टॉप न्यूज

डिलिमिटेशन बिलमुळे उत्तर-दक्षिण संघर्षाची ठिणगी पडणार; चीन-पाकिस्तानकडून भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर

 

कोलंबोतील बैठकीत डिलिमिटेशन आणि मुंबई हल्ल्याशी संबंधित मुद्दे उपस्थित; डीएमके आणि चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाला बिल रोखण्याचे आवाहन

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुण्यातील पाटील हेरिटेज, भोसले नगर येथे डिलिमिटेशन बिलाच्या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी डिलिमिटेशन बिलासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डिलिमिटेशनच्या निमित्ताने देशात नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता असून, विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एप्रिलमध्ये मांडण्यात आलेले डिलिमिटेशन बिल मंजूर झाले नाही आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा हे बिल मांडण्यात आले. एप्रिलमध्ये बिलाचा पराभव होणे आणि नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा मांडले जाणे, या दोन घटनांमधील घडामोडी भारतीय जनतेने समजून घेणे आवश्यक आहे.

या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली. एनसीपी हा आमचाच पक्ष आहे, दाऊद इब्राहिमचाच पक्ष आहे, असे वक्तव्य करत या पक्षाकडून पाठिंबा मिळत असल्याचे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात तडजोडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संदर्भात त्यांनी चीनच्या अरुणाचल प्रदेशमधील कथित अतिक्रमणाचा, अक्साई चीनवरील चीनच्या दाव्याचा आणि ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचा मुद्दा उपस्थित केला. चीनच्या बाजूने यारलुंग त्सांगपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर ६० गिगावॅट वीज निर्माण करणारे धरण उभारण्यात येणार असून, ग्रेट बेंडच्या अगोदर पाणी अडवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांवर दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. या राज्यांना पाणी हवे असेल तर चीनसोबत यावे, अन्यथा त्यांचा प्रदेश सुकवला जाईल, अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.

तसेच, लंडन मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजने जून-जुलैमध्ये कोलंबो येथे आयोजित केलेल्या परिषदेकडेही त्यांनी लक्ष वेधले. या परिषदेत अफगाणिस्तान, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, भारत आणि बांगलादेशमधील रणनीतीविषयक क्षेत्रातील सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारताच्या वतीने माजी लष्करप्रमुख नानावरे यांच्यासह इतर प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माधव राम माधव यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.

राम माधव कोणत्या क्षमतेत या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीचा नेमका उद्देश काय होता, याचा खुलासा झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले. भारतविरोधी कारवाया एका बाजूला चीनकडून, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोलंबोतील बैठकीत राम माधव यांच्यासमोर दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आल्याची माहिती असल्याचे सांगत ॲड. आंबेडकर म्हणाले की, डिलिमिटेशन बिल आणणार आहात की नाही, हा पहिला मुद्दा होता. तर दुसरा मुद्दा म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होता. हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांच्या शरीरातून कोणत्या गोळ्या बाहेर काढण्यात आल्या, याचा उल्लेख न्यायालयीन प्रकरणात नसल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईवरील हल्ल्यात कोणाकोणाची काय भूमिका होती, हेही बाहेर काढण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डिलिमिटेशनची मागणी देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नसताना अचानक हा मुद्दा पुढे आणण्यात आल्याचे सांगत ते म्हणाले की, चीन आणि पाकिस्तानकडून भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी अमेरिकेकडून भारतावर दबाव आणला जात होता, आता पाकिस्तानही या परिस्थितीत सक्रिय झाला आहे. ज्या गोष्टी लपवायला नको होत्या, त्या लपवल्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आल्याचे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले.

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर दक्षिण भारताच्या आर्थिक योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तर भारतातील उत्पन्न १२ लाख कोटी रुपये, तर दक्षिण भारतातील उत्पन्न २२ लाख कोटी रुपये असल्याचे सांगत दक्षिण भारत हे मोठे आर्थिक बाजारपेठ क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले. या बाजारपेठेवर अनेकांचे लक्ष असल्याचेही ते म्हणाले.

डिलिमिटेशनमुळे संसदेतील प्रतिनिधित्वाच्या वाटपात लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे. एका जागेमागे किती मतदार असतील, याचा आकडा निश्चित करून त्यानुसार राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर जागांचे वाटप केले जाईल. मात्र, कुटुंब नियोजन आणि लालबहादूर शास्त्री यांच्या ‘हम दो हमारे दो’ या धोरणामुळे दक्षिण भारतातील लोकसंख्यावाढ उत्तर भारताच्या तुलनेत २० ते २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे उत्तर भारताला अधिक जागा आणि दक्षिण भारताला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. यातून दक्षिण भारतात अलिप्ततेची भावना निर्माण होऊन संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाला डिलिमिटेशनची एवढी घाई का झाली आहे, याचा खुलासा केंद्र सरकार करत नसल्याचेही त्यांनी म्हटले. सध्याच्या संसदेतील राज्यनिहाय खासदारांच्या संख्येबाबत राज्यांमध्ये कोणताही असंतोष नाही. असे असताना अचानक डिलिमिटेशनचे अस्त्र बाहेर काढण्यामागे कोलंबोतील बैठक हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. भारतविरोधी शक्तींकडून भाजप आणि आरएसएसलाही ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई हल्ल्यानंतर आपण आणि गोपीनाथ मुंडे यांनी मांडलेले मुद्दे त्यावेळी ऐकले गेले असते, तर देशाची आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत चंद्राबाबू नायडू आणि डीएमके यांच्या हातात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी या दोन्ही पक्षांना डिलिमिटेशन बिल रोखण्याचे आवाहन केले. डिलिमिटेशन बिल मंजूर झाल्यास देशात अनेक संघर्ष निर्माण होतील. त्यामुळे डीएमके आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने सरकारच्या दबावाला बळी न पडता मतदान होईपर्यंत विरोध कायम ठेवावा आणि हे बिल हाणून पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

संविधान सभेच्या काळात भाषेच्या मुद्द्यावरून दक्षिण भारतातील राज्ये एकत्र येण्यास तयार नव्हती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाद्वारे इंग्रजी भाषेचा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेत भारत एकत्र ठेवण्यासाठी दक्षिण भारतातील लोकांना संतुष्ट ठेवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील समतोल कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डिलिमिटेशनच्या माध्यमातून भविष्यात देशात उत्तर-दक्षिण असा नवा वाद निर्माण होऊ नये आणि डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी मिटवलेला हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button