राजकीय
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत जातीय समीकरणे भावी नगर सेवकानां तारणार की मारक ठरणार !

क्रॉस मतदानाचा फटका अनेक उमेदवारांना बसण्याची शक्यता !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल हा दिनांक २१ डिसेंबर रोजी लागणार असून अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीय समीकरणे जुळविण्यात आल्याने हे उमेदवारांसाठी तारक ठरणार की मारक ठरणार त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस मतदान झाल्याने अनेक जण ऑक्सिजनवर आहेत .याचा फटका बसणार का ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याची चर्चा सुरू आहे.
अक्कलकोट नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासह २५ नगरसेवक पदांच्या जागांसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान झाले. यामध्ये ६४. २५ टक्के इतके मतदान झाले एकूण ३८ हजार ४४२ मतदारांपैकी १२ हजार ३५७ पुरुष तर १२ हजार ३३९ महिला मतदाराने मतदानाचा हक्क बजाविला. थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार तर २५ सदस्य पदासाठी ७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपा ,शिवसेना शिंदे गट ,काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी , शिवसेना उद्धव ठाकरे गट आदिनी उमेदवार उभे केले होते. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक वार्डात चुरशीने मतदान झाले आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक प्रभागात जातीय समीकरणे प्रबळ असल्याचे दिसले. अनेक मतदाराने पक्ष न बघता व्यक्ती बघून मतदान केल्याची चर्चा आहे .जातीचा उमेदवार म्हणून अनेक प्रभागात मतदान झाले आहे. याचा जबर फटका अनेक मातब्बरांना बसण्याची चर्चा रंगली आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्व जातींना प्राधान्य देत उमेदवार दिले होते. सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग केला आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करत भाजपा समोर आव्हान उभे केले आहे. शिवसेना शिंदे गटातून सर्वच जातींना प्राधान्य देण्यात आले होते. तसेच काँग्रेस पक्षाने १४ ठिकाणी उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक प्रभागात जात आणि व्यक्ती याकडे पहात मतदान झाले आहे. यामुळे याची चर्चाही राजकीय क्षेत्रासह नागरिकात रंगली आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीय समीकरणे प्रबळ ठरणार की विकासाचे मुद्दे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. अनेक वॉर्डा क्रॉस मतदान झाल्याने त्याचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसणार आहे. निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भावी नगरसेवकांनी आपले देव पाण्यात ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निकालाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली असून विजयी कोण होणार याच्या पैजाही लावण्यात आल्याचे दिसत आहे.




