हन्नूरच्या मातीपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत…

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड म्हणजे
साहित्यिक कर्तृत्वाचा सन्मान…!
भीम जयंतीच्या मिरवणुकीतील एक अविस्मरणीय भेट…!
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संशोधक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड होणे ही केवळ एका साहित्यिकाचा गौरव करणारी घटना नाही तर त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासाचा, वैचारिक संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान आहे. डॉ. लिंबाळे हे सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहेत, ही माझ्यासाठी त्या कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणून विशेष आनंदाची बाब आहे. त्यांच्या या निवडीने सोलापूरच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रालाही अभिमानाचा क्षण दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या छोट्याशा कन्नड भाषिक खेड्यात जन्मलेल्या एका मुलाचा प्रवास पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचतो. ही गोष्ट विलक्षण प्रेरणादायी आहे. माणसाचा जन्म कुठे झाला, त्याची परिस्थिती कशी होती किंवा त्याच्या वाट्याला कोणती सामाजिक आव्हाने आली, यापेक्षा तो आपल्या कर्तृत्वाने स्वतःला किती उंचीवर घेऊन जातो, हे अधिक महत्त्वाचे असते. डॉ. लिंबाळे यांचा प्रवास याच जिद्दीचा, प्रतिभेचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा प्रत्यय देणारा आहे.
त्यांच्या साहित्याने मराठी साहित्यविश्वाला नवी वैचारिक दिशा दिली. विशेषतः दलित साहित्य, सामाजिक विषमता, जातिव्यवस्था, वंचितांचे जगणे, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्याय या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे अभिव्यक्त केले. ‘अक्करमाशी’सारख्या आत्मकथनाने मराठी साहित्याच्या संवेदनशीलतेला नवे परिमाण दिले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी शक्ती आहे, हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे केवळ साहित्यिक नियुक्ती म्हणून नव्हे तर एका महत्त्वपूर्ण वैचारिक प्रवासाची दखल म्हणून पाहायला हवे.
डॉ. लिंबाळे सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू मला स्वतः अनुभवायला मिळाला आहे. एकदा पत्रकार बंधू भरतदादा मोरे यांच्या समवेत सोलापुरातील भीम जयंती मिरवणुकीत त्यांची भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आजही स्मरणात आहे. ते म्हणाले होते, “साधारणतः मी दरवर्षी भीम जयंतीच्या मिरवणुकीसाठी सोलापूरला येतो. या उत्सवातून मला पुढील अनेक वर्षांसाठी ऊर्जा मिळते. ती ऊर्जा मी काळीज भरून नेत असतो. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत.” त्यांचे हे शब्द केवळ एका साहित्यिकाची वैयक्तिक भावना व्यक्त करणारे नव्हते तर त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि आंबेडकरी विचारांशी असलेल्या नात्याचा प्रत्यय देणारे होते.
एखाद्या व्यक्तीला आपल्या आदर्शांकडून केवळ प्रेरणा मिळते असे नाही तर त्या प्रेरणेतून आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपण्याचे बळही मिळते. डॉ. लिंबाळे यांच्या लेखनातून, विचारांतून आणि साहित्यिक प्रवासातून या प्रेरणेचे प्रतिबिंब दिसून येते. भीम जयंतीचा उत्सव त्यांच्यासाठी केवळ उत्सव नसून नव्या वैचारिक ऊर्जेचा स्रोत आहे. ही त्यांची प्रतिक्रिया विशेष महत्त्वाची वाटते. सोलापूरशी असलेले त्यांचे हे भावनिक आणि वैचारिक नातेही या निमित्ताने दिसून आले होते.
डॉ. लिंबाळे सरांच्या निवडीनंतर साहित्यविश्वात अभिनंदनाबरोबरच टीका-टिप्पणीही होताना दिसत आहे. एखाद्या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यानंतर अभिनंदन होणे जितके स्वाभाविक आहे, तितकीच त्या व्यक्तीच्या वैचारिक भूमिकेची चिकित्सा होणेही लोकशाही विचारविश्वात आवश्यक आहे. मात्र अभिनंदन असो वा टीका, दोन्हींचा आधार विवेक, वस्तुनिष्ठता आणि वैचारिक प्रामाणिकपणा असला पाहिजे. पूर्वग्रह, राजकीय निष्ठा किंवा केवळ संशयाच्या आधारावर व्यक्त होणारी टीका ही वैचारिक चिकित्सा ठरू शकत नाही. टीका करायची असेल तर ती त्यांच्या ठोस भूमिका, विचार आणि कृती यांच्या आधारे व्हावी. कारण सन्मान मिळाला म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार संपत नाही आणि टीका झाली म्हणून साहित्यिकाचे कर्तृत्व कमी होत नाही. व्यक्तीच्या विचारांशी असहमती असणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु असहमती व्यक्त करताना विचारांची उंची आणि भाषेचे भान टिकवणे हीदेखील तितकीच मोठी जबाबदारी आहे.
वैचारिक विश्वात वाद, विवाद, संवाद आणि सुसंवाद असे अनेक टप्पे असतात. वादातून प्रश्न निर्माण होतात, विवादातून भूमिका स्पष्ट होतात, संवादातून समज वाढते आणि सुसंवादातून समाज पुढे जाण्याची दिशा शोधतो. त्यामुळे प्रत्येक वेळी विरोधाचीच भूमिका असावी का, हा प्रश्नही आत्मपरीक्षणाचा विषय ठरतो. मतमतांतरे असणे गैर नाही मात्र वैचारिक दिशा सुस्पष्ट असणे गरजेचे आहे. काळाचा महिमा अगाध असतो. काळ अनेकदा माणसाच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतो. आज डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही त्याचाच एक प्रत्यय आहे. या निवडीकडे कोणत्याही एका विचारधारेचा विजय किंवा पराभव म्हणून पाहण्याऐवजी मराठी साहित्याच्या व्यापक परंपरेतील एका महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून पाहणे अधिक उचित ठरणार आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे, संघटनेचे अथवा विचारधारेचे विचारपीठ नाही. ते साहित्याचे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे, वैचारिक देवाणघेवाणीचे आणि समाजाच्या सामूहिक विवेकाचे विचारपीठ आहे. या पदावरून डॉ. लिंबाळे यांनी कोणत्याही विशिष्ट गटाची नव्हे तर संपूर्ण साहित्यविश्वाची भूमिका मांडावी, अशी अपेक्षा आहे. विशेषतः समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी मूल्ये यांना ते किती ठामपणे अभिव्यक्त करतात. यावर त्यांच्या अध्यक्षपदाचे खरे मूल्यमापन होईल.
एखाद्या व्यक्तीचा सन्मान करताना तिच्या विचारांशी सहमत असणे बंधनकारक नसते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी असहमती असली तरी तिच्या कर्तृत्वाचा सन्मान नाकारणे योग्य ठरत नाही. हीच वैचारिक परिपक्वता आपल्या समाजात रुजणे आवश्यक आहे. व्यक्तिपूजा आणि व्यक्तिद्वेष या दोन्ही टोकांपासून दूर राहून कर्तृत्वाचा गौरव आणि विचारांची चिकित्सा करण्याची संस्कृती आपण जोपासली पाहिजे.
हन्नूरच्या मातीतून सुरू झालेला डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा प्रवास आज मराठी साहित्याच्या सर्वोच्च विचारपीठापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या यशात संघर्ष आहे, प्रतिभा आहे, चिंतन आहे आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेली लेखणी आहे. त्यांच्या निवडीने सोलापूर जिल्ह्याच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रालाही अभिमानाचा क्षण दिला आहे. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांची ही निवड विशेष आनंददायी आहे. त्याचबरोबर भीम जयंतीच्या मिरवणुकीत व्यक्त झालेली बाबासाहेबांविषयीची त्यांची श्रद्धा आणि सोलापूरमधून ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशील आणि प्रेरणादायी पैलू उलगडणारी आहे.
डॉ. शरणकुमार लिंबाळे सर, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या आपल्या निवडीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..! हार्दिक शुभेच्छा सर…. आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत साहित्याचा विचार अधिक व्यापक व्हावा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अधिक बळकट व्हावे आणि वंचितांच्या वेदनांना न्यायाची भाषा मिळावी, हीच अपेक्षा सर… आपल्या लेखणीतील संवेदनशीलता, विचारांतील प्रगल्भता आणि अनुभवांतील सामाजिक भान या संमेलनाला नवी उंची देतील, असा विश्वास वाटतो. आपला साहित्यिक प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरो आणि आपल्या अध्यक्षपदातून मराठी साहित्याला विचारांची नवी क्षितिजे लाभोत, ही मनःपूर्वक सदिच्छा सर…
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा सर..!
— किरण बनसोडे , पत्रकार ( सोलापूर )



