अभिनेता, खलनायक गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा स्मृतिदिवस

आज ३ नोव्हेंबर उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, खलनायक गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव_अमरापूरकर यांचा स्मृतिदिवस.
मराठी रंगभूमीवरुन कारकीर्द सुरु करणार्या अमरापूरकर यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक अविस्मरणीय आहे. त्यांना सामाजिक कामाची खूप तळमळ होती. आपलं काम सांभाळून या कामातही ते व्यग्र राहिले.
११ मे १९५० साली त्यांचा जन्म झाला.शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती. त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘पेटलेली अमावास्या’ या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती. वयाच्या 15 व्या वर्षी सदाशिव अमरापूरकरांनी रंगमंचावर प्रवेश केला. `आमरस’ या मराठी चित्रपटात त्यांना पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी छोटय़ा भूमिका केल्या. `बाळ गंगाधर टिळक’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठी भूमिका करण्याची संधी मिळाली. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
मराठी रंगभूमीवरुन आपल्या कलाप्रवासाला सुरुवात करुन नंतरच्या काळात चित्रपटांमध्ये खलनायक जिवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी पडद्यावर साकारलेले खलनायक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये सदाशिव अमरापूर यांनी भूमिका साकारल्या. त्यांचं नाव घेतलं की `अर्धसत्य’, `सडक’ यासारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका सहज आठवतात
सदाशिव अमरापूरकर यांना समाजाविषयी कळकळ होती. त्यामुळे त्यांना सामाजिक भान कायम असायचं. अन्यायाच्या विरोधात ते नेहमी आवाज उठवायचे. काम करताना आपण बरं आणि आपलं काम बरं अशी त्यांची भूमिका असायची. आपली सगळी व्यवधानं सांभाळून ते सामाजिक कामांसाठी वेळ द्यायचे आणि त्याच्या न्यायासाठी लढा द्यायचे. ते अतिशय वरच्या दर्जाचे कलाकार होते. गोविंद निहलानी यांच्या `अर्धसत्य’ या चित्रपटामुळे बॉलीवूडला खर्या अर्थाने सदाशिव अमरापूरकर यांची ओळख झाली. `अर्धसत्य’ हा अमरापूकर यांचा पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला. `सडक’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेला उत्कृष्ट खलनायक हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटांशिवाय `विरुदादा’, `जवानी’, `आँखे’, `इश्क’, `कुली नं.1′, `गुप्त’, `आंटी नं.1′, `जयहिंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. सदाशिव अमरापूर हे जुन्या आणि नव्या पिढीतील प्रेक्षकांचे आवडते अभिनेते होते. त्यांच्याकडे उपजत गुणवत्ता होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी नेहमी जाणवत राहणार आहे.
`सडक’ या चित्रपटात अमरापूकर यांनी महारानी ही व्यक्तीरेखा साकारली होती. या व्यक्तीरेखेविषयी महेश भट्ट यांनी अमरापूकर यांना सांगितलं, ही व्यक्तीरेखा अपयशीही ठरु शकते, असंही भट्ट यांनी अमरापूरकर यांना सांगितलं होतं. असं असूनही ही ऑफर अमरापूरकर यांनी स्वीकारली. आधीच सांगितल्याप्रमाणे अभिनय करतानाच अमरापूरकर यांनी समाजासाठीही भरपूर काम केलं. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्नेहालय, लोकप्रबोधन व्यासपीठ, अहमदनगर वास्तु संग्रहालय यासारख्या संघटनाशी ते प्रामुख्याने संबंधित होते. ग्रामीण युवकांच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. हिंदी, मराठी चित्रपटांव्यतिरिक्त इतर भाषांमधील चित्रपटातही सदाशिव अमरापूरकर यांनी काम केलं.
चित्रपटांशिवाय छोटय़ा पडद्यावरही सदाशिव अमरापूरकर यांनी काम केलं. `शोभा सोमनाथ की’ या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचंही खूप कौतुक करण्यात आलं. या मालिकेत त्यांनी साकारलेला खलनायक फार महत्त्वाचा आहे. या खलनायकानेच प्रभास पाटणनगरीमध्ये घुसणं आणि सोमनाथ मंदिराची लूट करण्यात मोहम्मद गजनवीला मदत केली होती. या शिवाय अमाल अलना यांनी दिग्दर्शित केलेल्या `राज से स्वराज तक’ या मालिकेच्या चार भागांमध्ये अमरापूरकर यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली. तर श्माम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या `डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिकेच्या चार भागांमध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची व्यक्तीरेखा सादर केली. मुंबईतील वर्सोवा येथील अमरापूरकर यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या होळीच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या रेन डान्स पार्टीमध्ये पाण्याची नासाडी होत होती. त्याला आळा घालण्यासाठी अमरापूकर पुढे झाले त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. तेव्हा मीडियामध्ये त्यांचं अखेरचं दर्शन झालं होतं. काहीही असो, सदाशिव अमरापूरकर यांचं विस्मरण होणं अशक्य आहे. ते शरीराने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून ते आपल्यातच राहणार आहेत.



