मनोरंजन

लोकप्रिय संगीतकार कै . श्रीकांत ठाकरे यांचा आज स्मृतिदिन

श्रीकांत ठाकरे यांचा जन्म २७ जून १९३० साली झाला. श्रीकांत ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे ते बालपणीच सतारवादन शिकले होते . बुलबुलतरंग म्हणजे तर त्यांचा जीव की प्राण होता . व्हायोलिन – वादनात त्यांचा हातखंडा होता . एकंदरीत तंतुवाद्यं त्यांना विशेष प्रिय होती . तालवाद्यांचं देखील त्यांना पुरेसं ज्ञान होतं . हिंदुस्थानी रागदारी संगीताचीही त्यांना उत्तम जाण होती .
त्यांच्या तरुणपणी त्यांनी मुंबईतल्या फेमस स्टुडिओमध्ये व्हायोलिनवादक म्हणून काम करायला सुरुवात केली . त्यावेळी त्यांचे स्नेहबंध जुळले ते हुस्नलाल – भगतराम या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या संगीतकार जोडीतल्या हुस्नलाल यांच्याशी ! हुस्नलाल हे पंजाबी लोकसंगीताचे उत्तम जाणकार होते आणि उत्तम व्हायोलिन – वादक होते . श्रीकांतजी यांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या .
कोलंबिया ब्रॉडकास्टिंग स्टुडिओ आणि ऑल इंडिया रेडिओ या ठिकाणी अनेक गायक – गायिकांना वाद्यांची साथसंगत देतादेता श्रीकांतजी स्वतःच संगीतकार बनले .वंदना विटणकर , उमाकांत काणेकर , रमेश अणावकर , विनायक राहतेकर अशा प्रतिभावान परंतु फारसे प्रसिद्ध नसलेल्या गीतकारांच्या अत्यंत भावगर्भ आणि अर्थपूर्ण गीतांना श्रीकांतजींनी सुरेल चाली लावून आणि कर्णमधुर स्वरसाज चढवून , अशी गीतं उत्तमोत्तम गायक – गायिकांकडून गाऊन घेतली .
” उघड्या पुन्हा जहाल्या , जखमा उरातल्या .. फुलवी तुझ्या स्मृतींच्या , कलिका मनातल्या ! ” हे उमाकांत काणेकर यांचं गीत श्रीकांतजी यांनी स्वरबद्ध केलं आणि शोभा गुर्टू यांनी ते मिश्र रागात गाऊन अतिशय लोकप्रिय केलं ! ” त्यांनीच छेडिले गं , माझ्या मनीं न होते , ओढून ओढणीला , दारी उभी मी होते ” हे स्रीसुलभ भाव व्यक्त करणारं गीतसुद्धा श्रीकांतजींच्याच संगीतदिग्दर्शनाखाली शोभा गुर्टू यांनी मिश्र खमाज रागात गायलं जे आजही शुभ्र टवटवीत मोगऱ्यासारखं मन प्रसन्न करून जातं ! ” माझिया मनाला प्रीत कळेना , अनुराग त्याचा – माझा हाय रे जुळेना ” हेही शोभा गुर्टू यांनीच गायलेलं गीत आहे , ज्याची स्वररचना श्रीकांतजी यांनी केलेली आहे .
गज़लप्रेमी श्रीकांतजींनी सुरेश भट यांची एक सुरेख मराठी गज़ल स्वरबद्ध करून ती रसिकांसमोर पेश करण्यासाठी पाचारण केलं ते हिदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका आणि जुन्या जमान्यातल्या हिंदी चित्रपट अभिनेत्री निर्मला देवी यांना ! मूळच्या त्या वाराणसीच्या होत्या , पश्चिम पंजाबमधून फाळणीच्या वेळी परागंदा होऊन स्वतंत्र भारतात आलेले आणि तेव्हापासून मुंबईत स्थायिक झालेले , जुन्या जमान्यातले हिंदी चित्रपट अभिनेते , निर्माते अरुण अहुजा यांच्या त्या धर्मपत्नी होत्या . त्यांची अधिक ओळख सांगायची तर त्या अभिनेता गोविंदा यांच्या मातोश्री होत्या ! ” मी एकटीच माझी , असते कधी कधी … गर्दीत भोंवतीच्या असते कधी कधी ” अशी सुरुवात असलेली , श्रीकांतजींनी स्वरबद्ध केलेली आणि निर्मला देवी यांनी गायलेली , सुरेश भटांची ही गज़ल लाजवाब आहे !
अशीच अवीट गोडी असलेली आणि उमाकांत काणेकार यांनीच रचलेली काही प्रेमगीतं , श्रीकांतजींनी दिलराज कौर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून घेतली आहेत . दिलराज कौर या तेव्हाच्या काळात अनेक हिंदी चित्रपटांसाठी आणि दूरदर्शनवरच्या शंभर – सव्वाशे भागांच्या प्रदीर्घ हिंदी मालिकांसाठी पार्श्वगायन करण्याच्या कामात कायम व्यग्र असायच्या तरीही त्यांनी वेळात वेळ काढून श्रीकांतजींच्या संगीतदिग्दर्शनाखाली किमानपक्षी पाच – सहा मराठी भावगीतं , तीही अगदी अस्सल मराठी ढंगात आणि मराठी उच्चारात गायली आहेत . ” भेट ती झाली तुझी अन् गंधता आली जिवा …फूल मी झाले तरीही , कुंदली सारी हवा ” हे त्यांपैकीच एक मधुर भावगीत आहे .
” शूरा मी वंदिले ” या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे श्रीकांत ठाकरे हे सहनिर्माता आणि संगीतदिग्दर्शक होते . या चित्रपटात जरी फार कुणी वलयांकित अभिनेता किंवा अभिनेत्री यांचा सहभाग नव्हता तरी सरला येवलेकर , रत्नमाला , रविराज यांनी आपापल्या भूमिका छान केल्या होत्या . वीरचक्र मिळालेला एक वायुसेना अधिकारी आणि एक नृत्यांगना यांची प्रेमकहाणी हा या चित्रपटाचा विषय होता . या चित्रपटासाठी श्रीकांतजी यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली अनेक दिग्गज मराठी आणि अमराठी गायक – गायिका गायले असल्यानं , सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा असं होऊन , संगीत ही या चित्रपटाची ती फार मोठी जमेची बाजू ठरली होती . ” आज तुजसाठी या पाऊलांना रे पंख फुटले …झनक झन् झन् , मदिर सरगम , अधीर झाले ऽ ऽ” हे अप्रतिम गाणं आशा भोसले यांनी गायलं होतं तर , ” आज का प्रिया रे तुझी याद येते … गुप्तता मनींची अधुरी झेप घेते ” ही गीतरचना उषा मंगेशकर यांनी आपल्या दिलकश आवाजात सादर केली होती . ” यमुनेच्या निळ्या जळा , साक्षी त्यास होता होता तू रे ” या गीताचं माधुर्य कृष्णा कल्ले यांच्या कोकीळ कंठातून ओसंडलं होतं . ” सजना रे कशी प्रीत असावी …सजनी गं कशी प्रीत असावी ” हे उडत्या चालीचं युगुलगीत पार्श्वगायक मन्ना डे आणि कृष्णा कल्ले या दोघांनी गायलं होतं तर ” अरे दुख्खी जीवा बेकरार होऊ नको …” तू तुला अकेला या जगात समजू नको ” हे गीत महंमद रफी यांनी गायलं होतं . बहुधा रफीसाहेबांनी मराठी भाषेत गायलेलं हे पहिलंच गीत असावं आणि कदाचित त्यामुळेच या गीतात काही हिंदी शब्दांचा वापर मुद्दामच केला असावा . याच गीतामुळे रफीसाहेब आणि श्रीकांतजी यांचं जिवाशिवाचं नातं जमलं आणि पुढील काळात श्रीकांतजींच्या संगीतदिग्दर्शनाखाली रफीसाहेबांनी एकापेक्षा एक सरस मराठी गाणी म्हटली ! असो .
” सवाई हवालदार ” या १९९९ साली प्रदर्शित झालेल्या रंगीत चित्रपटाला श्रीकांत ठाकरे यांनीच संगीत दिलं आहे . याही चित्रपटाचे ते सहनिर्माता आहेत . चित्रपटाची कथा – पटकथा विद्याधर गोखले यांची आहे आणि अशोक सराफ , अन्नपूर्णा , उषा नाईक , कुलदीप पवार वगैरे कलाकार यात आहेत . ” माझ्या इष्कात , माझ्या काळजात , रुतलाय काटा , दातानं तुम्ही काढनार काय ” ही उत्तरा केळकर यांनी म्हटलेली ढंगदार लावणी जशी या चित्रपटात आहे , तसंच ” सोनुल्या जोजविते तुला , हा पाळणा ” हे कृष्णजन्माचं वात्सल्यगीतही यात आहे . ” नको नको रे जाऊ साजणा …तुजसाठी सोडिले मी पैंजणा ” हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शृंगारगीत जसं यात आहे , तसंच ” झेप घेतली आकाशी , तुटले नाते घरट्याशी ” हे कविता कृष्णमूर्तीनं गायलेलं स्फूर्तिदायी बालगीतही यात आहे . या चित्रपटातलं प्रत्येक गाणं मन रिझवणारं आहे . गाण्यांना वाद्यांची साथही बहारदार आहे .
” महानदीच्या तीरावर ” या २००४ साली प्रदर्शित झालेल्या आणि दुर्गा भागवत यांच्या याच शीर्षकाच्या कादम्बरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलंय ! याही चित्रपटाचे ते आणि त्यांच्या धर्मपत्नी मधुवंती अर्थात कुंदा ठाकरे हे दोघेही सहनिर्माता आहेत . आदिवासींचे पाडे असलेल्या जव्हारच्या परिसरात याचं चित्रीकरण झालंय . योगेश महाजन , प्रमोद शेलार , दीप्ती समेळ , नीता शेंडे असे अनेक कलाकार यात होते जे गुणी असले तरी प्रसिद्ध नव्हते . श्रीकांतजी यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलेल्या उत्तरा केळकर यांनी , त्याचप्रमाणे हृषिकेश कामेरकर ,संपदा गोस्वामी , प्राची निगुडकर आदींनी या चित्रपटासाठी गाणी म्हटली आहेत .
नवनवीन मराठी भावगीतांच्या सरींवर सरी कोसळत असलेल्या जमान्यात श्रीकांत ठाकरे हे नाव संगीतदिग्दर्शनात कायम आघाडीवर होतं . कृष्णभक्ती प्रकट करणारी अनक गीतं त्यांनी स्वरबद्ध केली . त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील .महेंद्र कपूर यांनी गायलेलं ” रंगला रे हरी , यमुना किनारी …रंगात नहाल्या गोकुळच्या नारी ” हे त्यांपैकीच एक आहे .” बोल कन्हैय्या का रुसला राधेवरी ” हे शोभा गुर्टू यांनी गायलेलं गीतही असंच एक उदाहरण आहे . ” अगं पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी … लाट पिरतीची भन्नाट होऊन आभाली घेई भरारी ” हे वंदना विटणकर विरचित झकास कोळीगीत , श्रीकांतजींनी महंमद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मराठी कोळीगीतांच्या खजिन्यात मोठीच भर घातली . ” प्रकाशातले तारे तुम्ही , अंधारावर रुसा ..हसा ऽ ऽ हसा मुलानो हसा ” हे उमाकांत काणेकर यांचं धमाल बालगीत श्रीकांतजींनी स्वरबद्ध करून ते रफीसाहेबांना गायला लावलं हे विशेषच म्हणायला हवं !
गीतकार वंदना विटणकर , संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि गायक महंमद रफी या त्रयींनी एकत्रितपणे मराठी भावगीतांच्या विश्वात जी बहार उडवून दिली तिला तोड नाही . ” हे मना आज कोणी बघ तुला साद घाली ,जाण रे दाटलेली ही किमया भोवताली ” किंवा ” हा रुसवा सोड सखे , पुरे हा बहाणा , सोड ना अबोला ” अथवा ” नको आरती की नको पुष्पमाला , प्रभू भोवताली असे व्यापलेला ” तसंच ” हा छंद जीवाला लावी पिसे ” आणि सर्वाधिक लोकप्रिय झालेलं भावगीत आहे , ” शोधिसी मानवा राऊळी मंदिरी , नांदतो देव हा आपुल्या अंतरी ” दुर्दैवानं आज या तिघांपैकी कुणीच हयात नाहीत .
श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेल्या सगळ्याच गाण्यांचं गारुड मराठी रसिकांच्या मनावर असताना , १० डिसेंबर २००३ रोजी , वयाचं त्र्याहत्तरावं वर्ष चालू असताना त्यांना देवाज्ञा झाली . त्यावेळी श्रीकांतजींनीच संगीतबद्ध केलेल्या आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या , ” कळण्यासाठी मोल सुखाचे ” या गीताचे काही शब्द मला बरंच काही सांगून गेले ; ते शब्द होते , ” कीर्ती रूपाने जगण्यासाठी तुला विधीने मरण दिले ” असो . अलीकडेच त्यांना ” महंमद रफी पुरस्कार ” देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला होता . ” जसे घडले तसे ” या शीर्षकाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं . ते पुनर्मुद्रित झालं तर विस्मृतीत गेलेला गतकाळ कसा होता आणि त्यातली श्रीकांत ठाकरे यांची संगीतक्षेत्रातली दमदार वाटचाल कशी होती ते नव्या पिढीला समजू शकेल !
— प्रवीण कारखानी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button