मनोरंजन

संगीतकार सलिल चौधरी

बंगाली मातीची अस्सल जादू असलेले आणि भारतीय चित्रपटसंगीतातील नवनिर्मिती दरम्यान मेलोडीचे उस्ताद म्हणून गाजलेले संगीतकार सलिल चौधरी यांचा आज दि. 19 नोव्हेंबर जन्मदिवस.  
भाषा आणि प्रदेशाच्या सीमा ओलांडून आपली संगीत यात्रा गाजविणाऱ्या सलिल चौधरी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२२ रोजी पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगण्यातील गाझीपूर गावात झाला. त्यांचे जन्म वर्ष आंतरजालावर शोधले असता, विविध स्रोतांनी ते वेगवेगळे म्हणजे १९२२, १९२३ आणि अगदी १९२५ असे नोंदवलेले आहे.  सलील चौधरी यांची बालपणाची वर्षे आसामच्या नयनरम्य चहा बागांमध्ये गेली.  त्यांचे वडील ज्ञानेंद्र चौधरी १९३१ ते १९५१ दरम्यान आसाममधील काझीरंगाजवळील हातिकुली चहाच्या मळ्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असत. येथेच  सलील चौधरी यांच्या जीवनात संगीताची आवड रुजली, वडील संगीतप्रेमी होते त्यामुळे चहाच्या बागेत काम करणाऱ्या आदिवासी समुदायातील लोकांसोबत विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. याच वेळी सलील चौधरी चहाच्या मळ्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मलोनी यांच्या संपर्कात आले.  डॉ. मालोनी आयरिश नागरिक होते, त्यांच्याकडे पाश्चात्य शास्त्रीय ध्वनिमुद्रणांचा विशाल संग्रह होता, त्यांच्या घरी पाश्चात्य संगीत ऐकत असतांना लहानग्या सलील यांच्या मनातील संगीत संवेदनांना आकार मिळाला वडीलांमुळे सलिल चौधरींची आसाम आणि बंगालच्या लोकसंगीताशी ओळख झाली होती.  त्यांनी आवडीने बासरी, पियानो आणि व्हायोलिन वाजवायला देखील शिकले.
सलिल चौधरी हरिनवी डी.व्ही.ए.एस. विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर, कलकत्त्याच्या बंगबासी महाविद्यालयात त्यांनी पदवी प्राप्त केली.  तत्कालीन काळातील बंगालमध्ये पडलेले भयानक दुष्काळ आणि बदलत्या राजकीय वातावरणाचा प्रभाव तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा त्यांच्या मनावर परिणाम होवून ते डाव्या विचारसरणीच्या विचारधारेकडे वळू लागले.  महाविद्यालयीन काळात झालेल्या या राजकीय जागृतीमुळे त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्ये (इप्टा) सामील होत, त्यांनी वंचितांच्या समस्या मांडण्यासाठी कलेचा वापर केला.  इप्टामधूनच सलील चौधरी यांनी स्वातंत्र्यलढ्याने प्रेरित होवून राष्ट्रभावना जागृत करणारी गाणी लिहिली व संगीतबध्दही केली. 
सलील चौधरी यांच्या ‘बेचारपोटी तोमर बिचार’, ‘हे शामलो धन हो’, ‘ओ मोडेर देशोबाशी रे’, ‘कोनो एक गेयर बोधु’, ‘रनर’, ‘धेउ उथचे करा तुचे’, ‘अबाक प्रिथिबी’ या त्या काळातील गाण्यांमध्ये क्रांतिकारी आणि राजकीय क्षेत्रात लोकप्रिय झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संगीताची आवड त्यांना चित्रपटक्षेत्राकडे घेऊन गेली. सलील चौधरी यांनी परिवर्तन (१९४९) या बंगाली चित्रपटापासून आपली संगीत कारकिर्द सुरु केली.  त्यानंतर ‘बरयात्री’ (१९५१), ‘पाश्चारबारी’ (१९५२), ‘बंशेर केला’ (१९५३), ‘भोरे होय एलो’ (१९५३), ‘आज सोंध्याय’ (१९५४), ‘महिला महल’ (१९५४), ‘एक दिन राते’ (१९५५), ‘रिक्शावाला’ (१९५५), ‘रात भोरे’ (१९५५), ‘बारी थेके पालीये’ (१९५८), ‘गंगा’ (१९६०), ‘कोमोल गांधार’ (१९६१), ‘अयानंतो’ (१९६४), ‘परी’ (१९६४), ‘मरजिना अबदुल्ला’ (१९७२), ‘अकलेर संधानी’ (१९८१), ‘प्रतिज्ञा’ (१९८५), ‘महाभारत’ (१९९४) या चित्रपटातून त्यांची कारकिर्द बहरत राहिली.
त्यांच्या कारकिर्दीत ७५ हून अधिक हिंदी चित्रपट, ४१ बंगाली चित्रपट आणि २७ मल्याळम चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले.  पाश्चात्य वाद्यवृंदाचा वापर करुन भारतीय शास्त्रीय संगीतात करुन त्यांनी तयार केलेल्या मेलोडीने देशभरातील कानसेनांना वेड लावले होते. 
१९५० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी जमीन गमावल्यानंतर रिक्शाचालक म्हणून काम करणाऱ्या  शेतकऱ्याची  पटकथा लिहिली, हृषिकेश मुखर्जी यांनी बिमल रॉय यांना या पटकथेबद्दल सांगितले, या पटकथेवर चित्रपट बनविण्याचा निर्णय होवून ‘दो बिघा जमीन’ (१९५३) हा चित्रपट आला.  या चित्रपटात सलील चौधरीची कथा, रिक्शावाला आणि रवींद्रनाथ टागोर यांची कविता, दोई बिघा जोमी यांचा समावेश करत,  इटालियन नव-वास्तववादी चित्रपटापासून प्रेरित होवून केलेला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. तत्कालीन काळातील  कलात्मकता आणि व्यवसाय यांचे योग्य मिश्रण असणारा हा  पहिला चित्रपट होता. १९५४ च्या कान्स चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून हा चित्रपट यशस्वी ठरला. सलील चौधरी यांनी संगीत दिलेला हा पहिला हिंदी चित्रपटही होता.  ‘आजा री आ, निंदीया तू आ “,’ धरती कहे पुकार के”, ‘हरियाला सावन ढोल बजाता आया “आणि’ अजब तोरी दुनिया हो मेरे राजा” ही या चित्रपटातील गाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात गाणी मानली जातात.  हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी आणि गुलजार यांच्यासह सलील चाौधरी या ग्रुपचे कॅप्टन बिमल रॉय यांच्या प्रदीर्घ नात्याची व कलात्मकतेची मुहूर्तमेढ या चित्रपटापासून सुरु झाली. दो बिघा जमीन नंतर त्यांनी ‘परख’ (१९६०), ‘प्रेम पात्र’ (१९६२), ‘नौकरी’ (१९७६), ‘मीनू’ (१९७७) आणि ‘पिंजरे के पंछी’ (१९६६) या चित्रपटांच्या कथा लिहून त्यांचे दिग्दर्शनही  केले.
१९५६ मध्ये त्यांनी राज कपूर यांच्या ‘जगते रहो’ या चित्रपटाला संगीत दिले,  हिंदी चित्रपटांमध्ये आतापर्यंत चित्रित झालेली सर्वोत्तम भांगडा गाणी आहेत.  मनोहर दीपक, मौजी सिंग आणि कर्तार सिंग यांनी उत्कृष्ट अभिनय केलेले  ‘मैं कोई झूट बोलेया, कोई ना’ या गाण्याचा सलिल चौधरी यांनी संगीत दिले आहे आणि प्रेम धवन यांनी त्याचे उत्कृष्ट लेखन केले आहे.  ‘जागो मोहन प्यारे “या चित्रपटातील इतर गाणी आणि मोतीलाल यांच्यावर चित्रित केलेल्या शैलेंद्र यांच्या’ जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या” या गाण्यांनी जागते रहो मधील संदेशाला प्रभावशाली केले.
१९५८ मध्ये त्यांनी ‘मधुमति’ या चित्रपटासाठी संगीतात वेगळा प्रयोग करत हिंदी चित्रपटसृष्टीच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘दिल तडप तडप के कह रहा”, ‘ सुहाना सफर और ये मौसम”, ‘चड्ढ गयो पापी बिच्छू “,’ घडी घडी मेरा दिल धडके”, ‘टूटे हुए ख्वाबों ने “आणि’ जुलमी संग आँख लडी रे” ही गाणी आजही संस्मरणीय आहेत. १९५७ मध्ये हृषिकेश मुखर्जी यांनी ‘मुसाफिर “या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. यात दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले’ लागी नहीं छुटे राम, चाहे जिया जाये” हे युगलगीत आहे.  सलील चौधरी यांच्या गाजलेल्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे १९६१ मध्ये आलेला बिमल रॉय निर्मित ‘काबुलीवाला’, यात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर गाणे ‘ऐ मेरे प्यारे वतन’ सलीलजींनी संगीतबध्द केले आहे. 
या काळातील त्यांच्या इतर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये बिराज बहू (१९५४) नौकरी (१९५४) अमानत (१९५५) परिवार (१९५६) अपराधी कौन (१९५७) हीरा मोती (१९५९) परख (1960) उसने कहा था (१९६०) छाया (१९६१) माया (१९६१) मेम दीदी (१९६१) हाफ तिकीट (१९६२) झूला (१९६२) प्रेम पात्र (१९६२) चांद और सूरज (१९६५) पूनम की रात (१९६५) आणि पिंजरे की पंछी (१९६६) यांचा समावेश आहे. या चित्रपटातील त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘झूम झूम मनमोहन रे’, ‘छोटा सा घर होगा’, ‘मजबूर-ए-मोहब्बत ने फिर हमको पुकार है’, “चले ठुमक ठुमक तारे”, “मुन्ना बडा प्यारा अम्मी का दुलारा”,  “जा रे, जा रे उड़े जा रे पंछी”, “इतने बड़े जहाँ में”, “मेरे ख्वाबों में ख्यालों में”, “ओ सजना बरखा बहार आई”, “आह रिम झिम के ये प्यारे प्यारे”,  “चलते ही जन हो जहान तक”, “आंसू समाज के क्यों मुझे”, “आंखों में मस्ती शरब की”, “इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा”, “गंगा आए कहां से”, “ओ सबा कहना मेरे दिलदार को”, “तसवीर तेरी दिल में”, “चांद रात तुम हो साथ”, “आंखों से काजल की ले कर श्याही”, “आके सीधी लगी दिल पे जैसे कटारिया”, “दो अंखियां झुकी झुकी सी”, आणि “ये मेरे इधर उजाले ना होते” ही सदाबहार गाणी होती. 
१९६४ मध्ये, सलील चौधरी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘चेम्मीन’ या चित्रपटाद्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात ‘कडलिनाक्करे पोनोर’, ‘मानसामैने वरु’, ‘पेन्नाले पेन्नाले’ आणि ‘पुथान वलक्करे’ ही लोकप्रिय गाणी होती. मल्याळम चित्रपटरसिकांनी या गाण्यांचे खुल्या मनाने स्वागत केले. आजही सलील दा मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. मल्याळममधील त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एझुराथ्रीकल (१९६८), अभयम (१९७०), स्वप्नम (१९७३), नेल्लू (१९७४), नीलपोन्मन (१९७५), थुलवर्षम (१९७६), मदनोलसवम (१९७८), प्रतीक्षा (१९७९), पुथिया वेलिचम (१९७९), अँथिविलीले पोन्नू (१९८२), थुंबोली कडप्पुरम (१९९४) या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 
१९७१ मध्ये आलेला हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ हा हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात संस्मरणीय चित्रपट. या चित्रपटाला सलिलदा यांनी संगीत दिले होते.  राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात जीवनाचे क्षणभंगूरत्व आणि मृत्यूचे शाश्वत रुप मांडणाऱ्या ‘कहीं दूर जब’, ‘मैंने तेरे लिए’, ‘जिंदगी कैसी है पहेली’, ‘ना जिया लगे ना’ आणि ‘मौत तू एक कविता है’ या  गाण्यांनी या चित्रपटाचा संदेश प्रभावशाली करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. पार्श्वसंगीतासह कॅम्पलिंग कथात्मक रचना करण्याच्या क्षमतेसाठीही सलिल दा ओळखले जातात.   चित्रपटाच्या कथेइतकेच महत्त्वाचे पार्श्वसंगीत देत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी संस्मरणीय संगीत दिले आहे.  
बी. आर. चोप्रा यांचा गाणेरहित चित्रपट ‘कानून’ (१९६०), ‘अनोखी रात’ (१९६८), ‘इत्तेफाक’ (१९६९), ‘सारा आकाश’ (१९६९), ‘अचानक’ (१९७३), ‘मौसम’ (१९७५), ‘नौकरी’ (१९७८), ‘काला पत्थर’ (१९७९), ‘चेहरे पे चेहरा’ (१९८१) आणि ‘कमला की मौत’ (१९८९) या चित्रपटांना त्यांनी अविस्मरणीय पार्श्वसंगीत दिले होते. १९७० आणि ८० च्या दशकातील त्यांच्या चित्रपटांमध्ये मेरे अपने (१९७१), अन्नदाता (१९७२), अनोखा मिलन (१९७२), सबसे बड़ा सुख (१९७२), रजनीगंधा (१९७४), छोटी सी बात (१९७५), जीवन ज्योती (१९७६), मृगया (१९७६), उड़न छू (१९७९), आनंद महल (१९७७), चेहरे पे चेहरा (१९७५), अग्नि परीक्षा (१९८१), जेवर (१९८६), कमला की मौत (१९८९) आणि स्वामी विवेकानंद (१९९४) या चित्रपटांचा समावेश आहे. स्वामी विवेकानंद हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता. 
या काळातील त्यांच्या चित्रपटांमधील  ‘हाल चाल ठीक ठाक है’, ‘कोई होता जिसको अपना’,  ‘रोज अकेली आये रोज अकेली जाये’,  ‘नैन हमारे सांझ सारे’,  ‘ओ मेरी प्राण साजनी चंपावती आजा’,  ‘कई बार यू भी देखा है’,  ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’,  ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन’,  ‘ना जाने क्यू होता है ये’,  ‘दुनिया रंग बदली जाये’,  ‘सपना देखो मेरे खोए खोए नैना’,  ‘मिल गई अचानक मुझे हर खुशी’ यासह अनेक गाणी आजही संस्मरणीय व श्रवणीय आहेत.
त्यांच्या संगीतरचनांमध्ये, अनेकदा भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित लोकगीते आणि धून वापरण्यासह यासाठी  पाश्चात्य वाद्यवृंदाचा प्रभावशाली वापर करणेच त्यांना इतर संगीत दिग्दर्शकांपेक्षा वेगळा ठरवतो. त्यांनी अनेक वाद्यांच्या आवाजांची ओळख सिनेरसिकांना करून दिली,  गाण्यात प्रत्येक वाद्याने केवळ सुरांचे अनुसरण करण्याऐवजी स्वतःची एक अद्वितीय भूमिका बजावण्याची कामगिरी त्यांच्या संगीत दिग्दर्शनात होती. ओब्लिगटो, काउंटरपॉईंट आणि हार्मनी यांचा परिचयही त्यांनी भारतीय चित्रपटसंगीताला करुन दिला. 
सलील चौधरी यांनी १९५८ मध्ये बॉम्बे युथ कॉयरची स्थापना केली होती. भारतातील या पहिल्या धर्मनिरपेक्ष गायकवृंदात  त्यांनी संगीतकार आणि संचालक म्हणून काम केले.  त्यांच्या कार्याने भारतभरातील अनेक धर्मनिरपेक्ष गायकवृंदांच्या निर्मितीला प्रेरणा दिली. भारतीय लोकसंगीत आणि समकालीन संगीताशी स्वरसंयोजनांचे मिश्रण असलेल्या एका नवीन संगीत शैलीची ओळख करून दिली.
वैयक्तिक आयुष्यात १९५२ मध्ये सलिल दा यांनी चित्रकार ज्योती चौधरी यांच्याशी विवाह केला होता.  त्यांना अलोका, तुलिका आणि लिपिका चौधरी या तीन मुली होत्या.  त्यानंतर त्यांनी गायिका सबिता बॅनर्जी यांच्याशीही लग्न केले आणि त्यांना सुकांता आणि संजॉय हे दोन मुलं आणि अंतरा व संचारी या दोन मुली होत्या. १९७० च्या दशकात सलील चौधरी यांनी कलकत्त्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी  ‘साउंड ऑन साउंड’ या ध्वनिमुद्रण स्टुडिओसह संगीत संशोधन केंद्राची स्थापना केली.  
सलील चौधरी यांनी आपली संस्मरणीय गाणी व सूर मागे ठेवत ५ सप्टेंबर १९९५ या इहलोकाचा निरोप घेतला. २००२ मध्ये, त्यांची पत्नी सबिता चौधरी आणि मुलगी अंतरा चौधरी यांनी सलिल चौधरी यांचा संगीत वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचे जतन करण्यासाठी ‘द सलिल चौधरी फाउंडेशन ऑफ म्युझिक, सोशल हेल्प अँड एज्युकेशन ट्रस्ट’ची स्थापना केली.
– योगेश शुक्ल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button