मनोरंजन

तेरे जैसा यार कहाँ … अमजद खान!

(जन्म : १२ नोव्हेंबर १९४३, मृत्यू : २७ जुलै १९९२)
चित्रपट, मग तो कोणत्याही भाषेतील असो त्यात नायकाइतकंच महत्व असतं ते खलनायकाला. कारण ही दोघंही चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू असतात. सामान्यपणे नायक, नायिका, चरित्र नायक/नायिका , विनोदी नायक/नायिका यांना जितकी लोकप्रियता मिळते त्या तुलनेत खलनायकाच्या वाट्याला ती कमीच येते. पण हा समज आणि पायंडा खोडून काढणारे काही खलनायक चित्रपटसृष्टीला लाभले. या श्रेणीत सर्वात अग्रीम स्थान मिळालं ते अमजद खान यांना. हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची पारंपरिक चौकट तोडत खलनायकाला नायकाइतकीच उंची प्रदान करणाऱ्या अमजद खान यांनी एक इतिहास घडवला आणि त्यानंतर नकारात्मक भूमिकेत आपली अभिनय कारकीर्द करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी त्यांनी ‘अच्छे दिन’ ची सुरुवात केली.
रुपेरी पडद्यावर विकृत खलनायक साकारणारे अमजद खान हे उच्चविद्याविभूषित होते. मुंबई विद्यापीठात पार्शियन विषयातील ते टॉपर विद्यार्थी होते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पत्रकार होण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी काही काळ त्यांनी वृत्तसंस्थेत देखील काम केले होते. हिंदी, उर्दू आणि पार्शियन भाषेत त्यांचं प्रभुत्व होतं. रुपेरी पडद्यावर त्यांनी ‘नाजनीन’ या १९५१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर ‘अब दिल्ली दूर नही’, ‘माया’ या चित्रपटात ते रुपेरी पडद्यावर दिसले. पुढे ख्यातनाम दिग्दर्शक के असिफ यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमजदची ‘Love and God’ या चित्रपटात वर्णी लागली.
१९७३ सालच्या ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटापासून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम (सलीम-जावेद या जोडीपैकी एक) यांनी अमजद खान यांचे नाव रमेश सिप्पी यांना, त्यांच्या शोले चित्रपटासाठी सुचवले. अमजद खान यांच्यासाठी ही फार मोठी संधी होती आणि त्यांनी या संधीचे सोने केले. त्यांच्यासाठी ही भूमिका ‘लार्जर दॅन लाईफ’ ठरली आणि हीच त्यांची कायमस्वरूपी ओळख देखील बनली. त्यानंतर त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास प्रशस्त झाला. असं म्हणतात कि गब्बर च्या भूमिकेसाठी अगोदर अभिनेते डॅनी यांना विचारणा झाली होती. परंतु ते त्यावेळी फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यानंतर या भूमिकेसाठी अभिनेते विनोद खन्ना यांना देखील विचारणा झाली होती. मात्र तारखांच्या समस्येमुळे त्यांनी देखील ही भूमिका नाकारली. कदाचित ही भूमिका फक्त आणि फक्त अमजद खान यांच्यासाठीच बनलेली असावी. कारण आज जेव्हा आपण मागे वळून या भूमकेकडं बघतो तेव्हा गब्बर च्या भूमिकेत अमजद खान सोडून इतर कोणाची आपण कल्पना देखील करू शकत नाही. इतकं वलय ‘गब्बर’ नावाच्या व्यक्तिरेखेमागे अमजद खान यांनी निर्माण करून ठेवलं आहे.
ही व्यक्तिरेखा साकारताना अमजद खान यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तिचं वेगळेपण सिध्द करण्यासाठी त्यांनी आपल्या निरीक्षण शक्तीचा अत्युच्च पातळीवर वापर केला. तुम्ही जर रुपेरी पडद्यावरील गब्बरची व्यक्तिरेखा आठवली तर तुमच्या लक्षात येईल कि किती बारकावे होते त्यांच्या हालचालीत, बोलचालीत. गब्बर अत्यंत विक्षिप्त आणि क्रूर होता, पण त्याची देहबोली आणि बोलीभाषा ही अत्यंत सामान्य होती. त्यामुळंच तर तो सामान्य प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट झाला. खिशातून तंबाखूची चंची काढणं, ती परत खिशात ठेवणं, तळहातावर तंबाखू चोळत चुटकी मारत ती तोंडात कोंबणं, “अरे हो साम्भा, कितना इनाम रखे है रे सरकार हमपर” यासारखे बोलीभाषेतील संवाद या सगळ्यामुळं सामान्य रसिकाला तो आपल्यापैकीच एक वाटला. ‘गब्बर’ या पात्राच्या प्रचंड लोकप्रियतेचं आणि अजरामर होण्याचं कदाचित हे मुख्य कारण असावं. यासाठी ते सेटवरच्या कर्मचाऱ्यांचं, स्पॉट बॉईज इत्यादींचं निरीक्षण करायचे. असं म्हंटलं जातं कि त्यांना ही आयडिया हरिभाई अर्थात संजीवकुमार यांनी दिली होती.
खरं तर अमजद खान यांच्या अगोदर अभिनेते प्राण यांनी खलनायकाची जागा व्यापली होती. ती इतकी प्रचंड होती कि, त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पना करण्याचं धाडस ना तर निर्माता – दिग्दर्शक करायचे नाही प्रत्यक्ष रसिक! पण जेव्हा प्राण यांनी चरित्र भूमिकांकडं आपला मोर्चा वळवला तेव्हा खलनायकाची जी पोकळी निर्माण झाली ती अमजद खान यांनी समर्थपणे भरून काढली. प्राण यांनी रुपेरी पडद्यावरील खलनायकाला जी लोकप्रियता मिळवून दिली होती आणि नायकाच्या तोडीस तोड त्याची एक जागा निर्माण केली होती ती अमजद खान यांनी आपल्या समर्थ अभिनयानं कायम ठेवली. आपल्या नकारात्मक भूमिकांमध्येही त्यांनी वैविध्य जपलं. त्या एकसुरी होणार नाहीत याची काळजी घेतली. त्यांच्यासमोर हे कडवं आव्हान होतं, पण ते त्यांनी लीलया पेललं. म्हणून तर शोले च्या गब्बर इतकाच, चरस मधील ‘रॉबर्ट’, परवरीश मधील ‘डाकू मंगलसिंग’, मि. नटवरलाल मधील ‘विक्रम सिंग’, काला पानी मधील ‘शेरा’, बरसात कि एक रात मधील ‘कालिराम’, मुकद्दर का सिकंदर मधील ‘दिलावर’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी तितक्याच डोक्यावर घेतल्या. यातील प्रत्येक भूमिका नकारात्मक, पण ती प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी वेगळ्या पध्दतीनं साकारली.
‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या ‘दिलावर’ या नकारात्मक भूमिकेला जोडलेली जोहरा वरच्या खऱ्या प्रेमाची भावनिक किनार पाहताना सिकंदर इतकाच रसिक दिलावर साठीही हळहळताना दिसतो. अमजद खान यांच्या अभिनय क्षमतेचा हा केवढा आवाका म्हणावा लागेल! केवळ नकारात्मक भूमिकाच नाही तर त्यांनी साकारलेल्या चरित्र आणि विनोदी भूमिका देखील तितक्याच अविस्मरणीय आहेत. ”लावारीस’ चित्रपटातील असहाय बाप, ‘याराना’ चित्रपटातील सच्चा दोस्त, ‘चमेली कि शादी चित्रपटातील अनिल कपूर यांचा लव्हगुरू या अमजद खान यांनी साकारलेल्या भूमिका रसिक आजपर्यंत विसरू शकलेले नाहीत.
अमजद खान कलाकार म्हणून जितके उत्तम होते तितकेच एक व्यक्ती म्हणूनही उत्तम होते. सहकलाकारांशी असलेलं त्यांचं नातं अत्यंत भावनिक पातळीवर असायचं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेलं त्यांचं मैत्रीचं नातं तर संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक आदर्श उदाहरण होतं. अमजदखान यांचा दुर्दैवी अपघात झाला तेव्हा अमिताभ ‘द ग्रेट गॅम्बलर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. अपघाताची बातमी समजताच चित्रीकरण सोडून ते तडक अमजदजींकडं गेले आणि स्वतः त्यांचे उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सोबत राहिले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य केलं, त्यांचं मनोधैर्य वाढवलं. अमजद खान यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती तेव्हा कुटुंबातील जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांवर स्वतः स्वाक्षरी केली. ‘कुली’ चित्रपटाच्या दरम्यान अमितजींना अपघात झाला तेव्हा अमजदखान त्यांच्या मदतीला धावून गेले. या प्रसंगांमुळं त्यांच्यातील मैत्री अधिक गहिरी झाली. परवरीश, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, लावारिस, बरसात की एक रात, याराना, कालिया, देश प्रेमी, नास्तिक, महान असे एकाहून एक सरस चित्रपट दोघांनी दिले. यांची मैत्री लक्षात घेऊन दिग्दर्शक राकेश कुमार यांनी ‘याराना’ (१९८१) हा चित्रपट बनवला होता.
अमजद खान कुटुंबवत्सल होते. त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव शैला खान असून दोघांचंही लग्न १९७२ मध्ये झालं होतं. पण अभिनेता अमजद खान जेव्हा शैलाच्या प्रेमात पडले , त्यावेळी ती केवळ १४ वर्षांची होती. तेव्हा अमजद पदवीचं शिक्षण घेत होते , तर शैला शाळेत शिकत होती. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत शैलाने याचा खुलासा केला होता. अमजद खान यांनी शैलाच्या घरी रीतसर लग्नाचा प्रस्ताव पाठवला. सुरवातीला त्यांनी नकार दिला, पण काही वर्षांनी त्यांनी परवानगी दिली आणि उभयतांनी सुखाचा संसार केला.
अमजद यांची चित्रपट कारकीर्द तशी छोटीच. अवघ्या पंधरा वर्षांची! या काळात त्यांनी तब्बल सव्व्वाशेहून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या. अपघातामुळं काही काळ त्यांना व्हीलचेअर वर बसावं लागलं. औषधांच्या साईड इफेक्ट मुळं त्यांचं वजन वाढलं आणि वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी २७ जुलै १९९२ रोजी हृदयविकारानं त्यांचं दुःखद निधन झालं. असं म्हणतात कि, “तुम्ही किती जगलात हे महत्वाचं नाही तर, तुम्ही कसं जगलात हे महत्वाचं आहे.” या न्यायानं ५२ वर्षांच्या अल्प आयुष्यात आणि १५ वर्षांच्या अत्यल्प कारकिर्दीत अमजद खान नावाच्या सिताऱ्यानं आपल्या अभिजात अभिनय क्षमतेच्या सामर्थ्यावर रसिकांच्या मनात असं अढळ स्थान निर्माण केलं आहे कि पुढची ५२ वर्षेच काय तर ५२ युगं हे स्थान कोणीही हलवू शकणार नाही. अमजद खान एक असे असामान्य कलाकार होते कि ज्यांनी क्रौर्य आणि प्रेम या दोन्ही परस्पर विरोधी भावना एकाच व्यक्तीविषयी मनात दाटून आणण्याची अद्भुत किमया प्रत्यक्षात साध्य केली. म्हणून तर बघा ना, अमजद खान हे नाव उच्चारताच ‘ये हाथ मुझे दे दे ठाकूर’ असं म्हणत ठाकूरचे हात कापणार क्रूर गब्बर आपल्या डोळ्यासमोर येतो आणि दुसऱ्याच क्षणी ‘तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा याराना’ असं म्हणायला लावणारा सच्चा मित्रंही डोळ्यासमोर येतो. जोवर ही सजीव सृष्टी आहे तोवर पिढ्यानपिढ्या एक उत्कृष्ठ कलाकार म्हणून अमजद खान हे नाव कायम घेतलं जाईल यात शंकाच नाही.
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदार संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button