अभिनेते दादा कोंडके

एखाद्याला रडवणं खुप सोपं असतं, पण एखाद्याला हसवणं तितकंच अवघड! त्यामुळं ज्याला इतरांच्या ओठांवर हसू फुलवता येतं तो माणूस महानच म्हणावा लागेल. अशाच ‘महान’ श्रेणीतील माणूस म्हणजे ‘कृष्णा कोंडके’ अर्थात ‘दादा कोंडके’! या माणसानं महाराष्ट्राला खळखळून हसवलं. दादांच्या विनोदाचं वैशिष्ट्य असं होतं कि, त्यांनी मराठी माणसाची ‘नस’ अचूकपणे ओळखली होती. म्हणूनच महाराष्ट्राला खळखळून हसवताना त्यांना स्वतःमधील अंगभूत विनोदी अंगाचा मुक्तपणे वापर करता आला. बरं दादांच्या विनोदाबद्दल बोलायचं झालं तर तो “जीवनातील विसंगतीकडे जो मार्मिक दृष्टिकोनातून पाहू शकतो तोच खरा विनोदी किंवा मग स्वतःतील उणिवांवर ज्याला हसता येते तो खरा विनोदी किंवा ‘विनोद’ हा साहित्यातील एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे इत्यादी इत्यादी … ” या श्रेणीतील अजिबातच नव्हता. त्यांच्या विनोदाला ना मराठी भाषेतील अलंकारांचं सौंदर्य लाभलं होतं ना आचार उच्चारांचा त्यावर काही संस्कार झाला होता आणि तरीही दादांच्या विनोदानं अवघ्या महाराष्ट्राला हसून हसून गडबडा लोळायला भाग पाडलं. का ते माहित आहे? हे घडलं ते यासाठी कि, दादांचा विनोद हा लहान निरागस बाळासारखा होता.
लहान मूल कसं एखाद्या निसरड्या जागेवरून घसरून पडलं कि स्वतःच हसत हाताला लागलेली माती पुसतं किंवा मग त्या लहान मुलाच्या कंबरेतून चड्डी घसरली आणि त्यामुळं आजूबाजूची माणसं हसू लागली कि आपली चड्डी सरकलीय याचं भान न राहता तेही त्या माणसांसोबत हसू लागतं . अशा लहान मुलांकडं पाहताना आपल्या मनात कोणताही ‘विकार’ येत नाही. सर्वप्रथम येते ती निरागस भावना! दादांचा विनोदही इतकाच निरागस होता! त्यांच्या चित्रपटात कोणतंही ग्लॅमर नव्हतं, गरम मसालाही नव्हता. एक छोटंसं गाव, त्या गावातील इरसाल माणसं, त्यांच्याभोवती फिरणारं एखाद्या काल्पनिक गोष्टीशी निगडित कथानक आणि छोट्या छोट्या प्रसंगातून घडणारा विनोद हीच त्यांच्या चित्रपटांची चौकट होती. तरीही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. इतकं कि, द ग्रेट शो मन राजकपूरलाही आपल्या मुलाला लाँच करण्यासाठी काढलेल्या ‘बॉबी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाच महिने लांबवावी लागली. तो चित्रपट होता ‘एकटा जीव सदाशिव’! विशेष म्हणजे सोंगाड्या नंतरचा दादांचा हा दुसराच चित्रपट होता. हिंदी चित्रपट सृष्टीनं कायमच इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटांवर आपलं वर्चस्व सिध्द केलेलं होतं आणि राजकपूर तर या हिंदी चित्रपटसृष्टीचे सम्राट. पण या सम्राटालाही झुकायला लावणारा मराठी मातीतला माणूस म्हणजे ‘दादा कोंडके’! आता चित्र निराळं आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनी देखील आता आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हे वर्चस्व मोडीत काढण्याची सुरुवात मात्र दादांनीच केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्यातील गाणी प्रसारित करून त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचा त्यांचा फंडा नंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही वापरला गेला. इतकंच नाही तर दादांच्या ‘पांडू हवालदार’ मुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. काय सामर्थ्य असेल ‘दादा कोंडके’ या नावाचं!
पण दुर्दैव असं कि, आपल्यातल्याच पांढरपेशा वर्गानं दादांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला कायम नाकारलं. त्यांच्या विनोदाला ‘कंबरेखालचा विनोद’ म्हणून हिणवलं. दादांनी मात्र याची खंत कधीच बाळगली नाही. ते या टीकेला नेहमी हसून उत्तर द्यायचे. “ते म्हणायचे, कि मी एखादा शब्द हा चांगल्या अर्थानंच संवादात वापरतो. पण ऐकणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्याच्या मनात जी ‘चोर भावना ‘ असते त्या भावनेचा अर्थ त्या शब्दाला प्राप्त होतो. यात माझा दोष काय?” त्यांच्या या विधानावर मग प्रश्न विचारणाराही निरुत्तर होऊन जाई. रसिकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमानं ते कधी हुरळून गेले नाहीत किंवा त्यांच्या चित्रपटांना भरघोस यश मिळालं याचा त्यांना कधी गर्वही झाला नाही आणि लोकनिंदेमुळं ते कधी व्यथितही झाले नाहीत. ते सातत्यानं काम करत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या निखळ विनोदी अभिनयानं रसिकांना खळखळून हसवत राहिले. ते इतके साधे आणि सरळ होते कि, त्यांच्या स्टारडम चा प्रभाव त्यांच्या वागण्यावर कधीच पडला नाही. सुपरस्टार झाल्यानंतरही ते तितक्याच आपुलकीनं आपल्या बालपणीच्या मित्रांना भेटायचे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचे.
दादांनी त्यांच्या जीवनात खूप संघर्ष पाहिला होता. एका साध्या गिरणी कामगाराच्या घरी त्यांचा जन्म झाला. गोकुळाष्टमीच्या शुभदिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून कौतुकानं त्यांचं नाव ‘कृष्णा’ असं ठेवण्यात आलं. बालवयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीतलेखन व गायनाचे कौशल्य अवगत झाले. ते अनेक वाद्येही वाजविण्यास शिकले. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणात मात्र फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. अंगच्या उपजत कलागुणांमुळे त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम मिळाले. तेथे ते शाहीर म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणे आदी कामे करू लागले. या काळात राम नगरकर, निळू फूले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. वगसम्राट दादू इंदुरीकरांच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. वसंत सबनीसलिखित ‘छपरी पलंगाचा वग ‘ हे लोकनाट्य त्यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ या नावाने रंगमंचावर आणले. या नाटकाला असलेला लोकनाट्याचा बाज, तत्कालीन राजकीय-सामाजिक संदर्भ व त्यांवर औपरोधिक, मार्मिक भाष्याची, विनोदी टीका-टिप्पणीची खुमासदार फोडणी यांमुळे हे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय झाले. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या वगनाट्यानं इतिहास रचला हे तर सर्वज्ञातच आहे. या वगनाट्याचे १५०० हुन अधिक यशस्वी प्रयोग झाले. त्यानंतर दादांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
दादांसारखं हे रत्न भालजी पेंढारकर यांच्या पारखी नजरेस पडलं आणि त्यांनी त्यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात दादांना भूमिका दिली. या चित्रपटामुळं दादांना रुपेरी पडद्याचं दालन उघडलं आणि अभिजात अभिनयाची देणगी लाभलेल्या या अवलियानं या पडद्यावर आणि रसिकांच्या मनावर अनभिषिक्त राज्य केलं. ‘सोंगाड्या’ ही त्यांची निर्माता म्हणून पहिली कलाकृती होती. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या कथेवर गोविंद कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले होते. दादरच्या कोहिनूर थिएटरच्या मालकाने कोंडके यांनी चार आठवडे आधी थिएटर बुक करूनही देव आनंदचा ‘तीन देवियां’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दादा कोंडके यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने सुरू केली. अखेरीस ‘सोंगाड्या’ कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. बाळासाहेबांनी केलेली ही मदत दादा कधीच विसरले नाहीत. म्हणूनच निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या सर्व प्रचारसभांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. खरं तर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश करून मोठ्या पदावर जाता आलं असतं. कारण लोकांचाही त्यांना पाठिंबा होता. पण कलेवरची त्यांची निष्ठा इतकी मोठी होती कि कलेशी असलेलं त्यांचं नातं त्यांनी कायम निभावलं.
त्यांची ही भावना त्यांच्या सहकालाकरांविषयीही होती. म्हणून तर ‘अशोक सराफ’ यांच्यासारखं ‘बावनकशी सोनं’ असलेला कलाकार दादांमुळं मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. हीच कथा रत्नमालाबाईंचीही! रुपेरी पडद्यावर कायम ‘दादांची आई’ साकारणाऱ्या या चरित्र अभिनेत्रीवर दादांनी त्यांच्या जन्मदात्रीइतकीच माया केली. ‘ए आयेsssss’ ही दादांनी त्यांना दिलेली साद देखील रसिकांनी डोक्यावर घेतली. दादांनी नेहमी एकाच टीमसोबत काम केलं. त्यांच्या सिनेमांत अभिनेते, तंत्रज्ञ आणि पार्श्वगायकांची टीम कधीच बदलली नाही. त्यांच्या यशात टीमचा फार मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे. सुरुवातीच्या काळात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या चित्रपटात पार्श्वगायन केलं आणि त्यानंतर महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर या गायक द्वयींची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. उषा ताई तरी मराठी होत्या, पण महेंद्र कपूर यांनी दादांवरच्या प्रेमापोटी हिंदीभाषिकांसाठी उच्चारायला अत्यंत अवघड असणारं ‘ळ’ हे अक्षर उच्चारता यावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. दादांच्या कलेवर आणि सहकलारांवर असलेल्या निष्ठेचं, प्रेमाचं हे प्रतिबिंब होतं. बघा ना, महेंद्र कपूर यांनी गायलेल्या ‘ढगाला लागली कळ पाणी थेम्ब थेम्ब गळं’ हे गीत एका अमराठी गायकानं गायलं आहे यावर इतरांचा सहजासहजी विश्वास बसणं कठीण आहे. संगीत हा दादांच्या चित्रपटांचा आत्मा होता. दादा स्वतः एक शाहीर होते. विनोदाच्या मुखवट्याआड दडलेल्या त्यांच्या चेहऱ्यामागे एक संवेदनशील कवी होता. त्यांच्या काही रचना पाहिल्या कि हे लक्षात येतं. ‘झाल्या तिन्ही सांजा’ सारखं शृंगारिक गीत लिहिणाऱ्या दादांनी ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय जय हनुमान’ सारखं भक्तीगीत ही लिहिलं. ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा’ यासारखी मजेदार रचना करणाऱ्या दादांनी ‘वेळ आली बाका तिथं देव करी काय हो, अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो’ सारखं व्यवस्थेवर बोट ठेवणारं मार्मिक गीत देखील लिहिलं. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आणि त्याबरोबर गीतलेखन या सगळ्यात दादांना मिळालेलं यश पाहता दादांचा आवाका किती मोठा होता हे लक्षात येतं.
दादांच्या चित्रपटाचं वेगळेपण हे त्या चित्रपटाच्या शीर्षकापासूनच असायचं. त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक वाचून एकतर रसिक बुचकळ्यात तरी पडायचे नाही तर त्यांच्या ओठांवर हसू तरी फुलायचं. आली अंगावर, मुका घ्या मुका, आंधळा मारतो डोळा. बोट लावीन तिथं गुदगुल्या अशी मजेशीर शीर्षके त्यांनी आपल्या चित्रपटांना दिली होती. त्याचप्रमाणं लोकांना आपल्यातलाच एक वाटेल असा नायक त्यांनी उभा केला होता. भोळा चेहरा, गावंढळ अशी अर्धी चड्डी, तिचा लटकणारा लांब नाडा, साधाभोळा पण फटकळ पणाने बोलणारा नायक रसिकांना विशेषतः ग्रामीण भागातील रसिकांना खूप भावला.दादा कोंडके यांनी रौप्यमहोत्सवी (सलग २५ आठवडे चालू असलेल्या) सर्वाधिक (नऊ) चित्रपटांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला. दादांच्या चित्रपटांमुळे पूर्णत: डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपटनिर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरणप्रणालीपासून सर्वच यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वत:चे वेगळेपण दाखवले होते. बॉलिवूड कलाकारांमध्येही दादा कोंडके खूप लोकप्रिय होते. ‘आगे की सोच’, ‘तेरे मेरे बीच में’, ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ आणि यासारख्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. धर्मेंद्र, जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांनीही त्यांच्या यशाचं कौतुक केलं. अभिनेते धर्मेंद्र तर दादांचे एवढे फॅन होते कि, धर्मेंद्रवर चित्रित झालेल्या एका गाण्यात दादांच्या ‘ये जवळ ये लाजू नको’ या ओळींचा समावेश करण्यात आला होता आणि नाचता येत नसूनही धर्मेन्द्रजींनी त्या ओळींवर बेधुंद होऊन नाच केला होता.
दादांना त्यांच्या आयुष्यात अमाप लोकप्रियता मिळाली, प्रसिध्दी मिळाली, पैसाही मिळाला. पण असं म्हणतात कि, हसऱ्या चेहऱ्यामागे नेहमी एक सांगता न येणारं दुःख असतं. दादांच्या हसऱ्या चेहऱ्यामागेही एक न सांगता येणारं दुःख होतं. ज्यानं आपल्या निखळ विनोदी अभिनयानं अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं तो माणूस मात्र आतल्या आत एकटा पडला होता. अनिता पाध्ये यांनी ‘एकटा जीव’ हे दादांचं आत्मचरित्र शब्दबध्द केलं होतं. ते अत्यंत लोकप्रिय झालं. त्यात दादांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यातून त्यांच्या एकटेपणाची जाणीव होते. ते म्हणाले होते कि, “आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे? कुणासाठी मी हे कमावलं आहे? माझं दुःख, एकटेपणा मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळं मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवानं मला पैसा, यश, प्रसिध्दी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे.”
दादांनी स्वतः जरी एकटेपण भोगलं असलं तरी त्यांच्या विनोदानं मात्र अनेकांचं एकटेपण दूर केलं आहे. अनेकांना आपलं दुःख विसरायला भाग पाडलं आहे, अनेकांच्या डोळ्यातील आसू पुसून त्यांच्या ओठांवर हसू फुलवलं आहे. ही मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रसिक त्यांचा कायम ऋणी राहील. त्यांच्यासारखा विनोदी कलाकार सहस्त्रकात दुसरा होणे नाही. विनोदाच्या क्षेत्रातील या ‘दादा’ माणसाला त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी
माजी आमदार फेसबुक वॉलवरून



