सामाजिक

अक्कलकोटच्या पाणीपुरवठ्याला ‘बूस्टर’; वाढीव यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कामांना वेग

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : अक्कलकोट शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि विनाअडथळा करण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणेत वाढीव क्षमतेची पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासह जलशुद्धीकरण केंद्रातील सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करून वाढीव यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.
कुरनूर धरणास भेट देऊन कल्याणशेट्टी यांनी जलउपसा यंत्रणेची पाहणी केली. धरणातील जलउपसा विहीर (इंटेक) ते नदीपात्रातील उद्भव विहीर (जॅकवेल) या दरम्यान सुमारे 72 मीटर लांबीची आणि अडीच फूट व्यासाची नवीन पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली. उर्वरित काम कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर अक्कलकोट येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सध्या सुरू असलेला पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करून नागरिकांना अधिक सुरळीत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची आहेत.
कुरनूर धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचीही पाहणी करून शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने उपलब्ध जलस्रोताचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदारांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, नगरपालिकेचे पक्षनेते यशवंत धोंगडे, पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी, पाणीपुरवठा अभियंता मनोज ईश्वरकट्टी आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया -“अक्कलकोट शहरातील सध्या सुरू असलेला पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करण्यासाठी कुरनूर धरणातील इंटेक ते जॅकवेल दरम्यान मोठ्या व्यासाची पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील कामांचीही तातडीने पाहणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांना उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वाढीव यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यातील अडथळे कमी होऊन नागरिकांना अधिक सुरळीत पाणी मिळण्यास मदत होईल.”
 मिलन कल्याणशेट्टी, 
नगराध्यक्ष, अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button