या मंत्रासह महात्मा गांधींनी या स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी पेटवली. आयुष्यभर अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या गांधींनीच ‘करो या मरो’ हा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. या रॅलीनंतर महात्मा गांधी, अब्दुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. महत्वाचे नेते अटकेत होते आणि इतर नेते भूमिगत झाल्याने या आंदोलनाला तसं नेतृत्व राहीलं नाही. त्यामुळे लोकांनीच हे आंदोलन हाती घेऊन त्याचे नेतृत्व केल्याने हे आंदोलन ‘लिडरलेड मुव्हमेंट’ ठरलं. आंदोलनाचा पहिला भाग शांततापूर्ण होता. लोकांनी शांततेत निदर्शने केली. महात्मा गांधींच्या सुटकेपर्यंत अशी निदर्शने सुरूच होती. पण या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. त्यामुळे ठिकाणी रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या, रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखडण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि जमशेदपूर या ठिकाणीच्या कामगारांनी आंदोलनात भाग घेतला. सर्व प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी AICC (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) चे अधिवेशन आयोजित केले होते. पोलिस आणि सरकारच्या अनेक इशाऱ्यांनंतरही मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलक जमले. या प्रचंड जनसमुदायासमोर अरुणा असफ अली यांनी प्रथमच भारताचा ध्वज फडकावला. जे चळवळीचे प्रतीक ठरले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर १९४२ मध्ये आंदोलकांनी मिळून मध्य प्रदेश आणि मुंबईतील सरकारी जागांवर बॉम्बस्फोट केले. भारत छोडो आंदोलनाचा इतिहास अज्ञात योध्यांच्या बलिदानाने भरुन गेला आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार यांच्या अनेक साहसी गोष्टी आहेत. भारत छोडो हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हतं तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतनेचा संचार होता. त्यामुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. या आंदोलनात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांना नमन !
श्रीकांत अ. जोशी
माजी आमदार फेसबुक वॉलवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button