क्राईम

चिचोंडी शिराळ हल्ला प्रकरण: मुख्य आरोपी एकनाथ आटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात; पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई

पाथर्डी (प्रतिनिधी):
चिचोंडी शिराळ येथील शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष एकनाथ गोविंद आटकर यांना पाथर्डी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आटकर यांना अटक करण्यात पाथर्डी पोलिसांना मोठे यश आले असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
​न्यायालयाकडून जामीन फेटाळताच पोलिसांनी आवळल्या आवळल्या मुसक्या.
​१ मार्च रोजी चिचोंडी शिराळ जवळील तिरमल वस्ती येथील शाळेत संगणक संच वाटपाच्या कार्यक्रमावरून दोन गटात तीव्र वाद झाला होता. या वादातून आटकर गटाने भगवान फुलमाळी आणि भास्कर आटकर यांच्यावर लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.
​या घटनेला तीन महिने उलटून गेले तरी मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होता. दरम्यान, आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि त्यानंतर अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, अतिरिक्त न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एकनाथ आटकर यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळून लावला. न्यायालयाचा हा निर्णय येताच पाथर्डी पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली.

​या संवेदनशील प्रकरणाचा तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी कौशल्यपूर्ण तपास करत अखेर मुख्य आरोपी एकनाथ आटकर याच्या मुसक्या आवळल्या.

चौकट:
​”गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणातील इतरही काही फरार आरोपी अद्याप मोकाट असून, त्यांनाही लवकरच पोलिसांच्या ताब्यात घेतले जाईल.”
— पाथर्डी पोलीस प्रशासन

​तालुक्याचे लक्ष लागलेल्या कारवाईने उडाली खळबळ:
​दीर्घकाळापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आल्यामुळे पाथर्डी तालुक्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणातील इतर सह-आरोपींच्या शोधात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button