सामाजिक

अत्रेंच्या नजरेतून नेहरू…!

पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मोठेपण समजून घ्यायचं असेल तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं ‘सूर्यास्त’ हे पुस्तक जरूर वाचावं. जिवंतपणी नेहरूंवर ‘जवाहरलाल की जहरलाल’ अशी टोकाची टीका करणारे अत्रे, नेहरूंच्या महापरिनिर्वाणानंतर १५ लेखांची एक मालिका लिहून नेहरुंना शब्द सुमनांजली अर्पण करतात. शब्दप्रभू आचार्य अत्रे यांनी ‘सूर्यास्त’ या पुस्तकात नेहरूंबद्धलच्या आपल्या भावना वेगवेगळ्या लेखामध्ये व्यक्त केल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निर्णय आणि धोरणातल्या काही बाबींवर अत्रे असहमती दर्शवत असतानाच नेहरुंच्या संपूर्ण कारकिर्दीचं मूल्यमापन करत नेहरूंचं मोठेपण एका वाक्यात सांगताना अत्रे म्हणतात, “सूर्यावर देखील डाग असले तरी, त्यामुळं तो काजवा ठरत नाही. सूर्य तो सूर्यच!”
‘अश्रू आणि फुले’ या लेखामध्ये अत्रे म्हणतात, “जिवंतपणी सर्वत्र जयजयकार आणि मृत्यूनंतर चहुकडे हाहा:कार अशी विराट आणि विश्वव्यापी लोकप्रियता पंडित नेहरूंना जेवढी लाभली, तेवढी क्वचितच यापूर्वी जगातल्या कोणत्याही महापुरुषाला लाभली असेल. जागतिक लोकप्रियतेचे शतकानुशतकांचे उच्चांकच नेहरूंनी मोडून टाकलं असं म्हणावयाला हवंय. नेहरू हे केवळ राष्ट्रपुरुष नसून विश्व पुरुष होते ही गोष्ट त्यांच्या मृत्यूनंतर का होईना, पण आता सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झालेली आहे. नेहरुंच्यावर शोकाश्रूंची जेवढी वृष्टी झाली, तेवढाच प्रेमाच्या आणि आदराच्या फुलांचाही अपरंपार वर्षाव झाला. किंबहुना, आमच्यापैकी कोणाचा वर्षाव अधिक होतो आहे याची ‘अश्रू आणि फुले’ यांच्यामध्ये जणू काही चढाओढच लागून राहिली होती!” अशा शब्दांमध्ये नेहरूंचा अंतिम यात्रेचे वर्णन अत्रे यांनी केले आहे. आज तुमच्या माझ्या साहित्यिक, सांस्कृतिक जीवनाला रसिकतेनं भरून टाकणाऱ्या विविध संस्थांची निर्मिती नेहरू करू शकले कारण मुळात नेहरु हे एक रसिक मनाचे राज्यकर्ते होते. नेहरूंच्या छातीवर विराजमान असणारा गुलाब, हे नेहरूंच्या रसिकतेचं प्रतीक होतं. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचा आस्वाद घेण्याची उत्कट आसक्ती असलेल्या नेहरुंच्या रसिकतेबद्धल अत्रे ‘रसिकराज नेहरू’ या लेखामध्ये लिहितात “सामान्य माणसाचं मृत्युपत्र म्हणजे जीव गेल्यावर मागे उरलेल्या निर्जीव मालमत्तेच्या विल्हेवाटीचा रुक्ष हिशेब! त्या मृत्युपत्रा मधल्या कायद्याच्या रखरखीत भाषेत काव्याचा ओलावा यावा कोठून? उलट त्याच्या प्रत्येक शब्दामधून मृत्यूची भेसूर अवकळा डोकावत असते. जनावराच्या मुडद्याचे लचके तोडण्यासाठी गिधाडांचे झगडे होतात, त्याप्रमाणे मृत्युपत्रानं वाटून दिलेल्या टीचभर मालमत्तेसाठी अनेकदा मृताच्या वारसांचे क्षुद्र तंटे माजतात आणि त्या बखेड्यामध्ये मृताविषयीचा शोक, एवढंच काय, पण साध्या माणुसकीचा लवलेशही नष्ट होतो. पण नेहरूंचं मृत्युपत्र या साऱ्या जगरहाटीला अपवाद आहे.
या पृथ्वीतलावर नि या भारतामध्ये आजवर अनेक श्रेष्ठ राजकीय मुत्सद्दी नि उदंड कीर्तीचे सत्ताधारी होऊन गेले. पण साक्षात् स्वतःचं मृत्युपत्र लिहितानाही ज्यांचं मन हृदयंगम नि भव्य काव्यकल्पनांच्या आकाशात उंच भराऱ्या घेत होतं. असं एकमेव प्रतिभाशाली राजकीय नेते जवाहरलालच होत!जवाहरलालजींचं सारं जीवनच या काव्यमय वृत्तीनं भारलेलं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यापासून आमरण, राजकारणाची काट्याकुट्यांनी भरलेली वाट चालत असतानाही हृदयावर त्यांनी रसिकतेचा टवटवीत नि कोमल गुलाब सतत धारण केलेला होता. राजकीय संघर्षाच्या धकाधकीतही तो गुलाब नकळत पायदळी पडून चुरडला गेला नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या होमकुंडातही तो होरपळला नाही. राजकीय पराजयांच्या धगीनेही तो सुकून गेला नाही. क्षुद्र पक्षीय झगड्यांच्या बुजबुजाटातही तो किडला नाही. पंतप्रधान या नात्यानं देशाच्या आणि जगाच्या अनेक चिंतांच्या झळी नेहरूंना सतत लागत असतानाही त्यांच्यामुळं तो गुलाब कोमेजला नाही. नेहरूंच्या वार्धक्यातही तो निर्माल्य झाला नाही. तो रसिकतेचा गुलाब नेहरूंच्या अंतःकरणात अखेरपर्यंत बहरत राहिला, सुगंध दरवळवीत राहिला!”
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूपत्रातल्या इच्छेप्रमाणे नेहरूंच्या अस्थी विसर्जित केल्या जाणार होत्या, त्यादिवशी अत्रे यांनी ‘अखेरचा प्रणिपात’ हा लेख लिहिला. या लेखामध्ये अत्रे म्हणतात, “आजपर्यंत नेहरूंचं वास्तव्य केवळ दिल्लीत किंवा ते संचार करतील तिथंच होत असे. पण ह्यापुढं त्यांचं वास्तव्य अखिल भारतवर्षात होणार, किंबहुना साऱ्या भारताला ते व्यापून राहणार. पूर्वी नेहरू भारतमय होते. यापुढं भारत नेहरूमय होणार. जीवनात नेहरू जेवढे मोठे होते त्यापेक्षा अनंत पटीनं आता ते अधिक मोठे होणार यात काय शंका? नेहरूंच्या रक्षेचे कण ज्या ज्या शेतात पडतील त्यातून देशाच्या उद्धारासाठी जन्मभर झगडणाऱ्या नव्या नेहरुंचं अमाप नि तजेलदार पीक जन्माला येवो. नेहरूंच्या रक्षेचे कण ज्या ज्या नद्यांमध्ये विसर्जित करण्यात येतील, त्या त्या नद्यांमधून त्यांच्या देशभक्तीच्या ज्वलंत प्रेरणा साऱ्या भारतामध्ये वाहत जावोत! नेफाच्या नि लडाखच्या ज्या पहाडांवर नि पठारांवर नेहरूंच्या रक्षेचे कण पडतील, तिथल्या कणाकणांतून ‘ने-हरू! ने-हरू!! कधीही हरणार नाही- कधीही हरणार नाही-! अशा वीरगर्जना उत्तरेच्या आक्रमणापासून भारताचे संरक्षण करणाऱ्या आमच्या शूर सैनिकांना एकसारख्या चेतना देत राहोत! अशा रीतीनं मरणानंतर भारताच्या कणाकणांमध्ये नेहरूंनी आता प्रवेश केला असल्यामुळं, दिनादिनाला नि क्षणाक्षणाला त्यांचं स्मरण आम्हांला झाल्यावाचून राहणार नाही. स्मरणानंच माणसाच्या मरणाला खरं मोल येतं. स्मरणात खरोखर जग जगते! कविवर्य हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक दिवस यापुढे सूर्याचे गुलाबफूल आपल्या छातीवर खोवूनच उगवेल नि भारताला नेहरूंचे स्मरण करून देत जाईल!” अत्रे म्हणतात त्याप्रमाणे दिनादिनाला आणि क्षणाक्षणाला नेहरूंचं स्मरण होणाऱ्या काळामध्ये आज आपण जगत आहोत. नेहरूवर प्रेम करणारे, टीका करणारे आणि नेहरुंचा पराकोटीचा द्वेष करणारे असे सर्वच जण आज आपआपल्या पद्धतीनं नेहरूंचं स्मरण करत आहेत.
‘भारताचे ऋतुराज’ या लेखामध्ये आचार्य अत्रे म्हणतात, “नेहरू हे राजकारणातले एक प्रतिभाशाली कवीच होते असं म्हटलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांनी ‘ऋतुराज’ या विशेषणानं नेहरूंचा गौरव केलेला आहे. वसंत ऋतु हा जसा सुगंधाचा, सौंदर्याचा आणि तारुण्याचा स्फूर्तिदाता असतो. त्याप्रमाणे कोट्यावधी लोकांना आनंद, आल्हाद आणि स्फूर्ती देणारे नेहरु हे भारताचे ‘ऋतुराज’च होते, असंच त्यांचं वर्णन करावं लागेल!” अत्रे यांनी लिहिलेला ‘भारताचे ऋतुराज’ हा लेख आजच्या काळात वाचल्यानंतर शालेय अभ्यासक्रमातल्या इंदिरा संत यांची ‘पानगळ’ ही कविता आठवते,
“आला शिशिर संपत
पानगळती सरली
ऋतुराजाची चाहूल
झाडा वेलींना लागली l”
ऋतुराज नेहरू यांच्या कार्यकाळात या भारतराष्ट्राच्या वृक्षाला जीवनरस पुरवणाऱ्या, विविध संस्थांची, लोकशाही मुल्यांची पालवी फुटली होती. त्याच संस्थांची, मुल्यांची पानगळ, पानझड होण्याचा हा काळ आहे. हे झाड अधिक बहरेल, अधिक चांगले दिवस येतील ही अपेक्षा फोल ठरलेली असतांना आता झाडा वेलींना ऋतुराजाचं परत स्मरण होऊ लागलं आहे. मागे एकदा नाशिक परिसरात कुठंतरी काजवे पाहण्यासाठी लोक जमत आहेत अशी बातमी एका वृत्तपत्रात वाचली होती. लोकांचं तरी काय चुकलं म्हणा! सूर्यास्त झाल्यानंतर लोकांना काजवेच पाहावे लागणार ना! पण आता लोकांना, आपण या राष्ट्राला एका मध्यरात्री दिलेल्या वचनांची, नियतीशी केलेल्या कराराची आठवण होऊ लागली आहे. परत एकदा सूर्यदर्शन व्हावं, परत एकदा वसंत बहरावा असं वाटू लागलं आहे आणि त्यामुळंच ‘Revisiting Nehru’ ही प्रक्रिया होतांना दिसून येते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button