विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयकावरून खडाजंगी; ‘जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर…’ जितेंद्र आव्हाडांचा थेट ख्रिश्चन जावयाचा उल्लेख

मुंबई – राज्य सरकारने विधानसभेत मांडलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सध्या सविस्तर चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहात समजावून सांगितल्यानंतर विविध पक्षांनी आपली भूमिका मांडली. या विधेयकाला ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला. जबरदस्तीच्या धर्मांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्म स्वातंत्र्याच्या नावाने आणलेले हे विधेयक थेट संविधानाला छेद देणारे आणि केवळ धर्मावर नियंत्रण ठेवणारे असल्याचे मत व्यक्त केले.
सभागृहात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अनेक ऐतिहासिक दाखले दिले. जगातील पहिले धर्मांतर गौतम बुद्ध यांनी केले, मग आताच्या कायद्यानुसार बुद्ध, जैन आणि बसवेश्वर यांनाही तुरुंगात जावे लागले असते का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जातीच्या भिंती खऱ्या अर्थाने तोडायच्या असतील तर आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ द्या, असे आवाहन करत त्यांनी स्वतःची मुलगी ख्रिश्चन कुटुंबात दिल्याचे उदाहरण सर्वांसमोर दिले. घटनात्मक मार्गाने विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींना मारहाण करणार का? आणि एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी नोटीस देण्याची सक्ती का? असे परखड प्रश्न त्यांनी विचारले.
वर्णव्यवस्थेवर प्रहार करताना त्यांनी स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगितला की, हिंदू असूनही त्यांच्या आईला सोसायटीतील पुजेसाठी कधीही बोलावले जात नसे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत वर्गात बसू दिले जात नव्हते, पण त्यांनीच या देशाचे संविधान लिहिले आणि संविधानाची निर्मिती झाल्यानंतरच त्यांनी आपला धर्म बदलला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासोबतच तुकाराम महाराज यांचे अभंग, सावित्रीबाई फुले यांच्यावर फेकले गेलेले शेण आणि रस्त्यावरील गरीब मुलांना शाळेत आणणाऱ्या काही ख्रिश्चन मिशनऱ्यांचे योगदान त्यांनी आपल्या भाषणात मांडले.
आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारल्याचा उल्लेख केल्याने सभागृहात मोठा वाद निर्माण झाला. संविधान बदलण्याच्या केवळ कल्पनेमुळे सत्ताधाऱ्यांच्या अनेक जागा कमी झाल्या, आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घालत आहात आणि महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, शिवरायांच्या उल्लेखावरून सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला. मंत्री शंभुराज देसाई आणि भाजप आमदार योगेश सागर यांनी हा चुकीचा इतिहास असल्याचे सांगत आव्हाडांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. भाजपचे आमदार वेलमध्ये उतरल्याने प्रचंड गोंधळ उडाला व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अखेर अध्यक्षांच्या निर्देशानुसार, “माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात माफी मागितली. त्यानंतर अध्यक्षांनी ते शब्द कामकाजातून काढून टाकले.



