लोकसभेच्या ८५० जागांवरून पृथ्वीराज चव्हाण आक्रमक संसदेची अवस्था साखर कारखान्याच्या सभेसारखी होईल

कराड – लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून थेट ८५० करण्याच्या हालचालींना काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध दर्शवला आहे. जर खासदारांची संख्या ८५० केली, तर देशाच्या संसदेला काहीच अर्थ उरणार नाही आणि तिची अवस्था एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या सभेसारखी होईल, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदस्यसंख्या ८५० झाल्यास मोदी सांगतील त्याप्रमाणे केवळ हात वर करायचे, चहा आणि लाडू चिवडा खाऊन निघून जायचे, अशीच परिस्थिती संसदेत निर्माण होईल, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने २९ नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर केले जाण्याची शक्यता असल्याने देशभरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या वेगाने घडामोडी सुरू झाल्या आहेत. या अधिवेशनाच्या तांत्रिक बाजूवर बोट ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित न केल्यामुळेच सरकारला हे नवीन अधिवेशन बोलावता आले. त्यामुळे प्रत्यक्षात हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणालाही विश्वासात न घेता, लपून छपून आणि मागच्या दाराने हे परिसिमन अर्थात डिलिमिटेशन विधेयक आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.
यावेळी पक्षाची भूमिका मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा पाहिल्याशिवाय त्यावर अंतिम भूमिका घेता येणार नाही. परिसिमन ही एक घटनात्मक तरतूद असल्याने काँग्रेसचा या प्रक्रियेला विरोध नाही. सरकारला परिसिमन करायचे असल्यास त्यांनी ते जरूर करावे. परंतु, राज्यांच्या तुलनात्मक जागांची संख्या बदलून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार असेल, तर त्याला काँग्रेसचा ठाम विरोध राहील. महिला आरक्षण लागू करण्यासाठीच डिलिमिटेशन केले जात असल्याचा दावा केंद्रातील भाजप सरकारकडून केला जात आहे. मात्र हा दावा म्हणजे निव्वळ बोगसगिरी आणि खोटारडेपणा असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.
या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जुन्या घटनांचा दाखला दिला. देशात १९५१, १९६१ आणि १९७१ मधील जनगणनेनंतर परिसिमन झाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल, ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळेच १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या २५ वर्षांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला. पुढे २००१ मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ही मुदत आणखी २५ वर्षांसाठी कायम ठेवली होती. आताही १९७६ मध्ये ठरलेली लोकसभेतील ५४३ ही सदस्यसंख्या तशीच कायम ठेवून पुढे गोठवावी, अशी मागणी काँग्रेसने केली असल्याचे त्यांनी सांगितले.


