बाडमेरचे शिक्षक भेराराम भाखर ‘पौधे वाले मास्टर’

राजस्थान म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते रखरखीत वाळवंट, उष्ण हवामान आणि दूरवर पसरलेली वाळू. मात्र याच भूमीत एका शिक्षकाने गेल्या २७ वर्षांपासून हिरवाई रुजवण्याचं काम सुरू ठेवलं आहे. बाडमेरचे शिक्षक भेराराम भाखर आज ‘पौधे वाले मास्टर’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी राजस्थानातील विविध भागांत आतापर्यंत ४ लाखांहून अधिक रोपं लावली असून, या कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या पैशांचा वापर केला आहे.
या अनोख्या प्रवासाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना भेराराम भाखर यांनी मित्रांसोबत मंदिर परिसरात ५० रोपं लावली. रोपं लावल्यानंतर मिळालेलं समाधान आणि त्या परिसरात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या मनावर खोलवर उमटला. पुढे पर्यावरण संवर्धन हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असावं, असा त्यांनी निर्णय घेतला.
२००२ मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या पगारातील रक्कम पर्यावरणासाठी खर्च केली. त्यानंतर दरवर्षी आपल्या एका महिन्याचा पगार पर्यावरणासाठी देण्याचा संकल्प त्यांनी केला. देशी वृक्षांची रोपं खरेदी करून ती शाळा, गावं, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यास त्यांनी सुरुवात केली.
मात्र हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली, टोमणे मारले. काहींना त्यांचं काम वेडेपणाचं वाटत होतं. पण भेराराम यांनी टीकेकडे दुर्लक्ष केलं. उलट, त्याच उपहासाला त्यांनी अधिक काम करण्याची प्रेरणा बनवलं.
त्यांनी विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतलं. मोफत रोपांचं वाटप, वृक्षारोपण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती अशा माध्यमातून त्यांनी लोकांना जोडण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीने निसर्गासाठी काहीतरी योगदान द्यावं, यासाठी त्यांनी ‘हरित सदस्य’ होण्याची प्रेरणाही दिली.
त्यांचं काम केवळ झाडं लावण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. प्लास्टिकविरोधी जनजागृती, पशू-पक्ष्यांचं संरक्षण आणि वन्यजीवांना मदत करण्याचं कामही त्यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नांतून ५०० हून अधिक वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात मदत झाली, अशी माहिती दिली जाते.
वाळवंटी राजस्थानात हजारो नव्हे, तर लाखो रोपं लावण्याचा संकल्प करून तो वर्षानुवर्षे जपणारे भेराराम भाखर हे केवळ शिक्षक नाहीत. स्वतःच्या कृतीतून पर्यावरणाची जबाबदारी शिकवणारे ते एक उदाहरण आहेत. त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट नक्की शिकता येते—बदल घडवण्यासाठी नेहमी मोठ्या साधनांची गरज नसते; एका छोट्या कृतीपासूनही मोठ्या चळवळीची सुरुवात होऊ शकते.






